यूपीएससीने २०१३ पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. त्यापकी सामान्य अध्ययन पेपर -१ मधील भूगोल विषयाच्या तयारीबाबत आपण मागील लेखामध्ये चर्चा केली. त्या अनुषंगाने २०१३ मधील मुख्य परीक्षेत भूगोल विषयावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्याचबरोबर पुढील परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा आपण येथे करणार आहोत.
सामान्य अध्ययन पेपर -१ मध्ये एकूण २५० गुणांपकी भूगोल विषयावर
७० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापकी काही ५ गुणांचे लघुत्तरी
(१०० शब्दांच्या मर्यादेत) तर काही १० गुणांचे थोडेसे विस्तारित
२०० शब्दमर्यादेचे प्रश्न विचारण्यात आले. त्यातही भूगोलांतर्गत विविध उपघटकांवर खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आलेली दिसते-
* जगाच्या प्राकृतिक भूगोलाची वैशिष्टय़े – ४० गुण (५ गुणांचे ६ प्रश्न आणि १० गुणांचा १ प्रश्न)
* उद्योगांचे स्थानिकीकरण – १० गुण (५ गुणांचे २ प्रश्न)
* प्रमुख नसíगक संसाधने व त्यांचे वितरण – २० गुण (१० गुणांचे दोन प्रश्न)
सर्वाधिक प्रश्न अपेक्षेप्रमाणेच प्राकृतिक भूगोल या विषयाशी निगडित होते. यामध्येही आकडेवारी व माहितीवर आधारित प्रश्नांना आयोगाने या वर्षी फाटा दिलेला दिसून येतो. त्याऐवजी संकल्पनेवर आधारित व विविध भौगोलिक घटनांचा कार्यकारणभाव तपासणारे असे प्रश्नांचे स्वरूप होते. उदा.- नागरी उष्णतर क्षेत्र (Urban heat island) तयार होण्याची कारणे द्या. यामध्ये शहरी क्षेत्रामधील ऊर्जानिर्मिती, त्याची वैशिष्टय़े व त्यामुळे तयार होणारे उष्णतर क्षेत्र याचा संबंध लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे शहरी हवामान व तेथे घडणाऱ्या विविध प्रक्रिया यासंबंधीची संकल्पना स्पष्टपणे माहिती असल्याशिवाय या प्रश्नाचे सुसंगत उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी करताना या संकल्पना स्पष्ट करून आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भूगोल हा विषय जरी कला शाखेशी निगडित असला तरी त्यातील बऱ्याचशा संकल्पना या शास्त्रीय स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे एकदा मूळ संकल्पना समजून घेतल्यास त्यावर आधारित उपयोजित प्रश्नांची उत्तरे देणे सोपे असते. उदा.- ‘तापमानाची विपरीतता’ (Temperature Inversion) म्हणजे काय व त्याचा हवामान व लोकांवर कसा परिणाम होतो? किंवा जगातील बहुतांश मोठी वाळवंटे २००-३०० उत्तर या पट्टय़ात व खंडांच्या पश्चिमेला का तयार झाली आहेत? या प्रश्नांचे उत्तर देताना वायुभाराचे पट्टे, त्याचबरोबर वाऱ्याची दिशा, प्रत्यावर्त या संकल्पना स्पष्ट असल्यास अत्यंत सहजतेने आपण उत्तर तयार करू शकतो. त्यामुळे केवळ पारंपरिक माहितीच्या व पाठांतराच्या आधारावर भूगोल विषयाची तयारी आता नवीन अभ्यासक्रमासाठी पुरेशी नाही.
त्याचबरोबर चालू घडामोडींशी निगडित काही प्रश्न या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले दिसतात. उदा.- नुकतेच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘फायलीन’ हे चक्रीवादळ आले. त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर चक्रीवादळांचे नामकरण कशा प्रकारे केले जाते? त्याचबरोबर भारताच्या भूगोलासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आलेले दिसतात. उदा.- पश्चिम घाटांच्या तुलनेने हिमालयामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात याची कारणे द्या किंवा पश्चिम घाटातील नद्या त्रिभुज प्रदेश का तयार करीत नाहीत? यासाठी भारताच्या भूगोलाचीही सखोल तयारी असणे अपेक्षित आहे.
प्राकृतिक भूगोलानंतर आíथक भूगोलावरदेखील प्रश्न विचारलेले दिसतात. यामध्येदेखील विश्लेषणात्मक प्रश्नांचाच प्रभाव पाहायला मिळतो. उदा.- आजकाल दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिकाधिक साखर कारखाने सुरू करण्याचा कल पाहायला मिळतो. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? स्पष्टीकरणासह चर्चा करा. किंवा सुती कापड उद्योगाच्या भारतातील विकेंद्रीकरणामागचे घटक तपासा.
त्यानंतर प्रमुख नसíगक संसाधनांच्या संदर्भातील प्रश्न पाहता घेतात. यामध्येदेखील चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे भारतातील चालू घडामोडींचा भूगोलाच्या अभ्यासक्रमाशी अनुबंध जोडणे आवश्यक आहे. उदा.- शेल गॅस व संदर्भात चालू असलेली चर्चा व त्यावरील शासकीय धोरण यावर आधारित प्रश्न या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला दिसतो. त्यामध्ये शेल गॅस, त्याचे साठे आणि त्याच्या उत्खननाशी संबंधित समस्या व आक्षेप आणि या सर्वाचा भारतीय ऊर्जासमस्येशी संबंध सदर प्रश्नामध्ये अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे अणू इंधन, त्याचे महत्त्व व भारतातील व जागतिक स्तरावरील साठे यावरही प्रश्न विचारलेला आढळतो.
वरील विश्लेषणावरून असे म्हणता येईल की अभ्यासक्रमात उल्लेखलेल्या प्रत्येक घटकांवर किमान एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात घेणे आवश्यक आहे, त्यासाठी ‘एनसीईआरटी’ आधारित पुस्तकांचे वाचन, चालू घडामोडींची अभ्यासाशी सांगड घालणे या अत्यावश्यक गोष्टी बनलेल्या दिसतात.
या पद्धतीने हा विषय तयार केल्यास यातून अधिकाधिक गुण मिळविण्याची संधी आहे, कारण विषयाचे स्वरूप शास्त्रीय व संकल्पनाधिष्ठित असल्यामुळे गुण गमावण्याचा धोका फारसा नाही. त्यामुळे भूगोलाकडे पेपर-१ मधील गुण मिळविण्यासाठी सोपा व भरवशाचा घटक म्हणून पाहता येईल व एकूणच सामान्य अध्ययन विषयात अधिकाधिक गुण मिळविण्यास ते साहाय्यकारक ठरेल यात शंका नाही.
admin@theuniqueacademy.com
सामान्य अध्ययन पेपर १ -भूगोलाची तयारी
यूपीएससीने २०१३ पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. त्यापकी सामान्य अध्ययन पेपर -१ मधील भूगोल विषयाच्या तयारीबाबत आपण मागील लेखामध्ये चर्चा केली.
आणखी वाचा
First published on: 21-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General studies paper 1 preparation of geography