डॉ. अमर जगताप
श्रीकांत जाधव
या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाच्या स्वरूपाची थोडक्यात चर्चा करणार आहोत.
अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थान निश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना/घडामोडी उदा. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो.
शिलावरण यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भूअंतर्गत व भूबाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावरणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात.
वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो.
जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली याचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडींमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावश्यक आहे.
जीवावरण घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो.
पर्यावरणघटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिक स्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परीस्थितीकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची माहिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरीस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडींच्या आनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.
प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून ह्या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे. मानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिक भूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते.
मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्या वृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश या घटकांचा २०११ च्या जणगणेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकात लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंब केल्याने उद्भभवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी.
वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, स्थलांतर मोठय़ाप्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३ ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.
आर्थिक भूगोल यामध्ये मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे, त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टीकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्तावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.
उपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयाशी सबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्न पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित विचारले जातात.
यूपीएससीची तयारी: जगाचा आणि भारताचा भूगोल; स्वरूप
या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाच्या स्वरूपाची थोडक्यात चर्चा करणार आहोत.
Written by श्रीकांत जाधव
Updated:

First published on: 21-04-2022 at 00:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geography world and india format distribution natural resources region est geophysical phenomena amy