श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो तसेच एनसीईआरटी (NCERT) ची भूगोल विषयाच्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकतील, याचा गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे प्रस्तुत लेखामध्ये चर्चा करणार आहोत.
गतवर्षीचे प्रश्न आणि प्रश्ननिहाय उपयुक्त असे संदर्भसाहित्य
२०२१ मध्ये भारताला उपखंड का मानले जाते? विस्तृतपणे उत्तर द्या. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तसेच २०२० मध्ये वाळवंटीकरण प्रक्रियेस हवामानाच्या सीमा नसतात. उदाहरणासह समर्थन करा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या दोन्ही प्रश्नांसाठी एनसीआरटीईचे Fundamentals of Physical Geography (XI), पुस्तक तसेच सखोल आणि सर्वंकष अभ्यासाच्या दृष्टीने Fundamentals of Physical Geography (by Majid Husain) , या संदर्भ साहित्याचा उपयोग करता येऊ शकतो.
२०१९ मध्ये जागतिक तापमानवाढीमुळे प्रवाळ जीवन पद्धतीवर (coral life) होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करा. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते जे पारंपरिक ज्ञान, चालू घडामोडी यांची सांगड घालून विचारण्यात आले होते. २०१८ मध्ये समुद्री परिस्थितिकीवर मृत क्षेत्रे यांच्या विस्ताराचे कोण कोणते परिणाम होतात? २०१७मध्ये कोळसा खाणींची विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम, २०१६ मध्ये दक्षिण चिनी समुद्र व त्याचे महत्त्व. या सर्व प्रश्नांसाठी खाली नमूद संदर्भ साहित्य उपयुक्त ठरते.
२०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव टाकतात, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक या दोन्ही पैलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), World Geograhy (by Majid Husain), World Regional Geography (Tikha, Bali, Sekhaon) इत्यादी संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. याच बरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो ज्यामध्ये मुख्यत्वे आर्थिक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकाचा समावेश होतो. यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस यांसारखी वर्तमानपत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यांसारख्या मासिकांचा वापर उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीमधील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे? हा प्रश्न विचारलेला होता.
२०१४च्या मुख्य परीक्षेमध्ये उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशात मोठय़ाप्रमाणात मर्यादित असतात कारण, हा प्रश्न विचारण्यात आला होता. थोडक्यात, या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी उष्णप्रदेशीय चक्रीवादळांची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असावी. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भ ग्रंथांचा वापर करता येतो. तसेच, मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यात भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक घटकाशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ India A Comprehensive Geography (by D. R. Khullar) आहे. म्हणून भारताच्या भूगोलवर सर्वाधिक भर परीक्षेच्या दृष्टीने द्यावा लागतो. याव्यतिरिक्त जगाच्या भूगोलवर देखील प्रश्न विचारले जातात.
परीक्षाभिमुख अभ्यासासाठी लागणारे संदर्भ साहित्य
भूगोल याविषयाच्या मूलभूत माहितीसाठी एनसीईआरटीच्या अकरावी व बारावीच्या Contemporary India ( STD- IX, X), Fundamentals of Physical Geography ( XI), Indian Physical Environment( XI), Fundamentals of Human Geography ( XII), India- People and Economy (XI) इत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India A Comprehensive Geography (by D. R. Khullar), World Geography (by Majid Husain), World Regional Geography (Tikha, Bali, Sekhaon) या संदर्भ ग्रंथांचा उपयोग भूगोल विषयाची सखोल तयारी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही. या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने केल्यास अधिक फायदा होतो. कारण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त होते तर गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास अधिक योग्यपणे या संदर्भ ग्रंथांचा वापर करता येतो. थोडक्यात, एनसीईआरटीच्या पुस्तकांमुळे विषयाची मूलभूत समज येते आणि संदर्भ ग्रंथांचा वापर करून परीक्षाभिमुख अभ्यास करता येतो. पण याला चालू घडामोडींशी संबंधित माहितीची जोड देणेही तितकेच गरजेचे आहे हे उपरोक्त काही प्रश्नांवरून कळून येते.
यूपीएससीची तयारी: जगाचा आणि भारताचा भूगोल ; संदर्भ साहित्य
प्रस्तुत लेखामध्ये आपण या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो
Written by श्रीकांत जाधव
First published on: 26-04-2022 at 01:18 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geography world india reference material ncert upsc amy