प्रशासन प्रवेश
नियोजन, सातत्य, स्वयंमूल्यांकन आणि विचारक्षमतेचा विकास या सर्वसाधारण कौशल्यांचा आणि क्षमतांचा विचार केल्यानंतर, आता परीक्षेचा प्रत्यक्ष अभ्यास करताना कोणत्या क्षमतेची व कौशल्यांची गरज असते हे जाणून घेऊयात.
अर्थात, यासाठी या परीक्षेच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांच्या स्वरूपाची आणि अभ्यासक्रमाची प्राथमिक माहिती अत्यावश्यक ठरते. त्यासंबंधी विचार केल्यास असे लक्षात येते की, पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांची आणि नकारात्मक गुणपद्धती असणारा टप्पा आहे. मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची, म्हणजेच त्यात विविध विषयांवरील प्रश्नांची वर्णनात्मक, विश्लेषणात्मक पद्धतीने उत्तरे लिहायची असतात, तर मुलाखत हा उमेदवाराची व्यक्तिमत्त्व चाचणी घेणारा प्रत्यक्ष संवादरूपी टप्पा ठरतो.
उपरोक्त तिन्ही टप्प्यांतील परीक्षेचे भिन्न स्वरूप पाहता, त्यासाठी विविध क्षमता व कौशल्ये अपेक्षित आहेत यात शंका नाही. प्रथमदर्शनी विचार करता पूर्वपरीक्षेसाठी आकलनातील नेमकेपणा व स्मरणशक्ती; मुख्य परीक्षेसाठी आकलनाबरोबरच प्रश्नास अनुरूप प्रभावी लेखन क्षमता आणि मुलाखतीसाठी आकलनासह मुलाखत मंडळासमोर स्वत:चा विचार, मत आत्मविश्वासपूर्वक पोचवण्याचे संवादरूपी कसब महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नागरी सेवा परीक्षेतील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करताना सर्वत्र आवश्यक असणाऱ्या आकलनासोबत त्या-त्या टप्प्यास आवश्यक विशिष्ट क्षमता व कौशल्य विकसित करण्यावर भर देणे जरुरीचे ठरते. म्हणूनच आकलनक्षमतेचा परिपूर्ण विकास करणे हे प्रारंभिक व मूलभूत काम ठरते.
वस्तुत: कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना आकलनक्षमता महत्त्वाची ठरते यात शंका नाही. मात्र, यूपीएससीबाबतीत अनेक कारणांमुळे ती अनन्यसाधारण महत्त्वाची आणि निर्णायक ठरते. या परीक्षेत असे अनेक घटक आहेत जे एका बाजूला थेट आकलनक्षमता तपासणारे, तर उर्वरित घटक वेगळ्या पद्धतीने आकलनाचे मूल्यमापन करणारे आहेत. उदा. पूर्वपरीक्षेतील नागरीसेवा कलचाचणी (सीसॅट) या विषयात ‘सामान्य आकलन’ आणि ‘इंग्रजी भाषेचे आकलन’ हे दोन घटक स्पष्ट व थेटपणे विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेचे मोजमाप करणारे आहेत. प्रश्नपत्रिकेतील संबंधित घटकांवरील परिच्छेद, त्यावरील प्रश्न आणि त्याखालील पर्याय याचे स्पष्ट, नेमके आणि अचूक आकलनच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते. अर्थात, यासाठी विविध स्वरूपाचे भरपूर वाचन, विचारशक्तीचा विकास, चिकित्सक वृत्ती आणि अशा प्रश्नांचा भरपूर सराव याद्वारे आकलन क्षमतेचा विकास
करता येतो.
त्याखेरीज पूर्वपरीक्षेतील उर्वरित घटक असोत की मुख्य परीक्षा वा मुलाखतीतील प्रश्न असोत, ते सर्व विद्यार्थ्यांच्या आकलनाचीच चाचपणी पाहणारे असतात. अभ्यासक्रमातील विविध विषय, त्यातील सर्व प्रकरणे, विषयासंबंधीच्या संकल्पना, त्यातील वादविवाद व चर्चा, कळीचे मुद्दे, त्यासंबंधी समकालीन घडामोडी अथवा अलीकडील विकासक्रम अशा मूलभूतदृष्टय़ा महत्त्वाच्या बाबींचे स्पष्ट व नेमके आकलन गरजेचे ठरते. नागरी सेवा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सतत बदलणारे; स्पष्टीकरण, विश्लेषण आणि चिकित्सेची मागणी करणारे असतात. एखाद्या मुद्दय़ावर विचारलेला प्रश्न त्यासंबंधातील कोणत्या आयामावर प्रकाशझोत टाकेल याची शाश्वती नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांला त्या बाबतीत सर्व तयारी करून, कोणत्याही शक्यतेस सामोरे जाण्यास सिद्ध राहावे लागते. त्याशिवाय ही परीक्षा कमालीची स्पर्धात्मक असल्याने इतर हजारो विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपण आकलनाच्या बाबतीत कायम पुढेच राहिले पाहिजे याची खबरदारी घ्यावी लागते.
सर्वसाधारणत: विचार करता असे लक्षात येते की, कोणत्याही विषयाचे आकलन हे मूलत: त्या विषयातील मूलभूत संकल्पनांवर अवलंबून असते. इतिहास, भूगोल असो वा अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय राजकारण असो सर्वच विषयांत काही पायाभूत संकल्पना असतात. त्या संकल्पना पद्धतशीरपणे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. उदा. राज्यव्यवस्थेचा विचार करताना राज्यसंस्था, शासनसंस्था, संसदीय – अध्यक्षीय व्यवस्था, संघराज्य, धर्मनिरपेक्षता, सत्ताविभाजन अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांचे नेमके आकलन महत्त्वपूर्ण ठरते. अर्थव्यवस्थेतही राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, तुटीचे विविध प्रकार, विविध कर, चलनविषयक धोरण, वित्तीय धोरण, अशा कितीतरी संकल्पना समजून घेतल्याशिवाय तो विषय समग्रपणे जाणून घेणे कठीण ठरते. थोडक्यात, प्रत्येक विषयातील संकल्पनात्मक स्पष्टता हीच आकलनाचा पाया ठरते.
आकलन प्रक्रियेमध्ये संकल्पनानंतर महत्त्वाचा ठरणारा घटक म्हणजे त्या त्या प्रकरणात अंतर्भूत होणारी विविध स्वरूपाची माहिती. यात विविध प्रकारची तथ्ये, आकडेवारी, तांत्रिक बाबी, घटना-घडामोडी अशा अनेक बाबींचा समावेश होतो. ही माहिती सखोल व सविस्तरपणे समजून घेऊन त्यास पुन्हा-पुन्हा उजळणी करून पक्की करणे अत्यावश्यक ठरते. म्हणजे उत्तरात जिथे जिथे आवश्यकतेनुसार अशा माहितीचा आधार देता येईल.
अभ्यासक्रमातील विविध घटकांविषयी घडणाऱ्या चालू घडामोडी हा आकलन प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा पलू होय. कोणत्याही चालू घडामोडीतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे, त्याविषयक मत-मतांतरे, त्याचे भिन्न आयाम अशा विविध पलूंचे पद्धतशीर आकलन निर्णायक ठरते. अशा रीतीने या परीक्षेचा अभ्यास करताना संकल्पनांसह चालू घटना-घडामोडी असा व्यापक विचार केल्यास आकलन क्षमतेचा अपेक्षित विकसित करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा