महेंद्र दामले

करोनामुळे सगळे काही ठप्प झाल्याचा परिणाम सगळ्याच क्षेत्रांवर झाला. तसा तो शिक्षणक्षेत्रावरही झाला.  एकंदरीत अनिश्चितता निर्माण झाली. परिणामी आता भविष्याचा विचार करता कोणते शिक्षण घ्यायचे हा एक बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. सामान्य परिस्थितीतही भविष्याबद्दल अनिश्चितता वाटली की आपण जास्तीत जास्त सुरक्षित क्षेत्र निवडतो. या वृत्तीचा कला शिक्षणावर काय परिणाम होईल? कला शिक्षण घेण्याचा निर्णय हा योग्य ठरेल का? कला शिक्षणक्षेत्रात कोणत्या शाखेची निवड करणं योग्य होईल? फाइन आर्टचे शिक्षण घेणे योग्य ठरेल का? असा विचार करताना युद्ध, महामारी आणि अनेक संकटांमुळे मानवातील निर्मितीबद्दलची कल्पनाक्षमताही कमालीची वाढते असे भूतकाळातील अनेक घटनांमुळे लक्षात आले आहे. अनेक समस्यांवर उपाय शोधणे हे मानवासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. माणसात आणि मानवी समाजात त्यामुळे अनेक बदल घडतात. मानवी जीवनाच्या काही बाबी माणसाच्या सवयी बदलतात. या बदलाला ओळखणे आणि त्यानुसार गोष्टी घडवणे याला प्रचंड महत्त्व येते. हे ज्यामुळे शक्य होते त्याला सामान्यपणे डिझाइन असे म्हणतात. या डिझाइनची काही उदाहरणं- उदा. कोविड काळात रुग्णालयामध्ये वापरात येतील अशा पुठ्ठय़ांच्या खाटा आणि इतर फर्निचर उदयाला आले, वापरले गेले किं वा दुसरे उदाहरण म्हणजे वर्क फ्रॉम होम या परिस्थितीमुळे यापुढे अनेक घरांमध्ये एक ऑफिस देणे कदाचित सुरू होईल. कोविडनंतर अशाच प्रकारच्या विचारक्षमतेला महत्त्व येईल. पण या सर्व कल्पना करू शकेल असे मन तयार होण्यास कसले शिक्षण घ्यावे लागेल? मानवावरील संकटे ही मानवातील मूलभूत क्षमतांची परीक्षा घेतात. त्या विकसित करेल अशा शिक्षणाची गरज माणसाला असते. मानवाच्या कोणत्याही एका क्षमतेपेक्षा त्याची बदल स्वीकारण्याची आणि बदलणाऱ्या परिस्थितीतील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता, या महत्त्वाच्या ठरतात. त्याकरता एक प्रकारची अष्टपैलू वृत्ती गरजेची असते. अशा क्षमता, अष्टपैलू वृत्ती विकसित होण्यास आपल्याला येणारे अनुभव, त्यातून मिळणारे ज्ञान, त्याला आपल्या मनाचा प्रतिसाद अशा अगदी मूलभूत अनुभव प्रक्रियांचे भान असणे गरजेचे आहे. फाइन आर्टच्या शिक्षणाने या क्षमता निर्माण होतात, होऊ शकतात.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
Loksatta chaturang  Temperament Obsessive Compulsive Personality Disorder
स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेला निसर्गाची प्रेरणा

मानवनिर्मिती क्षमतेचा एक स्रोत हा फाइन आर्टच्या शिक्षणाने विकसित होतो. पण आपल्याकडे फाइन आर्टच्या शिक्षणाबद्दल एक अढी आहे. त्याबद्दल जरा विस्ताराने जाणून घेऊ .

टाळेबंदी संपल्यानंतर शाळा-कॉलेज सुरू होतील, नुकताच दहावी-बारावीचा निकाल लागला आहे.  प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सीईटी होईल आणि आणि दृश्यकला (चित्रकला- शिल्पकला- अप्लाइड आर्ट) विषयात प्रवेश घेण्याबद्दल प्रक्रियाही सुरू होईल. नेहमीप्रमाणेच या क्षेत्रात प्रवेश घेताना विद्यार्थी आणि पालकांच्या मनात जो मानसिक गोंधळ असतो तो सुरू राहील. खरे तर हा गोंधळ दरवर्षीचाच असतो. यंदा करोनामुळे त्यात काही बदल होईल, असे वाटत नाही. हा गोंधळ सामूहिक स्वरूपाचा असतो. तो समजून घेतला नाही तर आपल्या आवडीच्या विषयात शिक्षण घेण्याबद्दल चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम हा आपल्या कारकीर्दीवर, जीवनावर नक्की पडू शकतो.

सर्वसाधारणपणे आपला समाज हा अप्लाइड आर्ट आणि फाइन आर्ट यामधील निवडीबाबत गोंधळात असतो. स्वत:शी आणि इतरांशी झगडत असतो. समाजातील बहुतेकांचं मत अप्लाइड आर्टच्या पारडय़ात पडतं त्यामुळे या लेखातून आपण फाइन आर्ट आणि त्याचं शिक्षण आणि संधी याविषयी बोलू. कारण त्यामुळे कमीत कमी आपल्याला फाइन आर्टच्या शिक्षणाबद्दल एक योग्य दृष्टिकोन तयार करता  येईल.

फाइन आर्ट्सपेक्षा जाहिरात कला या क्षेत्रांमध्ये एक निश्चित स्वरूपाचं काम-त्याआधारे नोकरी आणि त्यानुसार शिक्षण या गोष्टी एकमेकांशी जुळल्या आणि आपल्याकडे लोक म्हणू लागले की ‘फाइन आर्टस् नको, तुला चित्र काढता येते, त्याची आवड आहे तर तू अप्लाइड आर्ट शिक’ हा झाला व्यावहारिक विचार, पण याबरोबर आपण आपल्या आवडीचे, ज्यात रुची आहे आणि जे करण्याची क्षमता आहे त्या संदर्भातील शिक्षण घेणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या घटकांचा समतोल साधला पाहिजे. कारण आपली आवड, क्षमता, समाजाची गरज या तिन्ही गोष्टींचा आपण मेळ घालू शकलो तर आपण आपल्या करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकू.

चित्रकला शिक्षणाबद्दल, ‘त्यामधून पैसे मिळत नाहीत’ अशी एक मानसिकता स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळी चित्र रंगवून पैसे कमावणं या एकाच अंगाने या क्षेत्रामध्ये करिअर शक्य असे. चित्र विकण्याच्या संधी कमी असल्याने, ‘पैसे मिळत नाहीत’ अशी एक सामूहिक समज, भीती निर्माण झाली. तरीही महाराष्ट्र हे त्या दृष्टीने सुदैवी राज्य आहे. आपल्याकडे अनेक आर्ट स्कूल आणि महत्त्वाचे म्हणजे कलासंचालनालय निर्माण झाले आहे. त्यामुळे कलेविषयीची समाजातील मानसिकता बदलण्याची आणि ज्यांना कलेची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली. आज फर्निचर डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन, सिरॅमिक आणि पॉटरी, मेटल क्राफ्ट, ज्वेलरी डिझाइन आदी जी क्षेत्रे स्वतंत्र झाली आहेत, ती एकेकाळी फाइन आर्टस् या क्षेत्रातच मोडत होती. हळूहळू या क्षेत्रातून वस्तूनिर्मिती होऊ लागली आणि त्यांचा विकास झाला. त्यांचे शिक्षण हे केवळ तंत्रापुरतं मर्यादित न राहता त्यामध्ये इतर अनेक अंगाचे शिक्षण सुरू झाले आणि या कला आणि त्यांचे अभ्यास क्षेत्र स्वतंत्र झाले. उदा. जाहिरात- कला हे  क्षेत्र असेच विकसित झाले. कारखान्यातून बनलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फाइन आर्टस्मधील रेखाटन, चित्र रंगवणे आदी तंत्र वापरून जाहिरात कला निर्माण झाली आणि हळूहळू स्वतंत्रपणे विकसित झाली.

फाइन आर्टच्या महाराष्ट्रात मिळणाऱ्या शिक्षणातून जे गृहीत धरले जाते, त्यामध्ये एक कलाकार म्हणून आपली कारकीर्द  घडवणे हेच आहे. आजही शिक्षणाच्या परिणामाचा एक मोठा भाग, हा विद्यार्थ्यांला एक चित्रकार किंवा शिल्पकार म्हणून कलानिर्मिती करणे, त्याचे प्रदर्शन-विक्री करणे आणि त्यातून संग्रहालय, कला संशोधन करणाऱ्या संस्था आदींच्या साहाय्याने आपल्या कलेला समकालीन विचारव्यूहांच्या कक्षेत आणणे आणि त्याद्वारे आपले मूल्य (वैचारिक आणि आर्थिक) वाढवणे या दिशेने  घेऊन जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात या संधी नव्हत्या, त्या आजच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या कलेत पैसे नाहीत, ही बाब आपण आता खोडून काढली पाहिजे.

यासोबत ही गोष्टसुद्धा मान्य करायला हवी की, महाराष्ट्रातील दृश्यकला शिक्षण हे औद्योगिकता, तंत्रज्ञान, मानवी समाजाची गरज आणि जागतिक कलाप्रवाहातील बदल या सर्व अंगांना प्रतिसाद देत स्वत:मध्ये बदल घडवत नाही. अशा परिस्थितीमुळे अनेक मर्यादांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. त्याचा अभ्यासक्रमावर परिणाम होतो. तरीसुद्धा फाइन आर्टचे शिक्षण घेणे हे आजच्या काळात अप्लाइड आर्ट शिक्षण घेण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. फाइन आर्टच्या शिक्षणात तंत्र, कृती आणि मानसिक, बौद्धिक प्रक्रिया या सक्षमपणे विकसित होतात आणि तुम्ही दृश्यभाषेची मूलभूत जाणीव स्वत:मध्ये विकसित करता. मूलत: दृश्यानुभव होणं, तो समजणे, त्याला प्रतिसाद देणे आणि त्यानुसार प्रतिमा निर्माण करून त्याद्वारे रसिकांच्या मनावर परिणाम घडवणे या प्रक्रियेचं शिक्षण होते. जरी आपण चित्रकला किंवा शिल्पकला आदी विषय किंवा तंत्र शिकत असलो तरीही आपल्याला व्यापक पातळीवर दृश्यभान प्राप्त होते. या भानामुळे आपली दृश्यभाषा समजण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अनेक क्षेत्रांत काम करण्याच्या अधिक शक्यता निर्माण होतात. अप्लाइड आर्टमध्ये त्या तुलनेने कमी असू शकतात. याचसोबत तांत्रिक शिक्षणासोबत तुम्हाला, भाषा, भाषेतून विचार करणे, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, संग्रहालय, सिनेमा, नाटक, अ‍ॅनिमेशन आणि शिक्षण यापैकी एक किंवा अनेक गोष्टींमध्ये आवड असेल तरीही फाइन आर्टचा खूप उपयोग होऊ शकतो. कारण त्यातून तुम्ही अष्टपैलू बनता. फाइन आर्टचे शिक्षण घेऊन कलाकार, शिक्षक, इतिहास संशोधक, कलाकृती संवर्धक, कण्टेण्ट लेखक, अ‍ॅनिमेटर, कला दिग्दर्शक, मेकअप डिझाइनर, लूक डिझाइनर, मॉडेल मेकर, आर्ट थेरपिस्ट, समीक्षक, लेखक, सेट डिझाइनर, गॅलरी मॅनेजर, आर्ट बिझनेस एक्झिक्युटिव्ह, कला नोंद व जतन, अशा कित्येक क्षेत्रांत काम करता येऊ शकते. फाइन आर्टचा असा तुलनात्मक विचार करून पाहिल्यास विद्यार्थ्यांना निर्णय घेणे सोपे जाऊ शकते.

Story img Loader