प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकामध्ये अंतर्भूत आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टय़े याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.

आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९व्या शतकामध्ये उदयास आल्या व २०व्या शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर-२ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या आणि या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अ‍ॅपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते.

आंतरराष्ट्रीय संघटनांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अधिदेश (Mandate) या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे सयुक्तिक ठरते. बऱ्याचदा परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित एखादी बाब चर्चेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला गेला आहे. उदा. २०२१ च्या मुख्य परीक्षेमध्ये   SCO या संघटनेवर प्रश्न विचारण्यात आला होता.

Q.  Critically examine the aims and objectives of SCO.  What importance does it hold for India. (250  words)

या प्रश्नाच्या उत्तराची रचना कशी असावी याचा थोडक्यात आढावा घेऊ.  रउड ही शांघाय स्थित आंतर-शासकीय संस्था आहे. सदस्य राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याचे उद्दिष्ट असणारी संस्था आहे. भारत या संघटनेचा २०१७मध्ये कायमस्वरूपी सदस्य बनला. यानंतर उत्तराच्या मुख्य भागात शांघाय सहकार्य संघटनेची उद्दिष्टे लिहावीत व पुढे सदस्य देशांमध्ये असणाऱ्या परस्परांतील संबंधांच्या पार्श्वभूमीवर, समर्पक उदाहरणांसह या उद्दिष्टांचे टीकात्मक परीक्षण करावे. उदा. भारत- चीन- पाकिस्तान यांचे तालिबानमध्ये असणारे भिन्न हितसंबंध. उत्तराचा शेवट या संघटनेचे भारतासाठी असणारे महत्त्व लिहून करावा.

Discuss the impediments India is facing in its pursuit of a permanent seat in UNSC. (2015)

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद हा नेहमीच चर्चेत असणारा विषय आहे. जागतिक सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर या परिषदेची भूमिका महत्त्वाची ठरते. त्या अनुषंगाने सुरक्षा परिषद हा संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराच्या माध्यमातून प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या भारत, ब्राझील, जपान आणि जर्मनी या देशांकडून सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व प्राप्त व्हावे याकरिता मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेला कालानुरूप आपल्या संरचनेमध्ये सुसंगत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून ही मागणी उचित ठरते. भारताने वेगवेगळय़ा व्यासपीठांवरून सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं याकरिता सातत्याने मागणी केली आहे. जगातील चीन वगळून अनेक देशांनी भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावं याकरिता पािठबा दर्शविला आहे. मात्र भारताला सुरक्षा परिषदेमध्ये सदस्य व मिळण्याच्या दृष्टीने अजूनही कोणती ठोस पावलं उचलली गेली नाही. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनण्याच्या मार्गात भारतासाठी सर्वात मोठा अडथळा चीन आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेच्या विस्ताराबाबत भारताचा पवित्रा आक्रमक होताना दिसत आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी युनोच्या आमसभेच्या ७५ व्या अधिवेशनातील आपल्या भाषणात सुरक्षा परिषदेवर कठोर टीका केली होती. पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे सुरक्षा परिषद विश्वासार्ह पद्धतीने काम करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं होतं. यातून भारताचा आक्रमक पवित्रा दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी त्या संघटनांविषयीच्या पारंपरिक माहितीबरोबर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक ठरते. ही बाब वरील दोन्ही प्रश्नांवरून अधोरेखित होते.

आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनाशी संबंधित चालू घडामोडीच्या तयारीकरिता ‘द इंडियन एक्सप्रेस’सारखी वृत्तपत्रे व ‘बुलेटीन’ हे मासिक उपयुक्त ठरते.

Story img Loader