आशिया खंडातील जपान हा सर्वाधिक प्रगत देश आहे. जपानी अर्थव्यवस्था ही अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर येते. जगातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक जपानी कंपन्यांची गणना होते. तांत्रिक आणि आर्थिकदृष्टय़ा प्रगत देशांमध्ये जपानचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. जपानमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, वैद्यक तसेच अभियांत्रिकी संशोधने केली जातात. त्याकरता आवश्यक ठरणारी अद्ययावत संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा आणि इतर संस्था तिथे आहेत.
उच्चशिक्षणासाठी जपानमध्ये ७०० हून अधिक विद्यापीठे व ३००हूनही अधिक विशेष अभ्यासक्रम (speciality schools) आहेत. तंत्रशिक्षण, विज्ञान इ. बरोबरच वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जपानमध्ये आशियाई संस्कृतींचा, भाषांचा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाचाही मोठय़ा प्रमाणावर अभ्यास होतो.
जपानमधील राहणीमान आणि उच्च शिक्षण अतिशय महाग आहे. मात्र, जपानी सरकारतर्फे, विद्यापीठांतर्फे परदेशी विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्ती दिल्या जातात. जास्सो (Jasso: Japan Student Service Organisation)च्या आकडेवारीनुसार जपानला उच्चशिक्षणासाठी येणारे ५१.४ टक्के परदेशी विद्यार्थी शिष्यवृत्तीवर येतात.
जपानी सरकारतर्फे संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच जपानी भाषेच्या अभ्यासासाठी मोंबुकागुशो ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी ४,९५७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायला इतर कागदपत्रांबरोबरच जपानी दूतावासाकडून शिफारसपत्र मिळणे आवश्यक असते. त्यासाठी जपानी दूतावासातर्फे परीक्षा घेतली जाते. मोंबुकागुशो शिष्यवृत्ती संपादन करण्यासाठी जपानी भाषा येणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त अनेक शिष्यवृत्ती या जपानमधील विविध प्रभागांमधून दिल्या जातात, तसेच काही शिष्यवृत्ती या जपानी विद्यापीठांतर्फे दिल्या जातात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे-
० आशियाई देशांतील विद्यार्थ्यांसाठी ‘स्कॉलरशिप प्रोग्रॅम’.
० समाजशास्त्रातील संशोधनासाठी दिली जाणारी ‘द जपान फाऊंडेशन जॅपनीज स्टडीज फेलोशिप प्रोग्रॅम’.
० विकसनशील आशियाई देशांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक जपान स्कॉलरशिप प्रोग्रॅम’.
० ‘कला इतिहास’ या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘इशिबाशी फाऊंडेशन स्कॉलरशिप’.
० विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी योशिदा स्कॉलरशिप फाऊंडेशनतर्फे ‘ykk leader 21’ .
० ‘जास्सो’तर्फे दिली जाणारी ‘मोंबुकागुशो ऑनर्स स्कॉलरशिप’.
० ‘क्योरित्सू फाऊंडेशन स्कॉलरशिप’ व ‘मेन्टेनन्स स्कॉलरशिप’.
आणखीही काही शिष्यवृत्ती जपानमधील खासगी संस्था व कंपन्यांतर्फे दिल्या जातात. उदा.
० वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी ‘इशिद्सू शुन मेमोरिअल स्कॉलरशिप’, ‘इवाकि स्कॉलरशिप’ आणि ‘ओत्सुका तोशिमी फाऊंडेशन स्कॉलरशिप’.
० विज्ञान शाखांचा अभ्यास करण्यासाठी ‘इवातानी इंटरनॅशनल स्कॉलरशिप’.
० संगणक आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘NEC C&C ‘ फाऊंडेशनतर्फे ‘ग्रान्टस् फॉर नॉन
जॅपनीज रिसर्च’.
० अभियांत्रिकी शिक्षणासाठी ‘काजिमा एकुएइकाई’, ‘द कुबोता फंड’ इ.
० कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृती इ. विषयांच्या अभ्यासक्रमांसाठी ‘KDDI फाऊंडेशन स्कॉलरशिप’, ‘इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर जॅपनीज स्टडीज’ इ.
० जपानी चित्रकला, तैल चित्रे इ.च्या अभ्यासासाठी ‘सातो इंटरनॅशनल कल्चरल स्कॉलरशिप’ दिली जाते.
० फक्त स्त्रियांसाठी ‘ग्रॅज्युएट स्कॉलरशिप फॉर नॉन-जॅपनीज वुमन टू स्टडी इन जपान’.
या व इतरही अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
जपानला शिक्षणासाठी जायचे असल्यास जपानी भाषा अवगत करणे फार महत्त्वाचे आहे. कधी कधी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे शक्य होते, परंतु जपानमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे जपानी भाषा शिकल्यास जपानमध्ये राहणे निश्चितच सुकर होते.
जपानी भाषेची J.L.P.T. म्हणजे ‘जॅपनीज लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट’ ही पाच स्तरांमध्ये घेतली जाणारी परीक्षा आहे. ही परीक्षा जगात सर्वत्र वर्षांतून दोन वेळा, डिसेंबर व जुलैमध्ये घेतली जाते. अनेक जपानी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना ही परीक्षा किमान दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरापर्यंत (पाचवा स्तर बेसिक व पहिला स्तर अॅडव्हान्स असतो) उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
जपानी भाषेचे व्याकरण सहज समजण्यासारखे आहे. चित्रलिपीही रंजक असल्याने विद्यार्थ्यांना जपानी भाषेच्या अभ्यासाची गोडी निर्माण होऊ शकते. जपानी भाषा येत असल्यास नोकरी व व्यवसायांमध्येही उत्तम संधी मिळू शकतात.
विद्यार्थिदशेत जपानमध्ये राहण्याचा अनुभव हा खरोखरच आयुष्यभराची शिदोरी ठरू शकतो.
जपानमधील उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती
आशिया खंडातील जपान हा सर्वाधिक प्रगत देश आहे. जपानी अर्थव्यवस्था ही अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर येते.
आणखी वाचा
First published on: 07-07-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher education scholarship on japan