शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या सर्वच शिष्यवृत्त्यांची माहिती घेऊयात. या शिष्यवृत्तींच्या सहाय्याने विद्यार्थी
उच्च शिक्षणाचा रस्ता चोखाळू शकतात.
नेशनवाइड एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्ट
ही शिष्यवृत्ती दहावी व बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरिता पात्रता परीक्षा असून अर्ज ३१ डिसेंबरपूर्वी करावा. पात्रता परीक्षा नागपूर, पुणे, मुंबई विभागात होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ ते ५० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार)द्वारा इन्स्पायर स्कॉलरशिप
या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी बारावी उत्तीर्ण ते पदवीधर असावा. वार्षिक ८० हजार रुपये या शिष्यवृत्तीमध्ये मिळतात. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०१३ आहे.
इंडियन ऑइल अॅकेडमिक स्कॉलरशिप योजना :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीकरिता दहावीपासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. दहावी व आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता दोन हजार विद्यार्थ्यांना एक हजार रु. महिना दिला जातो. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना चार वर्षांकरिता ३०० विद्यार्थ्यांना
३ हजार रु. महिना दिला जातो. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना
४ वर्षांकरिता ३ हजार रुपये महिना व एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना
२ वर्षांकरिता १०० विद्यार्थ्यांना ३ हजार रु. महिना दिला जातो. या स्कॉलरशिपकरिता टक्केवारीची अट असते. खुल्या प्रवर्गाकरिता ६५ टक्के, एस.सी.,एस.टी., ओबीसी व मुलींकरिता ६० टक्के तर अपंग मुलांना ५० टक्के मिळावेत, अशी अट असून, गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या शिष्यवृत्तीकरिता परीक्षा अथवा मुलाखत घेतली जात नाही.
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (के.व्ही.पी.वाय.)
ही योजना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दिली जाते. कर्तृत्ववान व प्रतिभावान विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन याकडे आकर्षित करण्याकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या योजनेअंतर्गत अकरावी विज्ञानशाखेत प्रवेश घेतलेले व दहावीला विज्ञान व गणित विषयात किमान ८० टक्के गुण प्राप्त आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. विविध कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाते. बारावीला किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. मूलभूत विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षांला शिकणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतात. बारावी विज्ञानशाखेत तसेच पदवीच्या पहिल्या वर्षांमध्ये किमान ६० टक्के आवश्यक आहे. दरमहा ५ हजार रुपये फेलोशिप मिळते व इतर खर्चाकरिता वार्षिक रु. २० हजार रु. अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत १ किंवा २ आठवडय़ांच्या उन्हाळी शिबिराचेही आयोजन केले जाते. संशोधन क्षेत्रातील वातावरण कृतिशील विज्ञान, संशोधकांना प्रत्यक्ष काम करताना पाहणे, शास्त्रज्ञांशी चर्चा करणे, भेटी देणे, तसेच राष्ट्रीय प्रयोगशाळांना, विद्यापीठांतील प्रयोगशाळा व लायब्ररीचा उपयोग घेता येतो. या सर्व संधी मिळविण्याकरिता पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.
जे. एन. टाटा एंडोमेन्ट स्कॉलरशिप योजना
ही योजना जमशेदजी टाटा यांच्या निधीतून दिली जाते. या शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी.च्या भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. दीड लाख आणि आठ लाख रु. शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान अर्ज भरावा. मार्च ते जूनमध्ये मुलाखत होऊन शिष्यवृत्ती देण्यात येते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ९२७३६६३०३२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करावे.
एल.आय.सी. गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप योजना ही शिष्यवृत्ती भारतीय जीवन विमा निगमकडून दिली जाते. बारावीत ६० टक्के गुण मिळविलेल्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना महिन्याला एक हजार रुपये म्हणजेच १० महिन्यांकरिता १० हजार रु. दिले जातात.
फुलब्राइट-नेहरू अधिछात्रवृत्ती (अमेरिका)
ही शिष्यवृत्ती फुलब्राइट कार्यक्रमांतर्गत अमेरिका आणि इतर देशांमधील परस्पर सामंजस्याचा भाग म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना व संशोधकांना पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये विदेश प्रवास खर्च, शैक्षणिक खर्च, राहण्याचा खर्च आदींचा समावेश केलेला असतो. या शिष्यवृत्तीकरिता महाविद्यालय, विद्यापीठ शाखा, संशोधक, माध्यमिक शाळा, शिक्षक, धोरणकर्ते, प्रशासक आणि व्यावसायिक इत्यादी व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरावे.
तंत्रशिक्षण संचालनालयाची अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती योजना
राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाने मुस्लीम-बौद्ध-ख्रिश्चन-पारशी-जैन इत्यादी अल्पसंख्याकांसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक बारावीनंतर सर्व कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी, पदव्युत्तर पदवी-पदविका, बी. टेक., एम.ई., एम.टेक. इत्यादी शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावे.
भारतीय विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या स्कॉलरशिप सिंगापूरद्वारे फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी एशियन स्कॉलरशिप, एस.आय.ए.युथ स्कॉलरशिप, ए-स्टार इंडिया स्कॉलरशिप, एम.ओ.ई., स्कॉलरशिप फॉर सेकंडरी आणि प्री-युनिव्हर्सिटी स्टडीज, हाँगकाँग स्कॉलरशिप आणि पुरस्कार इ. आहेत. ए-स्टार इंडिया युथ स्कॉलरशिपकरिता विद्यार्थी सातवी व आठवीमध्ये ८० टक्के गुण आवश्यक आहेत. २,२०० डॉलर (सेकंडरी) तसेच २,४०० सिंगापूर डॉलर (प्री युनिव्हर्सिटी) दिले जातात. या स्कॉलरशिपकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.
उद्यान शालिनी फेलोशिप प्रोग्राम (फक्त मुलींसाठी)
या शिष्यवृत्तीकरिता दहावीत ६० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरण्यास पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च दिला जातो, म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी घ्यावा.
मौलाना आझाद इंटरनॅशनल एसे स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन, अल्पसंख्याक मंत्रालय, केंद्र सरकार यांच्याद्वारे देण्यात येते. अकरावीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संपूर्ण खर्च, (पुस्तके, स्टेशनरी, निवासे व जेवणाचा संपूर्ण खर्च) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
सी.एस.आय.आर. इनोवेशन अवॉर्ड फॉर स्कूल चिल्ड्रन
ही शिष्यवृत्ती काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नवी दिल्ली यांच्याकडून दिली जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात. प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५० हजार, तृतीय ३० हजार, चौथा पुरस्कार २० हजार रुपये, पाचवा पुरस्कार १० हजार रुपये दिले जातात. या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येईल.
जवाहरलाल नेहरू स्कॉलरशिप योजना
ही शिष्यवृत्ती जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडकडून दिली जाते. पीएच.डी. करत असलेल्या विद्यार्थ्यांना १२ हजार रु. महिना व शैक्षणिक साहित्य व सहलीकरिता १५ हजार रु. वर्षांला दिले जातात. या शिष्यवृत्तीकरिता गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
आधार फाऊंडेशन स्कॉलरशिप योजना
या योजनेअंतर्गत पाचवी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. गुणवत्तेनुसार १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेकरिता १५ जानेवारी २०१४ पर्यंत अर्ज करता येईल.
चंद्रशेखर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
ही योजना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरूद्वारे देण्यात येते. अर्जदार विद्यार्थी खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकीशास्त्रामध्ये संशोधक करणारे असावेत.
महिना २५ हजार रु. विद्यावेतन तर एक लाख रुपये वर्षांला देण्यात येतात.
नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना
ही शिष्यवृत्ती नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटीद्वारे देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरिता वर्ग सहावी ते बारावी, वर्ग दुसरी ते वर्ग सहावी व वर्ग अकरावी ते वर्ग बारावी पर्यंतच्या सर्व मुला-मुलींना या स्पर्धेला बसता येते. सविस्तर माहिती घरपोच पाठविली जाते.
इंटरस्कूल करिअर स्कॉलरशिप (फक्त मुलींसाठी)
ही शिष्यवृत्ती १७ ते २३ वय वर्षांतील मुलींसाठी असून त्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरावा. या शिष्यवृत्तीमध्ये एकदा २५ हजार रु. दिले जातात. १७ ते २३ वयातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनी अर्ज करावेत.
नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन (नॅशनल ऑलिम्पियाड)
ही योजना होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्याकडून गुणवत्तेनुसार १२ विद्यार्थ्यांना नगदी व पुस्तकाच्या स्वरूपात ५ हजार रु. दिले जातात. या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी सातवी ते दहावीचे विद्यार्थी पात्र आहेत.
समर रिसर्च फेलोशिप योजना
ही शिष्यवृत्ती जवाहरलाल नेहरू रिसर्च सेंटर, बेंगलोरकडून देण्यात येते. दहावी, बारावी, बी.एस्सी., बी.एस.बी.ई., बी.टेक., एम.एस्सी. सर्वाना दोन महिन्यांचा स्टायपेंड सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात येतो. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा