पाठय़पुस्तकातला इतिहास वर्गाच्या चार भिंतींमध्ये शिकताना अनेकांना रूक्ष वाटते. यातूनच मग इतिहासातल्या सनावळ्या, अनेक पिढय़ांची जंत्री, घटनाक्रम यांची भीती वाटायला लागते. वैभवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आपल्या देशातल्या शालेय विद्यार्थ्यांना जर आपलाच इतिहास रूक्ष वाटत असेल तर त्यांच्यामध्ये देशप्रेम, जिद्द, त्याग करण्याची वृत्ती कशी निर्माण होणार? आणि जर हे हेतू साध्य होणार नसतील तर इतिहास शिकण्याचा काय उपयोग? नेमकी हीच अस्वस्थता पुण्यातल्या रमणबाग प्रशालेत इतिहास शिकविणाऱ्या मोहन शेटे सरांच्या मनात होती. या अस्वस्थतेमधूनच जन्म झाला तो ‘इतिहासप्रेमी मंडळ’ या गटाचा.
शेटे सरांना इतिहासाची जात्याच आवड. महाविद्यालयात असताना केलेली किल्ल्यांची भ्रमंती आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांमधून झालेले संस्कार यामुळे ऐतिहासिक घटनांची भव्यता, त्या घटना कुठे आणि कशा घडल्या हे लोकांना दाखवून इतिहास जिवंत करायचा असे शेटे सरांनी ठरवले. त्यासाठी विविध कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायची, हे निचित झाले. ज्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर शेटे सरांनी केला, त्यातले सर्वात परिणामकारक माध्यम म्हणजे ‘महानाटय़’ .
चाफेकर बंधूंनी रँडचा वध केल्याच्या घटनेला २२ जून १९९७ या दिवशी शंभर र्वष पूर्ण झाली. त्या निमित्ताने गणेशिखडीतल्या त्याच जागेवर हा प्रसंग रात्री ९ च्या सुमारास जसा घडला तसा सादर करण्यात आला. पुणे विद्यापीठातून निघालेली रँडची बग्गी, ‘गोंद्या आला रेऽऽ’ ही खुणेची हाक आणि बग्गीवर उडी मारून केलेला रँडचा वध. हा सारा नाटय़मय घटनाक्रम जसा घडला होता तसा पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकांनी अनुभवला.
महानाटय़ाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ऐतिहासिक घटना घडली आणि ज्यावेळी घडली त्याच ठिकाणी त्याच वेळी तो प्रसंग जसाच्या तसा सादर करून इतिहास जिवंत करायला शेटे सरांनी सुरुवात केली.
नरवीर तानाजी मालुसरे यांची ३३५ वी पुण्यतिथीसुद्धा अशाच अद्भुत प्रकारे साकारण्यात आली. इतिहासप्रेमी मंडळाच्या माध्यमातून शेटे सरांनी पुणे परिसरातल्या तरुण-तरुणींना आवाहन केले आणि तानाजी मालुसरे यांना अभिवादन करण्यासाठी ज्या कडय़ावरून तानाजी आणि त्यांचे मावळे दोर लावून चढले त्याच कडय़ावरून ३३५ युवक-युवती सिंहगडावर चढले.
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो. नि. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जून हा दिवस इतिहासप्रेमी मंडळातर्फे ‘दुर्गदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक गड किंवा किल्ला निवडला जातो. शेटे सर पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन या गडावर जातात आणि तेथे सगळेजण श्रमदान करतात. किल्ल्याच्या तटबंदीवर, बुरुजावर उगवलेली रोपे काढून टाकणे, किरकोळ दुरुस्ती करणे, प्लॅस्टिक आणि इतर कचरा गोळा करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे, गडावर ध्वजस्तंभ उभारणे अशी कामे त्या गडावर केली जातात. त्याचबरोबर जवळच्या गावातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत वेत्रचर्म, खडग्, दांडपट्टा अशा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा समावेश असतो.
पुणे परिसरात दिवाळीच्या दिवसांमध्ये किल्ले तयार करण्याची परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून दरवर्षी शेटे सर आणि त्यांचे कार्यकत्रे ४० फूट बाय ४० फूट आकाराची एखाद्या विशिष्ट किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार करतात. या किल्ल्याच्या सभोवती सुमारे १५० प्रेक्षकांच्या बैठकीची व्यवस्था केली जाते आणि मग या किल्ल्यावर घडलेले महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग, किल्ल्यावर झालेल्या लढाया यांचे सादरीकरण त्यानिमित्ताने केले जाते. वेगवेगळ्या घटनांच्या सादरीकरणासाठी संगणक, ध्वनी-प्रकाश योजना यांचा प्रभावी वापर केला जातो. दरवर्षी सुमारे पंधरा ते वीस हजार लोक शेटे सरांनी केलेला किल्ला पाहण्यासाठी आणि त्यांचे या किल्ल्याविषयीचे सादरीकरण पाहण्यासाठी येतात. चाकणच्या संग्रामदुर्गावरील फिरंगोजी नरसाळे यांनी केलेल्या लढाईला ३५० वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेटे सरांनी यंदाच्या दिवाळीत संग्रामदुर्गाची प्रतिकृती आणि तिथे झालेल्या लढाईचे प्रात्यक्षिक सादर केले होते.
इतिहास शिकताना सनावळ्या पाठ करणे आणि त्या लक्षात ठेवणे यामध्ये मुलांचा गोंधळ उडतो, इसवी सन पूर्व आणि इसवी सन या संकल्पना त्यांना नीट समजत नाहीत, असे शेटे सरांच्या लक्षात आले. इतिहासात घडलेल्या घटनांचा क्रम मुलांच्या लक्षात राहावा म्हणून शेटे सरांनी ८० फूट लंबीची कालरेषा रमणबाग प्रशालेत तयार केली. या कालरेषेवर इसवी सन पूर्व ५००० ते थेट इसवी सन २००९ पर्यंतच्या महत्त्वाच्या घटना दाखवल्या गेल्या. दोन घटनांमधील काळाचे अंतर समजण्यासाठी कालरेषेवरसुद्धा त्या प्रमाणात अंतर सोडण्यात आले आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन भागांत या घटना विभागल्या गेल्या आणि ठळक घटना चित्ररूपात रेखाटल्या गेल्या. या रेखाटनांमध्ये राम, मध्ययुगीन राजे यांच्यापासून ते लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशा सर्वाचा समावेश आहे.
इतिहास केवळ चार भिंतींच्या आत खडू-फळा घेऊन शिकवण्याचा विषय नाही. म्हणूनच शेटे सर विद्यार्थ्यांसाठी पुण्यातल्या ऐतिहासिक १३ स्मृतिस्थळांच्या भेटीचा उपक्रम राबवतात. या प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथे घडलेल्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना करून देतात. याशिवाय युवकांसाठी किल्ले गाईड प्रशिक्षण शिबिरे घेणे, ठिकठिकाणी व्याख्याने आणि कथाकथनाच्या माध्यमातून इतिहास सांगणे, ऐतिहासिक नाटकांसाठी संहिता लिहिणे, नाटकांचे दिग्दर्शन करणे असे अनेक उपक्रम सातत्याने शेटे सर राबवीत असतात.
इतिहास शिकवण्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारा हा शिक्षक. केवळ पुस्तके आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्येच रममाण न होता आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या त्या ठिकाणी इतिहास पुन्हा जिवंत करण्याच्या शेटे सरांनी सुरू केलेल्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीला मानाचा मुजरा.   
(समन्वयक : हेमंत लागवणकर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा