हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला सातत्याने मनुष्यबळाची गरज भासते. मात्र या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. या क्षेत्राला असलेली मागणी आणि उपलब्ध संधी यांचा लेखाजोखा –
जागतिक प्रवास व पर्यटन मंडळाने (डब्ल्यूटीटीसी)च्या आकडेवारीनुसार पर्यटनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेत ६.४ लाख कोटी रुपयांचा (६.४ ट्रिलियन) म्हणजेच देशाच्या सकल उत्पादनाच्या ६.६ टक्के वाटा २०१२ मध्ये होता. त्यातून ३९.५ दशलक्ष रोजगारनिर्मिती झाली होती. हे क्षेत्र आगामी १० वर्षांत वार्षिक ७.९ टक्के दराने विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दशकभरात पर्यटन उद्योग विकसित होत जाणाऱ्या देशांत भारत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच आतिथ्य क्षेत्राचाही समावेश होतो. त्याचीही झपाटय़ाने वाढ होत जाणार आणि त्यासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे जागतिक ख्यातीच्या अशा संस्थेची देशाला गरज आहे.
आतिथ्य उद्योगात असलेल्या संधी लक्षात घेता आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापनशास्त्रविषयक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर उत्सुक असतात.
आतिथ्य उद्योग हा आकर्षक, बहुआयामी आहे. अलीकडच्या काही वर्षांत हा उद्योग अर्थव्यवस्थेला गती देणारा, रोजगारनिर्मिती करणारा आणि बऱ्यापैकी परतावा देणारा ठरला आहे. विदेशी पर्यटकांची वाढती संख्या आणि देशांतर्गत पर्यटन करणाऱ्या देशी पर्यटकांची मोठी संख्या यामुळे या उद्योगाची वाढ झपाटय़ाने होत आहे. हवाई वाहतूक उद्योगात होत असलेली वाढही पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी पूरक ठरली आहे.
या क्षेत्रात आवडीनुसार विद्यार्थी हॉटेल व उपाहारगृह व्यवस्थापन, हवाई केटरिंग, केबिन सव्र्हिस, क्लब व्यवस्थापन, क्रुझ शिप हॉटेल व्यवस्थापन, वन लॉजेस, गेस्ट हाऊसेस, केटरिंग इन्स्टिटय़ूट, हॉटेल अॅण्ड टुरिझम असोसिएशन किंवा स्वत:चा व्यवसाय याची निवड करू शकतो. प्रगतीच्या संधी असल्याने कॅफे, बार अॅण्ड लाऊंज येथेही विद्यार्थी करिअर करू शकतील. उद्योगाची वाढच झपाटय़ाने होत असल्याने त्यांना सरव्यवस्थापक, खोल्या विभाग व्यवस्थापक, अन्न व पेये विभाग व्यवस्थापक, विपणन व विक्री व्यवस्थापक, शेफ व उपाहारगृह व्यवस्थापक अशा जागी काम करण्याची संधी मिळणार आहे. आतिथ्यशीलता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याव्यतिरिक्त बँकिंग क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, अन्न साखळी, संस्था, रुग्णालये आणि उद्योगांत असलेल्या कॅफेटेरियातही संधी आहे. त्यांना आतिथ्यशीलतेत प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते.
कौशल्यांचा विकास
आतिथ्य उद्योगातील करिअरमधून चांगला परतावा मिळतो. सेवेवर हा उद्योग उभा आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्यांचा सातत्याने विकास करत राहणे आणि मेहनती होणे आवश्यक आहे. आतिथ्य उद्योग हा मनुष्यबळप्रधान उद्योग आहे. त्यामुळे सातत्याने मनुष्यबळाची गरज या उद्योगाला असते. मात्र या क्षेत्राची निवड करणाऱ्यांना अतिशय कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. उद्योग क्षेत्राची मागणी आणि सध्याच्या दर्जानुसार सेवा देण्यासाठी अशा प्रशिक्षणाला पर्याय नाही.
या क्षेत्रात अनेक संधी असल्या तरी करिअरची निवड चोखंदळपणे करावी लागणार आहे. उद्योगाच्या विविध क्षेत्रांत काम करण्याची तयारी नसणाऱ्या व्यक्ती या उद्योगासाठी पात्र ठरणार नाहीत. व्यवसायाची गरज म्हणून कर्मचाऱ्याला व्यवस्थापन, अन्न व पेये सेवा, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस ऑपरेशन, विक्री व विपणन, लेखा किंवा अन्य कोणत्याही खात्यात गरजेनुसार काम करावे लागणे शक्य असते.
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने या क्षेत्राची वाढ १२ टक्के होईल असे लक्ष्य ठेवल्याने यातून अडीच कोटी रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. यात थेट व अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश आहे. २०१०-१६ साठीच्या १२व्या पंचवार्षिक योजनेत हे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
जागतिक पर्यटन नकाशावर जसजसे भारताचे नाव ठळक होत जाईल, तसतशी येत्या काही वर्षांत देशात या क्षेत्राची भरभराट होत जाईल, हे नक्की! याचे कारण पर्यटनाला बरकत आल्यामुळे नवीन हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स निर्माण होत जातात. आतिथ्यशीलतेचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांतून दरवर्षी उच्चशिक्षित उमेदवार बाहेर पडत आहेत. त्यात प्रशिक्षितांना नव्या लोकांपेक्षा जास्त संधी असतील, कारण प्रशिक्षणात हॉटेल्स गुंतवणूक करत नसतात.
आतिथ्य उद्योग हा नानाविध अनुभव देणारा आहे. अनेकदा त्यांचा उल्लेख उत्कंठा वाढवणारा असा केला जात असला तरी पडद्यामागे कठोर मेहनत व प्रयत्न दडलेले असतात. मात्र या क्षेत्राच्या सकारात्मक विकासामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उज्ज्वल भवितव्य आहे.
आतिथ्य सेवा आणि संधी
हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला सातत्याने मनुष्यबळाची गरज भासते. मात्र या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. या क्षेत्राला असलेली मागणी आणि उपलब्ध संधी यांचा लेखाजोखा -
आणखी वाचा
First published on: 18-08-2014 at 01:06 IST
TOPICSसंधी
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospitality management and opportunity