ज्याच्याकडे निर्मितीक्षमता आहे, ज्याचा दृष्टिकोन विकसित झालेला आहे, ज्याला प्रकाश-संधी प्रकाशाची उत्तम जाण आहे, जो सर्जनशील गोष्टींचा शिस्तबद्ध विचार करू शकतो, ज्याची चित्तवृत्ती निसर्गाशी आणि निसर्गत: उपजलेल्या बाबींशी एकरूप झाली आहे, ज्याला व्यक्तींच्या चेहऱ्याबरोबरच निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांच्या चेहऱ्यामोहऱ्यांचे अतोनात वेड आहे, अशी कोणतीही व्यक्ती उत्तम छायाचित्रकार बनू शकते. कदाचित त्याचे तथाकथित औपचारिक शिक्षण प्राथमिक स्तरावरचे असेल किंवा नसेलही. अशा छायाचित्रकारांचे व्यावसायिक आणि हौशी असे दोन प्रकार गणले जातात.
आवश्यक कौशल्ये
 उत्तम छायाचित्रकार व्हायचे असेल तर रंगसंगतीची उत्तम जाण हवी तसेच नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, आवड, जागरूकता ही कौशल्ये जोपासायला हवीत.
छायाचित्रणाच्या विविध शाखा
पूर्वीच्या एकसुरी कौटुंबिक छायाचित्राभोवती घुटमळणारी छायाचित्रणाची संकल्पना आता पूर्णत: बदललेली असून, आता व्यावसायिक छायाचित्रणाबरोबरच पोर्टेचर, फोटो जर्नालिझम, अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, जंगल फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, मेडिकल फोटोग्राफी या शाखांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आश्चर्य म्हणजे अशा स्पेशलायझेशन फोटोग्राफीमध्ये उत्तम पैसा, समाजमान्यता प्राप्त होते.
मात्र येथील वावरासाठी मोठय़ा धावपळीची गरज असते. वेळेचे बंधन पाळावे लागते. मेहनत, प्रसंगावधान हे गुण अंगी बाणवावे लागतात. शोध पत्रकारिता ताकदीची असावी लागते. एखाद्या घटनेची सुरुवात ते अंत यात बराच कालावधी जातो. तो कालावधी पार पाडण्याचा संयम असावा लागतो. छायाचित्रकाराकडे सर्वात महत्त्वाचा गुण असावा लागतो तो जनसंपर्काचा, सुहास्य वदनाचा आणि प्रसंग येईल त्याप्रमाणे स्वत:ला मुरड घालून अ‍ॅडजस्ट करून घेण्याचा..
पत्रकारितेच्या क्षमतेबरोबर तांत्रिक कौशल्यात हातखंडा मिळवणे गरजेचे असते. याशिवाय छायाचित्रासाठी योग्य पोज देण्यास समोरच्याला उद्युक्त करता आले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करता आली पाहिजे.
अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी
मोठमोठय़ा कंपन्याच नव्हे तर मध्यम शहरातील उद्योजक-व्यापारी आपली जाहिरात वृत्तपत्रे नियतकालिके विविध दूरदर्शन वाहिन्यांमधून देखण्या दृश्य स्वरूपात यावी म्हणून स्वतंत्रपणे अ‍ॅडव्हर्टाझिंग एजन्सीशी करार करतात.
अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीचा सरळ संबंध ग्राहकाशी येतो. त्यामुळे ग्राहकाचे समाधान हाच या शाखेचा आत्मा आहे. त्यासाठी चिकाटी, एकत्रित काम करण्याची मनापासून तयारी, समयसूचकता, अंतर्गत सजावटीचे भान, उत्तम सौंदर्यदृष्टी, तत्परता आणि उत्तम निर्मितीक्षमता हे गुण महत्त्वाचे ठरतात. महत्त्वाचे म्हणजे फोटोसाठी योग्य ती पोज देण्यास समोरच्याला उद्युक्त करता आले पाहिजे. त्यासाठी एखाद्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये उत्तम वेतनावर काम करता येते तसेच करारतत्त्वावर काम करीत इतर ठिकाणी पैसे कमावू शकता. किंबहुना अनुभव घेत टप्प्याटप्प्याने स्वत:ची जाहिरात संस्था काढता येते. मात्र त्यासाठी नियतकालिकांचे मालक-संपादक, केबल नेटवर्क, दूरदर्शन वाहिन्या यांच्याशी उत्तम संबंध असले पाहिजे. मोठमोठय़ा उद्योगांच्या उत्पादनाची तसेच शासकीय योजनांची इत्थंभूत माहिती जवळ बाळगताना त्यांचा फॉलोअप ठेवता यायला हवा. वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन वाहिन्या आणि उद्योजक-व्यापारी यांच्यातील मध्यस्थ म्हणून उत्तम काम करता आले पाहिजे. करारपत्र करताना आर्थिक गणिताचे उत्तम ज्ञान हवे. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्रात घडणाऱ्या बारीकसारीक बाबींच्या महत्त्वाच्या नोंदी असणे आवश्यक आहे. वैविध्यपूर्ण वाचन, संगणकावरील फोटोशॉपीच्या अगदी अलीकडच्या छायाचित्रणासंबंधित घडामोडींबरोबरच अशा व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्याकडे छायाचित्रणातील जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे उपजत भान असले पाहिजे.
फॅशन फोटोग्राफी
अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीबरोबरच आज आघाडीवर असलेली छायाचित्रणाची आणखी एक शाखा म्हणजे फॅशन फोटोग्राफी होय.
याच छायाचित्रणातील आणखी एक कमाल म्हणजे दागदागिन्यांचे छायाचित्रण. त्यातील बारीक कलाकुसरीची नोंद घेणारी फोटोग्राफी.
त्यामुळेच फॅशन फोटोग्राफीमधील कपडय़ांची, दागिन्यांची तसेच फॅशन पत्रकारिता इ. क्षेत्रातील फोटोग्राफी विशेष उल्लेखनीय ठरू शकते.
इंडस्ट्रिअल फोटोग्राफी
जागतिकीकरण, भारतीय उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी स्वीकारलेली नवी आव्हाने, जीवघेणी स्पर्धा, मालविक्रीची नवनवी तंत्रे, निर्यातीस मिळालेले प्रोत्साहन, आयात-निर्यात क्षेत्रातील औद्योगिक मालास उठाव मिळावा म्हणून तयार केलेली देखणी पत्रके इ. बाबींमुळे इंडस्ट्रियल फोटोग्राफीला मोठी अर्थमान्यता मिळाली आहे. मात्र यासाठी अशा छायाचित्रकारांकडे अतिसूक्ष्म दृष्टी असणे, औद्योगिक उत्पादनाच्या फिनीशिंगवर नजर राहणे, एकूण औद्योगिक उत्पादनाचा सरासरी तपशील कॅमेराद्वारे बंदिस्त करणे असे गुण असणे आवश्यक असते. शिवाय यासाठी उमेदवाराकडे उपजत शास्त्रीय दृष्टी असणे महत्त्वाचे ठरते. मोठमोठे उद्योग-व्यवसाय, व्यापाराला वाहिलेली नियतकालिके यांना अशा प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असते.
व्यावसायिक आणि हौशी फोटोग्राफी
छायाचित्रण व्यावसायिक तसेच हौशी अशा दोन
विभागांत विभागली गेली आहे. केवळ व्यावसायिक फोटोग्राफीतच उत्तम अर्थार्जन होते असे नाही तर हौशी छायाचित्रकारही छंद जोपासताना उत्तम पैसे कमवू शकतात. मात्र व्यावसायिक छायाचित्रकार पूर्णवेळ व्यवसाय करीत असल्याने त्यांची कमाई अर्थार्जनासाठीची एकमेव
कमाई असते. त्यामुळे ज्यांना छायाचित्रण व्यवसायात स्थिर व्हायचे आहे, त्यांनी याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे
योग्य ठरेल.
अभ्यासक्रम
छायाचित्रणाचे व्यावसायिक अभ्यासक्रम तीन महिने ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीचे असतात. तंत्रनिकेतने, आयटीआय तसेच खाजगी संस्थांमधून असे अभ्यासक्रम घेतले जातात. मास एज्युकेशनमध्ये तसेच बॅचलर ऑफ फाइन आर्टस्मध्ये छायाचित्रण हा विषय सक्तीचा असतो. काही ठिकाणी शैक्षणिक पात्रतेची गरज नसते. मात्र अनुभव, वय आणि छायाचित्रणाची जाण या आधारे छोटे छोटे अनौपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. तंत्रनिकेतने किंवा आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर उमेदवाराकडे दहावी किंवा बारावी अशी पात्रता लागते. छायाचित्रणाच्या अभ्यासक्रमात सर्व प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. त्यात केवळ फोटो कसे काढायचे एवढेच शिकवले जात नाही तर एक्सपोज उंची, कोन फिल्टर्स, डेव्हलपिंग, प्रिंटिंग इ. बाबी शिकविल्या जातात.
प्रशिक्षण संस्था
बॅचरल ऑफ फाइन आर्टस् किंवा उपयोजित कला यांचे अभ्यासक्रम पूर्ण करताना छायाचित्रणाचे प्रशिक्षण दिले जाते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन नवी दिल्ली तसेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग येथे छायाचित्रण हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. याशिवाय मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर जामिया इस्लामिया विद्यापीठ नवी दिल्ली येथे फोटोग्राफीचा पायाभूत अभ्यासक्रम घेतला जातो आणि उमेदवारांना पदवी दिली जाते.
या क्षेत्राकडे वळताना मुळात छायाचित्रणाची मुळात आवड, कलादृष्टी, मेहनत करण्याची तयारी असायला हवी.
वाइल्ड लाइफ फोटोग्राफी
छायाचित्रणामधील हौशी फोटोग्राफीसाठी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी हे एक आनंददायी आव्हान असते. प्राणिसंग्रहालय, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये हे अशा छायाचित्रणाचे वैशिष्टय़ असते. याशिवाय निसर्गाची, प्राणीजीवनाची जाण व अभ्यास असणे फार महत्त्वाचे ठरते. यात जोखीमेसोबत छायाचित्रकाराच्या वैयक्तिक खर्चाचे प्रमाण तितकेच मोठे असते. अलीकडे पर्यटन व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारला असल्याने वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा मोठा व्यवसाय झाला आहे. त्यामुळेच विशेषत: हौशी छायाचित्रकार मोठमोठाली प्रदर्शने भरवून किंवा अशा प्रकारची मोठमोठाली पोस्टर्स तयार करणाऱ्यांना आपले वाइल्ड लाइफ फोटो करार तत्त्वावर देऊन किंवा विकून मोठी आर्थिक कमाई करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा