कोणत्याही प्रकल्पामध्ये माहिती संकलन करणे, हा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असतो. माहितीचे संकलन हे प्रामुख्याने संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.यापूर्वीच्या भागामधून निरीक्षणे कशी घ्यायची, याविषयी सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. आज आपण सर्वेक्षण कसे करावे, हे जाणून घेऊया. सर्वेक्षण दोन प्रकारे केले जाते. पहिला प्रकार म्हणजे क्षेत्र अभ्यास, तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.
क्षेत्र अभ्यासावर आधारित असलेल्या सर्वेक्षणाचा भार हा प्रामुख्याने निरीक्षणांवर अवलंबून असतो. ही पद्धत प्रामुख्याने पर्यावरणविषयक भूगोल विषयाशी संबंधित किंवा निसर्गातील वेगवेगळ्या घटकांविषयी प्रकल्प करण्यासाठी प्रभावीपणे वापरली जाऊ शकते.
१. क्षेत्र विभाजन पद्धत : क्षेत्र अभ्यासासाठी निवडलेले क्षेत्र खूप मोठे असेल, तर संपूर्ण क्षेत्रामध्ये फिरून निरीक्षणे नोंदवणे अवघड जाते. त्यामुळे निवडलेल्या क्षेत्राचे लहान तुकडय़ांमध्ये विभाजन करून प्रत्येक तुकडय़ातील घटकांची संख्या वर्गीकरण करून नोंदवली जाते. या लहान तुकडय़ांमध्ये आढळलेल्या घटकांवरून संपूर्ण क्षेत्रामध्ये असलेल्या संख्येबद्दल अंदाज वर्तवला जातो. या पद्धतीला ‘क्षेत्र विभाजन पद्धत’ म्हणतात. ही पद्धत सर्वसाधारपणे, दिलेल्या क्षेत्रामध्ये किती व कोणत्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, खडकांचे नमुने, शंखशिंपले इत्यादी आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते.
क्षेत्र विभाजन पद्धत वापरून सर्वेक्षण करण्यासाठी प्रकल्पासाठी निवडलेल्या क्षेत्राचा काही भाग यादृच्छिक (random) पद्धतीने ठरवा. उदाहरणार्थ, प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी जर तुम्ही एखाद्या जंगलात किंवा डोंगरावर गेलात तर संपूर्ण जंगल फिरून निरीक्षणे घेणे शक्य होणार नाही. अशा वेळी जंगलाचा कोणताही एक भाग निवडा व त्या भागातली निरीक्षणे घ्या.
सर्वप्रथम आपण जो विभाग निरीक्षणे घेण्यासाठी निवडला आहे, त्याची समान क्षेत्रफळांच्या तुकडय़ांमध्ये विभागणी करा. हे चौरसाकृती तुकडे सोयीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे १ मीटर x १ मीटर क्षेत्रफळाचे किंवा १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळाचे घेतले जातात. निवडलेल्या क्षेत्रफळाचं अनेक लहान चौरसांमध्ये विभाजन करण्यासाठी जाड दोरा, काठय़ा इत्यादी साहित्याचा वापर करता येईल.
आता तुम्ही ज्या घटकांचे निरीक्षण करणार आहात, असे किती घटक प्रत्येक चौरसाकृती तुकडय़ांमध्ये आहेत, याची नोंद करा. उदाहरणार्थ, सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळाच्या १० चौरसांमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची संख्या नोंदवलेली आहे.
क्षेत्र विभाजन पद्धती वापरून मिळवलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण करताना सांख्यिकीतील पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे क्षेत्र विभाजन पद्धतीच्या साहाय्याने निरीक्षण केलेल्या घटकांची (म्हणजे वनस्पती, प्राणी, पक्षी, शंख शिंपले, खडकांचे नमुने, वेगवेगळ्या प्रकारची झुडपे, इत्यादी) वारंवारिता, निवडलेल्या क्षेत्रावरील त्या घटकाचा शेकडा आढळ, घनता, अशा राशींच्या किमती आपण ठरवू शकतो.
२. क्षेत्र विभाजनाची आरेखन पद्धत : क्षेत्र अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये आपण केलेल्या विभाजित क्षेत्राचा नकाशा योग्य प्रमाण घेऊन आलेख कागदावर काढला जातो. त्यानंतर आपण जसे क्षेत्र विभाजन प्रत्यक्षात केले आहे, तसे क्षेत्र विभाजन योग्य प्रमाण घेऊन आलेख कागदावर केले जाते.
उदाहरणार्थ, जर आपण १० मीटर x १० मीटर असे एकूण क्षेत्रफळ अभ्यासासाठी निवडून १ मीटर x १ मीटरच्या १० चौरसांमध्ये ते विभाजित केले असेल तर १ मीटर = १० सेंटीमीटर असे प्रमाण घ्या. म्हणजेच, १ मीटर x १ मीटरच्या क्षेत्रफळासाठी १० सेंटीमीटर x १० सेंटीमीटर आकाराचा आलेख कागद कापून घ्या. असे आलेख कागदाचे १० तुकडे तयार करा आणि ते एकमेकांना जोडून एक मोठा चौरस तयार करा. हा चौरस १०० सेंटीमीटर x १०० सेंटीमीटर मापाचा असेल.
हा मोठा चौरस म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्राची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय. आता वरील उदाहरणातील माहिती आपण या आलेख कागदावर आकृतीच्या साहाय्याने दाखवणार आहोत. त्यासाठी १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे स्थान लक्षात घेऊन त्याप्रमाणे आलेख कागदावर योग्य ठिकाणी खुणा करा. या खुणा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांसाठी वेगवेगळी चिन्हे किंवा रंग निश्चित करा आणि प्रत्येक वृक्षासाठी योग्य चिन्हाने किंवा रंगाच्या ठिपक्याने अचूक ठिकाणी आरेखन करा. अशा प्रकारे आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आरेखन केलेली प्रतिकृती मिळेल. प्रतिकृतीवरून मिळालेल्या माहितीचे नंतर विश्लेषण केले जाते.
३. रेषा आरेखन पद्धती : क्षेत्र अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये निवडलेल्या क्षेत्रातील एखादा मार्ग निश्चित केला जातो आणि या मार्गावर निरीक्षणे घेतली जातात.
रेषा आरेखन पद्धत वापरून क्षेत्र अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये सुमारे १०० मीटर लांबीची सरळ रेषा आखा. या रेषेवर येणाऱ्या वेगवेगळ्या रेषा आखून वेगवेगळ्या भागांतली निरीक्षणे घेता येतील. काही प्रकल्पांमध्ये ‘रेषा आरेखन पद्धत’ अत्यंत उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, ‘गायीगुरांच्या चरण्यामुळे विशिष्ट भागातील वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासणे’ अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये ही पद्धत प्रभावी ठरू शकते.
सर्वेक्षणाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय. पण, या प्रकाराबद्दल पुढच्या भागात!
प्रोजेक्ट फंडा : सर्वेक्षण कसे करावे?
कोणत्याही प्रकल्पामध्ये माहिती संकलन करणे, हा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असतो. माहितीचे संकलन हे प्रामुख्याने संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.यापूर्वीच्या भागामधून निरीक्षणे कशी घ्यायची, याविषयी सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे.
आणखी वाचा
First published on: 06-11-2012 at 01:21 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to do survey