उमेदवारांची विचारांची बठक किती पक्की आहे, तो आपल्या विचारांप्रती किती प्रामाणिक आणि ठाम राहतो याची चाचपणी मुलाखतीद्वारे केली जाते. चालू घडामोडी व महत्त्वाच्या सामाजिक, आíथक व राजकीय मुद्दय़ांबाबत चर्चा करून उमेदवाराची वैचारिक क्षमता तपासली जाते.
मुलाखत मंडळ सदस्य एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करून, याविषयी तुम्हाला काय वाटते, तुमचे मत काय असेल उमेदवाराला विचारतात. अशा वेळी उमेदवाराने डोळे झाकून त्यांच्या मताशी सहमती दर्शवणे बंधनकारक नसते किंवा मुलाखत मंडळाच्या मताशी विरोध मत मांडूनच आपली छाप पाडता येते, असेही नाही. मुलाखत मंडळाच्या मतावर उमेदवाराने आपले सुसंगत संतुलित आणि प्रभावी मत व्यक्त करायला हवे.
मुलाखत मंडळाचे सदस्य तुमच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन अंगीकारत असतील अथवा असहमती दर्शवत असतील तर लगेचच तुमचे मत बदलू नका. नम्रपणे तुमचे मत मांडण्याचा प्रयत्न करा. पण शरणागत वृत्ती नसावी. ‘तुमचे बरोबर आहे, पण याही दृष्टीने विचार करता येईल’ अशी वाक्यरचना करून मुद्दा वेगळया शब्दांत मांडता येईल. पण वाद घालू नका.
मागच्या वर्षी राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखतीत एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला होता- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एका लोकप्रिय दैनिकांत अग्रलेख प्रसिद्ध झाला होता त्याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? उमेदवाराने ‘हो सर’ म्हणून लगेचच त्या अग्रलेखाचे शीर्षकही सांगितले. उमेदवाराची सतर्कता आणि चालू घडामोडींविषयीची जाण पाहता नंतरची दहा मिनिटांची मुलाखत त्या एकाच विषयावर रंगली.
काही हलके-फुलके उमेदवाराच्या कल्पकतेला वाव देणारे साधे प्रश्नही विचारले जातात. जर ‘तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री/जिल्हाधिकारी पद मिळाले तर?’, ‘परमेश्वराने तुम्हाला वरदान मागायला सांगितले तर तुम्ही काय मागाल?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलाखत मंडळाचे सदस्य तुम्हाला कल्पनाविश्वात भराऱ्या मारण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देतात. पण उमेदवारांनी या प्रश्नांची व्यवहार्य उत्तरे द्यायला हवीत.
पुरेशी माहिती असेल तरच आपले मत ठामपणे मांडावे. तुमचे मत खोडून काढण्याची संधी मंडळाला मिळता कामा नये. अपुऱ्या वा चुकीच्या माहितीवर आधारावर मांडलेल्या मताचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात उमेदवार अडकत जातो. एक चूक लपविण्याच्या प्रयत्नात पूर्ण मुलाखत हातातून निसटण्याची वेळ येते. चुकीची माहिती दर वेळेस जाणीवपूर्वकच दिली जाते असे नाही. अशा वेळेस मुलाखत मंडळ सदस्य उमेदवाराची चूक निदर्शनास आणून देतात. तेव्हा नम्रपणे आपली चूक मान्य करावी. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मुलाखत मंडळाच्या सदस्यांचे आभार मानावेत.
काही वेळेस मंडळाचे सदस्य आपले मत एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या रूपाने देतात जे खोडून काढता येत नाही. अशा वेळेस तर्कवितर्क करत त्यांना चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करू नका. मुलाखती दरम्यान संवेदनशील सामाजिक मुद्दय़ांच्या संदर्भात प्रश्न विचारून तुमचा ताíकक विचार तपासला जाऊ शकतो. उदाहरणार्थ- दयामरण, समलंगिकता, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर उमेदवारांना त्यांचे मत विचारले जाऊ शकते किंवा सर्वोच्च/उच्च न्यायालयाने अथवा शासनाने एखाद्या सामाजिक विषयावर दिलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी तुमचा दृष्टिकोन आणि विचार स्पष्ट असायला हवेत. भावनाविवश न होता, एका विशिष्ट विचारधारेच्या अधीन न जाता तटस्थ, संतुलित मत व्यक्त करावे. आदर्शवादी उत्तरापेक्षा वास्तवाचे भान ठेवून व्यवहार्य उत्तर द्यावे.
मुलाखत म्हणजे ‘ग्रीलिंग सेशन’ नव्हे किंवा वादविवाद, खंडनाचे व्यासपीठ नव्हे प्रभावी संवादाद्वारे स्वतची मते विचार स्पष्टपणे मांडून प्रशासकीय सेवांच्या दालनात प्रवेश करण्याची एक संधी आहे. कधी कधी एका पाठोपाठ सलग दोन प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत अशा स्थितीत मुलाखतीचा शेवट होऊ शकतो. अशा वेळी आपले संतुलन बिघडू देऊ नका. चेहऱ्यावर नराश्याची छटा येता कामा नये. प्रसन्न चेहऱ्याने, आशावादी भावाने आणि आत्मविश्वासाने आपले आसन सोडावे आणि मुलाखत कक्षातून बाहेर यावे.
मुलाखतीची तयारी करण्याबाबतच्या वेगवेगळ्या पलूंची चर्चा मागील काही लेखांमध्ये करण्यात आली. पुढील काही लेखांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतीचा अनुभव कसा होता ते पाहू.