प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची खरी परीक्षा सुरू होते. या अभ्यासक्रमाची तयारी कशी कराल, याविषयीचा लेख…
एम.बी.ए. च्या प्रथम वर्षांमध्ये वेगवेगळे विषय अनिवार्य असतात. या विषयांचा चांगला पाया तयार व्हावा हा हेतू यामागे असतो. पहिल्या वर्षी हे विषय समजून घेऊन त्याचा सखोल अभ्यास केल्यास त्याचा लाभ निश्चितच दुसऱ्या वर्षीच्या अभ्यासात होतो.
एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षी काही विषय हे अनिवार्य असतात. आपल्याला पाहिजे त्या विषयामधघ्ये विशेषीकरण (स्पेशलायझेशन) दुसऱ्या वर्षी निवडावे लागते. काही विद्यापीठामध्ये एका वेळी दोन विशेषीकरणाचे विषय निवडण्याची सोय असते. तर काहींमध्ये मात्र एकावेळी एकच विशेषीकरणाचा विषय निवडता येतो. विद्यापीठाशी संलग्न परंतु अंतर्गत स्वायत्तता असलेल्या काही संस्थांमध्ये तसेच काही खासगी विद्यापीठांमध्ये पहिल्या वर्षांपासूनच विशेषीकरण करता येते. उदा. एम.बी.ए. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) किंवा एम.बी.ए. (मार्केटिंग) किंवा एम.बी.ए. (सुमन रिसोर्स मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमामध्ये पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष यामध्ये प्रत्येक विशेषीकरणाशी संबंधित असे विषय असतात. मात्र या अभ्यासक्रमामध्येसुद्धा काही विषय अनिवार्य असतात. उदा. व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, व्यावसायिक कायदे, व्यवस्थापकीय लेखांकन (मॅनेजमेंट अकौन्टन्सी) असे काही अपवाद सोडल्यास बाकीच्या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या वर्षी विशेषीकरण निवडावे लागते.
विशेषीकरण जरी दुसऱ्या वर्षी निवडावे लागत असले, तरी त्याची प्रक्रिया पहिल्या वर्षांपासूनच सुरू होते. याचे कारण म्हणजे पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष यामध्ये प्रत्येकाला एक प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. हा प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) आपण जे विशेषीकरण निवडणार त्या विषयाशी संबंधित असावा, अशी अपेक्षा असते. तसेच प्रकल्प अहवाल हा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर आधारित असावा. अहवालाविषयी सविस्तर चर्चा स्वतंत्रपणे करू.
विशेषीकरणाचे विषय निवडताना विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गोंधळ उडणे हे अतिशय स्वाभाविक आहे. यामध्ये मित्रमंडळी, नातेवाईक, आई-वडील, प्राध्यापक, व्यावसायिक तसेच कंपन्यांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम करणारे परिचित यांचे मार्गदर्शन घेता येते. मात्र कित्येक वेळा या मार्गदर्शनातून परस्पर विरुद्ध मते व्यक्त झाल्यामुळे गोंधळात भरच पडते. म्हणून गोंधळ कमी करण्यासाठी व योग्य निर्णय घेण्यासाठी विशेषीकरणाचे वेगवेगळे विषय, असलेल्या संधी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची आवड व कल या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
विशेषीकरणासाठी सर्वसाधारणपणे उपलब्ध असणारे पर्याय म्हणजे विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट), मनुष्यबळ विकास व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट), माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी), उत्पादन व कच्च्या मालाचे व्यवस्थापन (ऑपरेशन्स व मटेरिअल मॅनेजमेंट), आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) असे उपलब्ध असतात. काही विद्यापीठांमध्ये शेतीविषयक उद्योगांचे व्यवस्थापन (अॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट), पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट) हे विशेषीकरणही उपलब्ध
आहेत. तसेच माहिती तंत्र व्यवस्थापन या विषयाला संगणक व्यवस्थापन (कॉम्प्युटर मॅनेजमेंट) असेही नाव काही ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे उद्योजकता विकास हे विशेषीकरणही
घेता येते.
विशेषीकरणाच्या विषयाची निवड करताना लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट अशी, की प्रत्येक विशेषीकरणाला समान संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. विशेषीकरण हे मार्केटिंगमध्ये असो किंवा फायनान्समध्ये किंवा इतर कोणत्याही विषयामध्ये असो, संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र त्या त्या विशेषीकरणासंबंधी सखोल माहिती असणे व कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. अन्यथा संधी असूनही तिचा फायदा उठवता येत नाही.
विशेषीकरणाच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्याने एक विशेषीकरण निवडले तर इतर विशेषीकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते म्हणजे जर मार्केटिंग मॅनेजमेंट हे विशेषीकरण घेतले तर इतर विशेषीकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष होते. यातला मुद्दा असा, की विशेषीकरण कोणतेही असो इतर विशेषीकरणाच्या विषयांची माहिती करून घेणे हे आवश्यक आहे. पुढे एखाद्या कंपनीत काम करताना किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यानंतर असे लक्षात येते, की व्यवस्थापनाची सर्व कार्ये ही एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यापुढे एका विषयामध्ये विशेषीकरण करताना इतर विशषीकरणाच्या विषयांकडे दुर्लक्ष करणे हे पुढे अडचणीचे ठरू शकते.
विशेषीकरणाची निवड करताना सर्वसाधारणपणे असा अनुभव आहे, की विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) या विषयाला सर्वात जास्त पसंती दिली जाते. यामध्ये नोकरीच्या असलेल्या संधी हे कारण आहेच. पण त्याचबरोबर उत्तीर्ण होण्यास सोपा हेही कारण आहे. यामुळे आपली स्वत:ची आवड आणि कल लक्षात न घेताच विषय निवडला जातो. याचा परिणाम पुढील करिअरवर होऊ शकतो.
विपणन व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, सरकारी व निमसरकारी संस्था, बँका, विमा कंपन्या, हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्या तसेच सेवा क्षेत्रातील संस्था यांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र या संधी मिळवण्यासाठी विपणन विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे हे नितांत आवश्यक आहे. याचबरोबर विपणन व्यवस्थापनातील आधुनिक संकल्पना, विपणन विषयक कायदे, विपणन संशोधन (मार्केटिंग रिसर्च) हे विषय सुद्धा सखोलपणे अभ्यासणे तितकेच आवश्यक आहे. याशिवाय चांगले संवादकौशल्य, शारीरिक व मानसिक ताणतणाव सहन करण्याची क्षमता यांची पण आवश्यक
आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाची मनापासून आवड पाहिजे. विपणन क्षेत्रात होणाऱ्या विविध घडामोडी माहिती
असल्या पाहिजेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयामध्ये काय बदल होत आहेत आणि हे बदल समजून घेऊन त्यांचा आपल्या करिअरवर काय परिणाम होऊ शकेल हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. या सर्व गोष्टी करायच्या म्हणजे वेळ न घालवता, मिळणाऱ्या वेळेच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून आपली पात्रता वाढवत नेली पाहिजे. नेमके येथेच एम.बी.ए.चे विद्यार्थी-विद्यार्थिनी मागे पडतात. विपणन विषय, उत्तीर्ण होण्यास सोपा असा गैरसमज करून घेऊन त्यापुढे संस्थेतील तासांकडे दुर्लक्ष केले जाते व परीक्षेत केवळ उत्तीर्ण होण्यासाठी वरवरचा अभ्यास करून एम.बी.ए.ची पदवी मिळवली जाते. मात्र नोकरीसाठी मुलाखत देताना मात्र सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना तारांबळ उडते. यासाठी केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे हे ध्येय न ठेवता, विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून स्वत:ची पात्रता वाढवत नेणे हे ध्येय असले पाहिजे.
केवळ नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. सारांशाने असे म्हणता येईल, की विपणन व्यवस्थापनामध्ये संधीची कमतरता अजिबात नाही. स्वयंशिस्त तसेच स्वयंअभ्यास यांच्या जोरावर यशस्वी करिअर करता येईल.
वित्तीय व्यवस्थापनाबाबत (फायन्शिअल मॅनेजमेंट) सुद्धा असेच म्हणता येईल. सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जरी थोडा मंदावला असला, तरी भविष्यातील वाटचाल ही आशादायक आहे असे म्हणता येईल. यापुढे वित्तीय व्यवस्थापनामध्ये सुद्धा असंख्य क्षेत्रे उपलब्ध आहेत. मात्र या क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करण्यासाठी विषयांच्या मूलभूत संकल्पनांची स्पष्ट समज असली पाहिजे. याबरोबरच विश्लेषणात्मक क्षमता असण्याची गरज असते.
बँका, विमा कंपन्या, औद्योगिक क्षेत्र यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच शेअर मार्केट, फायनान्शिअल प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट, गुंतवणूक सल्लागार आदी नवीन क्षेत्रेही आज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर डेरिव्हेटिव्हज फ्युचर्स व ऑप्शन्स म्युच्युअल फंड्ज या क्षेत्रामध्येही करिअर करता येते. एम.बी.ए. करतानाच शक्य झाल्यास कॉस्ट अकौन्टिंग किंवा कंपनी सेक्रेटरी यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अक्षरश: अमर्याद संधी उपलब्ध होतात. मात्र यासाठी स्वत:ला काही चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. यामध्ये विषय नीट समजून घेणे, त्यासाठी प्राध्यापकांची मदत घेणे, ग्रंथालयाचा व इंटरनेटचा योग्य वापर करणे, विषयांशी संबंधित अवांतर वाचन वाढवणे याचा समावेश होतो.
वित्तीय व्यवस्थापन हा विषय घेणाऱ्यामध्ये एक गैरसमज जो नेहमी आढळून येतो आणि तो म्हणजे या क्षेत्रामध्ये कॉस्ट अकौन्टन्ट किंवा चार्टर्ड अकौन्टट यांच्याशी स्पर्धा करावी लागेल व त्यामध्ये आपण मागे पडू. यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे, की कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा राहणारच व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे स्वत:ची पात्रता वाढवत नेणे. स्वत:ची पात्रता वाढवण्यासाठी एम.बी.ए. च्या दोन वर्षांतील वेळ वाया न घालवता, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. पुढील लेखामध्ये इतर विशेषीकरणाचा विचार करू.
(क्रमश:)
career.vruttant@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा