नोकरी, काम बदलणं, न बदलणं, बांधिलकी, सातत्य, समाधान, अधिकार, आर्थिक प्राप्ती, सुरक्षितता अशा कित्येक गोष्टी ‘आपलं काम’ या विषयाशी निगडीत असतात. अनेक प्रकारचे उद्गार, चर्चा आपल्याला ऐकू येतात आणि प्रश्न पडतो, ‘काय चूक आणि काय बरोबर?’
‘हल्ली मला खूप अस्वस्थता येते. आपण एवढी र्वष केलेल्या कामाला काही अर्थच नव्हता. या भावनेनं बेचन व्हायला होतं..’
बऱ्याच वर्षांपूर्वी जिल्हय़ाच्या गावात एका कंपनीसाठी कॉम्प्युटरायझेशनचं काम करताना एक तरुण अकाऊंटंट मला म्हणाला. कॉम्प्युटरला हात लावणं म्हणजे थोर वाटण्याचा तो काळ. जिल्ह्य़ाच्या गावात तर लोकांना त्याची अपूर्वाई एवढी असायची की कॉम्प्युटर वापरूनसुद्धा आपल्याला तो वापरता येतोय असा विश्वास नसायचा. अशा परिस्थितीत कॉम्प्युटर बेसिक्स पटकन आत्मसात करणारा आणि समजून, चोख काम करणारा हा माणूस आमचा आधार होता. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तो म्हणाला, ‘अहो, कॉम्प्युटर नव्हता, तेव्हा मी कॅशबुक, सेल्स रजिस्टर, सगळ्यामधून लेजरला एन्ट्री करायचो. बॅलन्स शीट टॅली करणं तर चॅलेंजच वाटायचं. गेल्या वर्षभरात आपण कॉम्प्युटर सिस्टीम सेट केली तेव्हाही नवीन काहीतरी शिकायचं, आणखी कोणते रिपोर्ट्स कॉम्प्युटरवर काढता येतील ते बघायचं असं सगळं मस्त होतं. आता सिस्टीम सेट झाली. एन्ट्री करायला मला फक्त २० मिनिटं लागतात. हल्ली एकसुद्धा चूक होत नाही एवढं हातात बसलंय. प्रॉफिट अँड लॉसपर्यंत सगळं लगेच समोर दिसतं. आता मला प्रश्न पडतोय की, मी तासभर काम करून दिवसाचा पगार कसा घेऊ? आणि गेल्या आठ वर्षांत मी जे कौशल्य मिळवलं ते तर आता निर्थकच झालं. तुम्ही कॉम्प्युटरवाल्यांनी कंपनीची घडी नीट बसवलीत, पण माझं समाधान काढून घेतलंत,’ तो हसून म्हणाला.
मीही हसले, पण त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. ‘हातात वेळ मिळतोय तर नवीन शिका, साहेबांना तुमची कुवत माहीत आहे, ते नवीन जबाबदारी देतील, केलेलं काहीच वाया जात नाही, या कंपनीत अर्धा दिवस काम करून आणखी एका कंपनीचं काम घ्या’ असे पर्याय मी त्याला सुचवले, पण त्याचा चेहरा विचारमग्नच असायचा. चार महिन्यांनी फॉलोअपसाठी गेले तेव्हा त्यानं नोकरी सोडून मोठं दुकान टाकल्याचं समजलं. ‘वेडा आहे. चूक करतोय. एवढी चांगल्या पगाराची नोकरी होती, मान होता, साहेबांना आपला एक हातच गेल्यासारखं वाटलं..’ त्याचे सहकारी सांगत होते.
त्यानं चूक केलं की बरोबर?
माझ्या एका मत्रिणीनं रिझव्र्ह बँकेतली ऑफिसरची नोकरी सोडली. कारण रोजचं पुणे-मुंबई अपडाऊन करून काम काय तर दिवसभर प्रत्येक बंडलात शंभर नोटा आहेत ना? ते एकेक नोट मोजून तपासायचं. (त्या वेळी काऊंटिंग मशीन्स नव्हती.) पगार भरपूर होता, पण तिला वेड लागायची वेळ आली. कसंबसं वर्षभर करून तिनं पसे साठवले आणि नोकरी सोडली, पुढे प्राध्यापकी केली. सर्वानी तेव्हा तिचा निर्णय वेडेपणाचा आणि चुकीचाच ठरवला होता.
नोकरी, काम बदलणं, न बदलणं, बांधीलकी, सातत्य, समाधान, अधिकार, आíथक प्राप्ती, सुरक्षितता अशा कित्येक गोष्टी ‘आपलं काम’ या विषयाशी निगडित असतात. अनेक प्रकारचे उद्गार, चर्चा आपल्याला ऐकू येतात आणि प्रश्न पडतो, ‘काय चूक आणि काय बरोबर?’
‘हल्ली जरा मोठं पॅकेज मिळालं की लगेच काम सोडतात माणसं. ही धरसोडवृत्ती काय कामाची? बांधीलकी हवी.’ असं मागच्या पिढीतले म्हणतात.
अनेक कंपन्यांच्या वर्धापन दिनाला ३०-३५ र्वष कंपनीत कार्यरत असणाऱ्यांचा कुटुंबीयांसह सत्कार होतो, अलीकडे ती ‘बातमी’ असते. नव्या पिढीला तर ‘एवढी वर्षे यांनी एकाच ठिकाणी, न कंटाळता, आनंदानं कशी काढली?’ याचं आश्चर्य वाटतं.
अंगात पात्रता आणि क्षमता असताना, वेगळं काही करण्याची संधी मिळूनही अनेक स्त्रिया नोकरी बदलत नाहीत, कारण त्यातून घराला मिळणाऱ्या स्वास्थ्य- सोय- सुरक्षिततेचं प्राधान्य त्यांच्यासाठी जास्त असतं. मात्र आपण अडकून पडलो, आपल्या क्षमतेएवढं पुढे जाऊ शकलो नाही याची खंत मनात कायम असते.
काही शासकीय/ खासगी कर्मचारी आपल्या नोकरीवर, तिथल्या वातावरणावर पहिल्या दिवसापासून नाराज असतात. कितीही बॉस बदलले तरी त्यांची नाराजी कायम असते. तरीही कंटाळलेल्या मूडमध्ये ते निवृत्तीपर्यंतचं आयुष्य काढतात. याउलट काही आपल्या कामाच्या कम्फर्ट झोनमध्ये असतात. ‘इथल्याशिवाय दुसरीकडे कुठे काम करणं मला जमणारच नाही’ अशी खात्री असते. तरीही जॉब सोडून गेलेल्या एखाद्या सहकाऱ्याबद्दल त्यांना असूया वाटते.
बहुसंख्य लोक (अनेकदा आयुष्यभर) या चूक-बरोबरच्या संभ्रमात सापडलेले दिसतात. खरंतर ‘हे चूक’ किंवा ‘हे बरोबर’ असं एकच उत्तर देणं अवघडच. ते खूप सापेक्ष असतं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतं. तसं तर कुठल्याही निर्णयामध्ये काही फायदे तर काही तोटे असतातच. पण निर्णय जड जातो, कारण कुणाशी तरी, कशाशी तरी मनात सतत तुलना चालू असते. त्यातून ‘अमका किती झटकन पुढे गेला, मी नेहमी चुकीचेच निर्णय घेतो’ असं बरेच लोक सांगतात आणि तरीही ‘आपला निर्णय बरोबर आहे’ यावर समोरच्याकडून शिक्कामोर्तबाची अपेक्षा करतात. पसा आणि संधी महत्त्वाची मानून जॉब बदलणं ठीक, की आवड, आपलेपणा, बांधीलकी, मानसिक गुंतवणूक, समाधान हे महत्त्वाचं?
माझ्या परिचयातले काही जण कुठलंही काम करताना, ‘हे केल्यामुळे माझ्या सीव्हीत भर पडतेय का?’ एवढंच पाहतात. तेच तेच करून कंटाळा येतो, आव्हान हवं, नावीन्याची ओढ असावी हे खरं, पण फक्त ‘वेगळं काही मिळत असेल तरच मी करणार’ हे विधान जीवनविषयक सत्य बनलं तर तुम्ही एकतर आळशी बनता किंवा कालांतराने विषण्ण. कारण असं काम रोज कुठून येणार?
मग काय चूक आणि काय बरोबर? काम बदलण्याबाबत, स्वीकारण्याबाबत निर्णय कसे घ्यायचे? कुठल्या मुद्दय़ांचा आधार घ्यायचा? कुठले ठोकताळे तपासायचे, ज्यामुळे ‘आपल्या दृष्टीने योग्य’ निर्णयाला पोहोचणं सोपं होईल?
काहींसाठी पसा किंवा पर्कस् ही खरंच गरज असते. घरात अडचणी, आजारपणं, जबाबदाऱ्या असतात, त्यांच्यासाठी ‘चॉइस’ नसतोच. ज्यांच्यासाठी पसा हेच सर्वस्व असतं त्यांना असले प्रश्नही पडत नाहीत. प्रश्न पडतात ते मधल्यांना, ज्यांना पर्याय उपलब्ध असतात. तिथे ‘आपली निवड’, त्यासाठी द्यावी लागणारी किंमत आणि तिचं परवडणं (Choice, Price & Affordability) यानुसार निर्णय होतात.
योग्य प्रश्न आपल्याला योग्य उत्तराच्या दिशेनं नेतात. ‘चूक की बरोबर?’ हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. ‘आपल्याजवळ काय आहे? आणि ‘आपल्याला काय हवं आहे?’ यानुसार प्राधान्यक्रम ठरवणं, मानसिक, आíथक, सामाजिक सर्व घटकांचा विचार करणं, म्हणजेच डेटा वापरणं नेहमी वस्तुनिष्ठ उत्तराकडे नेतं. उदा. वर उल्लेख केलेल्या अकाऊंटंटला कंपनीतला सन्मान आणि पगार यांनी काही काळ अडवलं असणारच. पण ‘डोक्याला काम असणं’ हे आपलं पहिलं प्राधान्य; पसा-सन्मान त्यानंतर. हा प्राधान्यक्रम स्पष्ट झाल्यावर त्याने सहजपणे नोकरी सोडली.
आपल्याला कुठल्या दिशेनं वाढायला हवं आहे, याचा शोध घेणं अशा वेळी आवश्यक ठरतं. हल्ली सीव्ही लिहिण्याची पद्धत थोडी बदलली आहे. फक्त अनुभवाच्या ओळींच्या बुलेट्स वाढवण्याऐवजी ‘या कामामुळे माझ्यात कुठल्या क्षमता निर्माण झाल्या किंवा वाढल्या?’ हे त्या त्या कामाखाली लिहिलं जातं. असा सीव्ही म्हणजे आपली कुंडलीच असते, जी आपल्याला स्वत:बद्दल स्पष्टता देते. आपल्या चांगलं केलेल्याची यादी समाधान देते. आणि कुठली क्षमता आणखी वाढवली पाहिजे ते सांगते. आपल्याला सध्या एवढंच करणं शक्य आहे हे भानदेखील देते, ज्याची वस्तुनिष्ठ निर्णयासाठी मदत होते.
मानसिक असमाधान शोधण्यासाठीही काही प्रश्न उपयोगी ठरतात. ‘कामातल्या नाराजीबद्दल आपण वर्षांनुर्वष तेच तेच बोलतो आहोत का? न आवडणारं काम आपण कशासाठी करतो आहोत?’ वर्षांनुवर्षे अशा महत्त्वाच्या इच्छेसाठी काही प्रयत्न न करता फक्त उगाळत राहण्यातला विनोद आपला आपल्याच लक्षात यायला हवा. मनातला कुठला सल आपला जास्तीतजास्त वेळ आणि ऊर्जा घेतोय ते शोधून स्वीकारल्यामुळे त्याची बोच कमी होते. वर्तमानात जगायला मदत होते. हे अडकलेपण अनेक प्रकारचं असतं. भूतकाळातल्या इच्छा, समजुती-धारणा, आíथक अपेक्षा, आदर्शवाद असं बरंच काही आपल्याला सवयीने अडवत असतं.
आपल्याला कुठली ‘प्राइस’ मिळतेय म्हणून आपण असं तक्रार करत जगणं स्वीकारलंय? हे शोधायला हवंच. सध्याच्या नोकरीतले अधिकार, लाभ सोडवत नसतील, असुरक्षिततेत उडी मारण्याचं धाडस होत नसेल तर ते स्वीकारून टाकलं पाहिजे. उगीचच दाखवण्यापुरतं तक्रार करत राहण्यानं काय मिळतं? या स्वीकारामुळे ‘मला अमुकअमुक घडायला हवं होतं’ ही मनाची भुणभुण थांबते. मात्र त्यासाठी ‘मला आज आनंदी असायचं आहे’ हे पक्कं ठरवावं लागतं. परिस्थितीचा स्वीकार केला तर कामातही शंभर टक्के देता येतात आणि दुसऱ्या दिशेलाही आनंद शोधता येऊ शकतो. स्वत:च्या आवडींकडून, छंदांकडून आनंद आणि समाधान मिळवता आलं की मग ‘काय चूक आणि काय बरोबर?’ किंवा ‘मला योग्य निर्णय घेता येत नाहीत, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी नेहमीच चुकते/चुकतो का?’ असले प्रश्न सतावत नाहीत. आपला सीव्हीच आपल्याला दिशा देतो. मनाची तगमग थांबते, तक्रार थांबते, तुलना थांबते आणि आपण आतून, खरोखरचे आनंदी बनतो.
neelimakirane.com
नोकरी बदलाकडे कसं पाहाल?
नोकरी, काम बदलणं, न बदलणं, बांधिलकी, सातत्य, समाधान, अधिकार, आर्थिक प्राप्ती, सुरक्षितता अशा कित्येक गोष्टी ‘आपलं काम’ या विषयाशी निगडीत असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How u will see toward changing work