ए म.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट) हा स्पेशलायझेशनचा एक पर्याय आहे. ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या विभागामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे व अशा कामाची मनापासून आवड आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक कंपनीमध्ये तसेच सहकारी व निमसरकारी विभागामध्ये मनुष्यबळ संवर्धन व विकास (ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट) हा विभाग असतो. या विभागामार्फत कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन, कर्मचाऱ्यांची बढती, अकार्यक्षम कर्मचाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करणे, वेतनवाढीसाठी करावे लागणारे करार तसेच कर्मचारी आणि कामगारविषयक असणाऱ्या वेगवेगळ्या कायद्याचे पालन करणे आदी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. असे म्हटले जाते की, कर्मचारी हे कोणत्याही संस्थेमध्ये, हे सर्वात महत्त्वाचे घटक असतात, त्यामुळेच त्यांना ‘ह्य़ुमन रिसोर्स अ‍ॅसेट्स’ असे म्हटले जाते. कर्मचाऱ्यांची योग्य त्या प्रकारे काळजी घेणे तसेच त्यांचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे, कार्यक्षम कर्मचाऱ्यांना सर्वप्रकारे उत्तेजन देणे हे सर्वच संस्थांना महत्त्वाचे आहे. पण याच वेळी असेही निदर्शनास येते की, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट) हे कौशल्याचे काम आहे. त्यामुळे या विभागामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांनी आपल्यामध्ये या कामासाठी लागणारी कौशल्ये आहेत किंवा नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. तसेच वेळोवेळी आपली याबाबतची पात्रता कशी वाढेल याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी या स्पेशलायझेशनमध्ये शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे या स्पेशलायझेशनमध्ये पुढील विषयांचा समावेश असतो.
१) मनुष्यबळ व्यवस्थापन व विकास (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) : या विषयामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे तसेच व्यवस्थापनाची कार्ये म्हणजेच मनुष्यबळ नियोजन (मॅनपॉवर प्लॅनिंग), कर्मचाऱ्यांची भरती व त्यामधील विविध पद्धती, प्रशिक्षण, कार्याचे मूल्यमापन, कार्यक्षम कर्मचाऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या विविध पद्धती, एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत अंतर्गत चौकशी करायची असल्यास सदर चौकशीची पद्धत, याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी करायच्या विविध उपाययोजना इ. महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. या विषयावरून, कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाबाबतचे वेगवेगळ्या पैलूची कल्पना येते. तसेच मनुष्यबळ विकास विभागामध्ये काम करीत असताना, कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी काय करणे आवश्यक आहे याचीही कल्पना येते. हे काम आव्हानात्मक तर आहेच, पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या विकासात आपल्यासुद्धा वाटा आहे याची जाणीव समाधान देणारीसुद्धा आहे.
२) कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन (परफॉर्मन्स अप्रेझल) : कार्याचे मूल्यमापन हा कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाचाच एक भाग जरी असला तरी या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन, याविषयी एक स्वतंत्र पेपर हा अनेक विद्यापीठांमध्ये आहे. कार्याचे मूल्यमापन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. या पद्धतींचा वापर करून प्रत्यक्ष मूल्यमापन कसे करावे यासंबंधींचा अभ्यास या विषयामध्ये अपेक्षित आहे. कार्याचे मूल्यमापन हे वस्तुनिष्ठपणे कसे करावे यासंबंधीची माहिती या विषयाद्वारे होते. मूल्यमापन वस्तुनिष्ठ न झाल्यास त्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला झुकते माप दिले जाते आणि त्याचा विपरीत परिणाम सर्व कर्मचाऱ्यांवर होऊन कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. या विषयाचा अभ्यास करताना, मूल्यमापनाची मूलभूत तत्त्वे तर समजून घेतलीच पाहिजेत, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे कार्य कसे चालते हे प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. तसेच मूल्यमापनाच्या नवीन येणाऱ्या पद्धती समजावून घेतल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाबाबत जगामध्ये अनेक ठिकाणी संशोधन झाले आहे. या संशोधनाची माहिती करून घेतल्यास त्याचाही खूप फायदा होतो.
३) कामगारविषयक कायदे (लेबर लॉज) : कर्मचाऱ्यांचे, विशेषत: कामगारांचे हित जपण्यासाठी आपल्या देशात अनेक कायदे केलेले आहेत. उदा. फॅक्टरी अ‍ॅक्ट, किमान वेतन कायदा, वेतनविषयक कायदा (पेमेंट ऑफ वेजेस अ‍ॅक्ट), प्रॉव्हिडंट फंड कायदा, नुकसानभरपाईविषयक कायदा, बोनस कायदा इ. या सर्व कायद्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, अनावधानाने एखाद्या कायद्याचे उल्लंघन झाल्यास, कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते, या विषयामध्येसुद्धा कायदा समजावून घेण्याबरोबरच, कामगार न्यायालयाला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाज समजावून घेतल्यास त्याचा फायदा होतो. याचबरोबर कामगारविषयक वेगवेगळ्या खटल्यांमध्ये, न्यायालयांनी दिलेले निर्णय याचाही अभ्यास केला पाहिजे. या अभ्यासामधून, कायद्याच्या तरतुदींचा कशा प्रकारे अन्वयार्थ लावला जातो याची कल्पना येते.
४) औद्योगिक संबंध (इंडस्ट्रियल रिलेशन्स) : औद्योगिक संस्थांमध्ये औद्योगिक संबंध हा एक महत्त्वाचा घटक आहे. या विषयामध्ये वेगवेगळ्या कायद्यांप्रमाणेच, औद्योगिक संबंध सुरळीत राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मार्गाचा समावेश केलेला असतो. या विषयाचा अभ्यास करताना, केस स्टडीचा वापर केल्यास प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, हे समजते. त्या दृष्टीने वेगवेगळ्या कंपन्यांना भेटी देऊन, तेथील कर्मचारी संघटना तसेच अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यास उपयोग होतो.
५) टॅलेन्ट मॅनेजमेंट : या विषयाचा अंतर्भाव अलीकडच्या काळामध्ये केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेले विविध गुण ओळखून ते कसे वाढवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणे यासारख्या घटकांचा समावेश होतो. कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रोत्साहन न दिल्यास, ते कंपनी सोडून जण्याची शक्यता असते. यामुळे असे कार्यक्षम कर्मचारी कंपनीमध्ये कसे टिकून राहतील यासाठीची उपाययोजना माहिती असली पाहिजे.
६) स्ट्रॅटेजिक ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट : वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकापेक्षा अधिक दर्जेदार वस्तू पुरवणे हा एक प्रमुख उपाय आहे. यामध्ये मनुष्यबळ विभागाचा मोठा वाटा आहे. कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवता येईल, या दृष्टीने सतत उपाययोजना करीत राहणे हे आवश्यक आहे. कार्यक्षमता वाढवीत नेल्यास, स्पर्धात्मक फायदा मिळून कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होईलच, पण त्याचबरोबर आर्थिकदृष्टय़ा सक्षम होईल, यादृष्टीने स्ट्रॅटेजिक ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाची रचना केलेली आहे.
वरील प्रमुख विषयांबरोबरच प्रशिक्षण व विकास (ट्रेनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) यासारख्या महत्त्वाचा विषयाचासुद्धा समावेश आहे. तसेच मनुष्यबळ विकासामधील जागतिक स्तरावर मनुष्यबळ विकासामध्ये जागतिक परिस्थिती (ग्लोबल ह्य़ुमन रिसोर्स ट्रेन्ड्स) या विषयावरून जागतिक स्तरावर मनुष्यबळ विकासामध्ये काय बदल झालेले आहेत, याचा अभ्यास करता येतो.
सारांश मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विभाग आहे की, ज्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी मूलभूत तत्त्वांबरोबरच, कंपन्या व संस्थांमधील प्रत्यक्ष परिस्थिती, केस स्टडी, संस्थांना भेटी यासारख्या ३० मार्गाचा वापर केल्यास यशस्वी करिअर करता येते.                
               

Story img Loader