मुलांच्या भावनांचा पट पालकांनी कसा उलगडावा, याविषयी डॉ. संदीप केळकर लिखित ‘जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकातील लेख-
मुलांमध्ये पंचेंद्रियांद्वारे ज्ञनार्जन होत असतं. दृष्टी, आवाज, चव, गंध आणि स्पर्श यामार्फत मुलं विविध संवेदना अनुभवत असतात. या संवेदनांचं शरीरामध्ये (व मेंदूमध्ये) संक्रमण होत असताना मनामध्ये विविध प्रकारच्या रंगांचे, भावनांचे तरंग उमटत असतात. बऱ्याच वेळा लहान मुलांना या भावनांच्या तरंगांची जाण नसते, तर काहींमध्ये भावनांची भाषा अविकसित असल्यानं सर्व अव्यक्तच राहतं. आपल्याला काय वाटतं ते ठामपणे स्वत:ला व दुसऱ्याला न लागेल अशा शब्दांत व्यक्त करण्याची पद्धत व कौशल्य सर्व मुलामुलींमध्ये असेलच, असं नाही. मुलांच्या भावनांना कसा प्रतिसाद दिला जातो, यावर मुलं मोकळेपणानं भावनांबद्दल बोलतील, अथवा नाही, हे अवलंबून असतं. खासकरून मुलग्यांमध्ये भावना व्यक्त करण्याचं कौशल्य मुलींपेक्षा सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात विकसित झालेलं असतं. टफ होणं म्हणजे दु:ख, हळवेपणा वगैरे भावना दाबून ठेवणं व चेहऱ्यावर त्याचा लवलेशही आणू न देणं, असे चुकीचे संदेश त्या प्रतिसादातून मुलांना मिळतात. हळूहळू दु:ख वाटणंच चुकीचं आहे किंवा स्वत:मध्ये काहीतरी जन्मजात दोष आहे, ही भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागते. भावना व्यक्त करणं ते थांबवतात किंवा चुकीच्या पद्धतीनं (गैरवर्तणुकीमधून) त्या व्यक्त व्हावयास लागतात. ‘मैं कभी.. बतलाता नहीं..’ या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील अतिशय भावुक गाण्यासारखी त्यांची परिस्थिती होते.
अशा मुला-मुलींचे पालक त्यांना कसं बोलतं करू शकतात? त्यांच्या भावना प्रकटीकरणाला आपण पालकांनी प्रोत्साहन कसं द्यायचं? त्यांच्या मनाची दारं कशी उघडायची, ते पाहिलं पाहिजे. वरवर अशी मुलं चेहऱ्यावरून व शब्दांतून भावना व्यक्त करत नसतील तरी त्यांच्या मनामध्ये तीव्र भावना, विचार व मतांचं थैमान चालू असतं. त्यांच्या मनाचा खोलवर जाऊन ठावठिकाणा कसा घ्यावयाचा, त्यांच्या मनाचं प्रशिक्षण कसं करायचं, हे आपण आता पाहू या.
मुलामुलींच्या भावना अव्यक्त असतील, त्यांना शब्दरूप मिळालं नसलं तरी त्यांचे पडसाद शरीरावर अलगद पडत असतात. भावनांच्या ठशांकडे जागरूकतेनं व आस्थेनं पाहण जरुरीचं असतं. मुलामुलींच्या दैनंदिन कामात काही बदल दिसला उदा. शाळेत जावंसं न वाटणं, खाण्यामधील तक्रारी, झोपेचा पॅटर्न बदलणं किंवा वागणुकीतील बदल.. यातून ‘आता तुम्ही तुमच्या मुलामुलीशी संवाद साधणं व त्यांना भावना व्यक्त करावयास प्रोत्साहन देणं आवश्यक आहे,’ हा संकेत पालकांनी समजून घ्यावा.
मुलामुलींशी संवाद साधताना किंवा त्यांचं मन मोकळं करण्याच्या प्रयत्नात काही वेळा असे प्रश्न विचारले जातात की ज्यामुळे फार गफलत होते. उदा. ‘काय प्रॉब्लेम आहे तुझा, तू बोलत का नाहीस?’ या प्रश्नाचं खरं उत्तर मुलाच्या मनाचा स्कॅन करून तुम्ही काढण्याचा प्रयत्न केलात तर ते असं असेल, ‘आई, मला भावना व्यक्त करण्याचं कौशल्य व पद्धत अवगत नाही.’ अर्थात मुलं हे उत्तर नक्कीच देणार नाहीत. त्यामुळे त्यांचं उत्तर सर्वसाधारणपणे असं असतं, ‘मला काहीही झालेलं नाही.’ (इथे आपल्या प्रश्नातील ‘प्रॉब्लेम’ हा शब्द मुलाला टोचल्यासारखा जाणवतो.)
पालकांनी वापरलेले शब्द हे एखाद्या कोड नंबरसारखं काम करतात. विशिष्ट शब्द, विशिष्ट टोनमध्ये बोलला तर मनाचं कुलूप लवकर उघडतं; अर्थात त्याला अपवादही असतात व अचूक असं सूत्र नसतं. परंतु, काही वाक्यं पालकांना उपयोगी पडू शकतील. त्यापैकी काही वाक्यं अशी आहेत :
तू थोडा काळजीत, विमनस्क दिसतो आहेस. किंवा काय बरं झालंय? मला जाणून घ्यायचं आहे. किंवा मला दिसतंय की, तुला कोणत्या तरी गोष्टीमुळे त्रास होतोय. तू नेहमीसारखा वागत नाहीस. जरा बोलूयात का आपण? किंवा मला जेव्हा वाईट वाटत असतं, तेव्हा माझंही जेवणावरचं लक्ष उडतं. ’ किंवा ‘तू असा चिडचिडा होतोस ना, तेव्हा मला कळतं की, काहीतरी बिनसलंय. काहीतरी तुझ्या मनासारखं घडलेलं नाही,.. पण कदाचित असं काही आहे का?..’
कधीकधी एवढय़ा शब्दजंजाळाऐवजी फक्त पाठीवर आश्वासक हात ठेवणं किंवा जवळ घेणं बरंच काही सांगून जातं. मुलं जर प्रतिसाद देत नसतील, तर ते कोषात जाण्याची शक्यता असते. जर समस्या तेवढीच महत्त्वाची असेल तर परत केव्हातरी असाच प्रयत्न करता येऊ शकतो. या सर्व संवादातून आपण पालक म्हणून मुलांपर्यंत एकच संदेश पोहोचवणं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे ‘तुला बोलावंसं वाटेल तेव्हा मी नेहमीच तयार असेन, कारण मला तुझी काळजी आहे.’
स्वत: आपण घरात भावनांविषयी बोलतो का? आपण मुलांसमोर रोल-मॉडेल असतो. आपल्या अभिव्यक्तीमध्ये जर मोकळेपणा असेल तर मुलं ते टिपतात व आत्मसात करतात.
चित्रांमधून भावनांची अभिव्यक्ती करण्याचीही पद्धत चांगली आहे. मुला-मुलींना स्वैर चित्र काढायला सांगितल्यास काही मुलांच्या चित्रांमध्ये विशिष्ट पॅटर्नस् दिसतात. कलाविष्कार व खासकरून चित्र रेखाटण्यामधून भावनाविष्कार उत्स्फूर्तपणे होत असतो. माझ्याकडे येणाऱ्या एका मुलाला स्वत:च्या भावनांबद्दल काही सांगता येत नव्हतं. त्याला स्वैर चित्र काढायला सांगितल्यावर त्याच्या चित्रामध्ये एक विशिष्ट पॅटर्न दिसून आला. प्रत्येक चित्रामध्ये तो एक झाड दाखवायचा. त्यातून असं लक्षात आलं की, तो मुलगा जीवनात एकाकी होता. आई-वडलांचं परस्परांशी जमत नसल्यामुळे झाडाखालील मुलासारखी त्याची स्थिती झाली होती. त्याला मदत करण्यासाठी आम्हाला ते चित्र खूप उपयोगी पडलं. त्याला जे बोलून दाखवता येत नव्हतं, ते तो चित्रांमधून व्यक्त करत होता. इथे परत तो ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील त्या ओळीची आठवण करून देत होता..
मै कभी बतलाता नहीं..
पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ
युं तो दिखलाता नहीं..
तेरी परवाह करता हूँ मैं माँ
तुझे सब बै पताह.. है ना माँ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा