यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी नियोजनपूर्ण अभ्यास, मुद्देसूद लिहिण्याचा सराव आणि तयारीत सातत्य आवश्यक ठरते.
गेल्या आठवडय़ात (२६ मे) रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवांकरिता पूर्वपरीक्षा पार पडली. या वर्षांपासून मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला आहे व बदललेल्या अभ्यासक्रमानुसार होणारी मुख्य परीक्षा २०१३ ही पहिलीच परीक्षा असेल.
पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात ती म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करणे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. मात्र त्यामुळे पूर्वपरीक्षा झाल्यानंतरचा महत्त्वाचा वेळ केवळ पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यात निघून जातो. अशाने पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उरलेल्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास होणे कठीण बनते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तर एवढय़ा कमी कालावधीत मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे.
म्हणूनच पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही, आपल्याला पूर्वपरीक्षेत किती मार्कस् मिळतील, इतर विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आहे इ. चर्चा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी लगेचच मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला हवी. जे विद्यार्थी २०१४ मध्ये पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांनीदेखील आतापासून मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचा आवाका इतका वाढला आहे की, त्याचा अभ्यास केल्यानंतर पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर १ चा अभ्यास पूर्ण होईल. त्यासाठी नव्याने पूर्वपरीक्षेच्या पेपर १ साठी खूप जास्त अभ्यास करावा लागणार नाही.
संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर (www. Upsc.gov.in) जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो असा की, पेपर २ ते ५ याचे स्वरूप असे असेल की, एखादा सुशिक्षित माणूस कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय (without any specialized study) ही परीक्षा देऊ शकेल. यातील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवांशी संबंधित विषयाचे सामान्य आकलन तपासले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयांचे मूलभूत ज्ञान तसेच परस्परविरोधी सामाजिक व आíथक उद्दिष्ट, मागण्या यांचे विश्लेषण करून मत बनविण्याची क्षमता याची चाचणी होते.
२०१३ च्या मुख्य परीक्षेपासून ऐच्छिक विषय एकच असणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय निवडावे लागत.
पेपर ६ व ७ जो ऐच्छिक विषयाशी संबंधित आहे, त्याचा आवाका ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाएवढा असेल जो पदवीपेक्षा जास्त पण पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा कमी असेल. मात्र अभियांत्रिकी कायदा, वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यासक्रम पदवी दर्जाचाच असेल. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत कसे उत्तर लिहावे यासंबंधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ या अभ्यासक्रमात नमूद केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सुसंगत, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहावे. नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे –
अ) आठव्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा – ३०० गुण.
ब) इंग्रजी – ३०० गुण.
वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणांमध्ये ग्राह्य़ धरले जात नाहीत. मात्र वरील दोन्ही पेपर पास होणे आवश्यक असते, जर विद्यार्थी वरील पेपरमध्ये नापास झाला तर त्याचे पुढचे पेपर तपासले जात नाहीत, एकूण गुणांत ग्राह्य़ धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे :
पेपर १ निबंध : ( गुण २५०) :- विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागतो. निबंधाच्या विषयाचे पर्याय उपलब्ध असतात. निबंध विषयाशी सुसंगत, स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमात असे नमुद करण्यात आले आहे की थेट व परिणामकारक अभिव्यक्तीस गुण दिले जातील. निबंधाचा हा पेपर मराठी भाषेतूनदेखील लिहिता येईल.
पेपर २ सामान्य अध्ययन : १ (गुण २५०) :- भारतीय संस्कृती व वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल.
पेपर ३ सामान्य अध्ययन : २ (गुण २५० ) :- शासनयंत्रणा संविधान, प्रशासन, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध.
पेपर ४ सामान्य अध्ययन : ३ (गुण २५०) :- तंत्रज्ञान, आíथक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.
पेपर ५ सामान्य अध्ययन : ४ ( गुण २५० ) :- नीतिमूल्य, एकात्मता व प्रवृत्ती.
पेपर ६ व ७ वैकल्पिक विषयासंदर्भात : विद्यार्थी हा अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांपकी कोणताही एक विषय घेऊ शकतो. त्याचे दोन पेपर असतील व प्रत्येक २५० गुणांचा असेल. म्हणजे वैकल्पिक विषय आता इंग्रजी किंवा मराठी लिहिता येईल. भाषा साहित्याबाबत जी अट सुरुवातीला आयोगाने टाकली होती, ती आता रद्द करण्यात आली आहे, नवीन अधिसूचनेनुसार आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ऐच्छिक विषय म्हणून भाषा साहित्य घेऊ शकतो.
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी २७५ गुण आहेत.
संघ लोकसेवा आयोगाच्या अधिसूचनेनुसार असे लक्षात येते की, नवीन बदललेल्या अभ्यासक्रमात ऐच्छिक विषयाचे महत्त्व थोडे कमी केले आहे. कारण जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय घ्यावे लागत. त्याला प्रत्येकी ६०० गुण होते. म्हणजे २३०० गुणांपकी १२०० गुण फक्त ऐच्छिक विषयांना होते. अगदीच टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ५२ टक्के गुण ऐच्छिक विषयांना होते. नवीन अभ्यासक्रमानुसार, वैकल्पिक विषयांना फक्त ५०० गुण असतील म्हणजे २४ टक्के गुण विषयाला आहेत.
याउलट जुन्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनासाठी ६०० गुण होते. आता सामान्य अध्ययनाची व्याप्ती वाढून त्याचे चार पेपर करण्यात आले असून त्यासाठी १००० गुण असतील. अगदीच टक्केवारीनुसार बोलायचे झाल्यास जुन्या अभ्यासक्रमानुसार २६ टक्के गुण सामान्य अध्ययनाला होते, तर नवीन अभ्यासक्रमानुसार त्याची व्याप्ती २६ टक्क्य़ांवरून ४६ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुख्य परीक्षेची तयारी कशी कराल ?
पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा दीघरेत्तरी स्वरूपाची असते. जे विद्यार्थी २०१४ च्या परीक्षेसाठी तयारी करीत असतील त्यांनी मुख्य परीक्षेची रणनीती वेगळी ठेवावी. कारण त्यांच्या तयारीसाठी बराच अवधी त्यांच्या हाताशी आहे. अशा विद्यार्थानी सर्वप्रथम एन.सी.आर.टी.ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढावीत. शक्यतो त्यांच्या नोट्स तयार कराव्यात. या पुस्तकात काही संकल्पना अंत्यत सोप्या भाषेत दिल्या असल्याने, एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मुद्देसूद आणि प्रभावीपणे लिहिता येते. नवीन अभ्यासक्रम जर बारकाईने अभ्यासला तर सामान्य अध्ययानाचा पेपर चालू घडामोडीशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय घडत आहे, त्याचा आपल्या देशाच्या राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर कसा प्रभाव पडतो, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यासाठी रोजच्या रोज कमीत कमी दोन दैनिकांचे वाचन करावे, त्यांची टिपणे काढावीत. यांचा सर्वात जास्त फायदा मुख्य परीक्षेसाठी होतो. टी.व्ही.वर दिवसातून एकतरी कार्यक्रम देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडले, यासंबंधी चर्चासत्रांचा असतो. त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञांमार्फत घटनेचा ऊहापोह होत असतो. असे कार्यक्रम अवश्य पाहावेत. शक्य झाल्यास अशा कार्यक्रमांचे रेकॉìडग करून ठेवावे. ते शक्य नसेल तर काही मुद्दे कार्यक्रम पाहताना लिहून ठेवावेत. त्यावर परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचा विचार करून असा प्रश्न आल्यास आपण कसे उत्तर लिहू शकतो, हे प्रत्यक्ष लिहून पाहावे. असे केल्यास सामान्य अध्ययनात प्रश्न कसाही विचारला गेल्यास त्याचे मुद्देसूद उत्तर लिहिण्यास विद्यार्थ्यांना शक्य होते. अनेक विद्यार्थ्यांची एक चूक होते ती म्हणजे मुख्य परीक्षेला त्यांचा अभ्यास चांगला असतो, परंतु प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याचा सराव न केल्याने त्यांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत.
गेल्या चार ते पाच वर्षांच्या मुख्य परीक्षेच्या पेपरचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, आयोग आजकाल प्रश्न थेट विचारले जात नाहीत. म्हणून केवळ ठराविक पुस्तक किंवा कोचिंग क्लासच्या नोट्सचे पाठांतर करून या परीक्षेत यश मिळवता येत नाही. पुस्तके किंवा नोट्स तुम्हाला त्या विषयासंदर्भातील माहिती देऊ शकतात, मात्र उत्तर तुम्हाला परीक्षेच्या काळात स्वत:च तयार करावयाचे असते. यासाठी सराव केला नसेल तर प्रचंड नुकसान होते.
उदा. भारत व पाकिस्तान संबंधांची चर्चा करा, अशा थेट प्रश्नाऐवजी ‘नुकत्याच पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ जिंकून आलेत. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर कसा परिणाम होईल, याचे टीकात्मक परीक्षण करा-’ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणूनच प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव असेल व अशी उत्तरे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून किंवा त्याविषयाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतली असतील तर विद्यार्थ्यांना अचूक उत्तर कसे लिहावे हे समजू शकते आणि परीक्षेत प्रश्न कसाही विचारला गेला तरी मुद्देसूद उत्तरे लिहता येतात. रोजचे टिपण, त्यासंबंधित आपण तयार केलेली प्रश्नोत्तरे यासाठी स्वतंत्र वही करावी व त्यांचे वाचन वेळोवेळी करावे.
जे विद्यार्थी २०१३ मध्ये मुख्य परीक्षा देणार आहेत, त्यांनी अभ्यासाची स्वतंत्र रणनीती तयार करावी. मुख्य परीक्षेला सुमारे सात महिन्यांचा अवधी आहे. जर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर हा कालावधी वैकल्पिक विषयाची तयारी व सामान्य अध्ययनाची तयारी यासाठी पुरेसा आहे. मात्र हा कालावधी विद्यार्थी कसा वापरतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. नवीन अभ्यासक्रमानुसार, सामान्य अध्ययनाच्या चार पेपरसाठी विशेष अध्ययन सामग्री लगेच उपलब्ध होणार नाही.
मात्र, बदललेला अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमापेक्षा अगदी वेगळा आहे, असे नाही. तयारी करताना अभ्यासक्रमात दिलेला प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे अभ्यासावा. जर काही मुद्दे पुस्तकात आपणास सापडत नसतील तर इंटरनेटचा वापर करावा. जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करावा. मागच्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न कसे विचारले गेले आहेत, याचा आढावा घ्यावा. त्यातील काही प्रश्न जे नवीन अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत, ते शब्दमर्यादा पाळून लिहून पाहावेत आणि तज्ज्ञांकडून ते तपासून घ्यावेत. लिहिण्याचा आपण जेवढा जास्त सराव कराल तेवढे आपणास फायदेशीर असेल.
सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके –
भारतीय संस्कृतीचा वारसा यासाठी स्पेक्ट्रम प्रकाशन, भारतीय इतिहासासाठी बिपीन चंद्रा, ग्रोव्हर आणि ग्रोव्हर, भूगोलासाठी सिवदर सिंग, भारतीय भूगोलासाठी, माजिद हुसेन, अर्थशास्त्रासाठी २०१३ केंद्र सरकारची आíथक पाहणी दत्त आणि सुंदरम किंवा उमा कपिला यांचे पुस्तक, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी विझार्ड प्रकाशनाचे किंवा टी.एम.एच. प्रकाशनाचे पुस्तक त्याचप्रमाणे ‘इंडिया इयर बुक २०१३’ मधील विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग, तसेच मागच्या काही महिन्यांतील व परीक्षेपर्यंत ‘सायन्स रिपोर्टर’ या मासिकातील अभ्यासाशी संबंधित लेख, सामान्य अध्ययन पेपर-२, शासनयंत्रणा, संविधान प्रशासन यासाठी लक्ष्मीकांत यांचे पुस्तक या पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच इग्नू (कॅठडव) यांची अभ्यासक्रमाशी संलग्न साहित्य याचा उपयोग करावा. पेपर मराठीमध्ये लिहिणार असाल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभ्यासक्रमाशी संलग्न अशी पुस्तके यांचा वापर करावा.
सामान्य अध्ययनात, मुख्य परीक्षेसाठी प्रश्न २ मार्क्स, ३ मार्क्स, ५ मार्क्स, १० मार्क्स, १५ मार्क्स तसेच २० मार्क्स यासाठीही विचारले जातात. प्रत्येक प्रश्नांना विशिष्ट शब्दमर्यादा दिलेली असते. शक्यतो शब्दमर्यादेतच उत्तर लिहावे. उत्तर संक्षिप्त व मुद्देसूद असावे. प्रश्न व्यवस्थित समजून उत्तर लिहावे, म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते. कमी शब्दात अर्थपूर्ण सुसंगत व मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय आत्तापासूनच करावी.
आयोगाने आपल्या वेबसाइटवर जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यात सामान्य अध्ययनासाठी खालील उपघटकांचा समावेश होतो.
सामान्य अध्ययन पेपर १ :
०यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला, साहित्य व स्थापत्य यांची वैशिष्टय़े.
०यामध्ये १८ व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत आधुनिक भारताचा इतिहास, त्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, महत्त्व आणि समस्या.
०भारताचा स्वांतत्र्यलढा, त्यातील महत्त्वाचे टप्पे, देशाच्या विविध भागांतून व विविध व्यक्तींनी दिलेले योगदान.
०स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दृढीकरण व देशांतर्गत पुनर्रचना.
०१८ व्या शतकापासून जगाचा इतिहास, औद्योगिक क्रांती, महायुद्ध, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, समाजवाद, साम्राज्यवाद, भांडवलवाद, त्यांचे प्रकार आणि त्यांचा समाजावरील परिणाम.
०भारतीय समाजाची ठळक वैशिष्टय़े व भारतातील वैविधता.
०महिला आणि महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या व संबंधित समस्या, दारिद्रय़ आणि विकासाच्या समस्या, नागरीकरण ,त्यांच्या समस्या व उपाय.
०जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
०सामाजिक शक्तीकरण, धर्मातरता, प्रादेशिक वाद व धर्मनिरपेक्षता.
०जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे वैशिष्टय़.
०महत्त्वाच्या नसíगक साधनसंपत्तीचे जगातील वितरण (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांना मिळून) प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यासंबंधित औद्योगिक विकास हा जगातील विभिन्न भागात कसा झाला, यासंबंधीची कारणे (भारतासह.)
०महत्त्वाच्या भौगोलिक समस्या उदा. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे इ. महत्त्वाची प्राकृतिक वैशिष्टय़े, त्यांचे स्थान व त्यांच्यातील बदल, जलस्थान व हिमनग, जैवसृष्टी व बदल हा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये नमूद केलेला आहे.
कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सरावाची अत्यंत आवश्यकता असते. जेते खेळाडू किंवा यशस्वी व्यक्तींच्या आयुष्याकडे पाहिल्यास त्यांनी केलेला सराव आणि सरावात ठेवलेले सातत्य यांमुळे त्यांना यश मिळाल्याचे आपणास दिसते. हा नियम संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठीदेखील लागू होतो.
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी मुद्देसूद लिहिण्याचा सराव, सातत्यपूर्ण करावा हे सूत्र आहे, हे लक्षात असू द्या!
grpatil2020@gmail.com
स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी नियोजनपूर्ण अभ्यास, मुद्देसूद लिहिण्याचा सराव आणि तयारीत सातत्य आवश्यक ठरते.
First published on: 03-06-2013 at 02:53 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the circle of competitive examinations