मागील लेखात सुरू केलेला सांस्कृतिक प्रवास या लेखात पूर्णत्वास नेऊया. भारताच्या दुसऱ्या साम्राज्याचा म्हणजेच गुप्त साम्राज्याचा कालखंड हा भारताच्या प्राचीन इतिहासाच्या उत्क्रांतीच्या शृंखलेतील महत्त्वाचा दुवा ठरतो. हा कालखंड ठरतो तो सांस्कृतिक उत्क्रांतीच्या उच्चतम पातळीचा. तद्वतच हा कालखंड ठरतो एका मुख्य सामाजिक मन्वंतराचा. वाढत्या सामंतशाहीचा समाजावरील प्रभाव गुप्तोत्तर कालखंडातील प्राचीन कालखंडाच्या अस्तास व मध्ययुगीन कालखंडाच्या उगमास कारणीभूत ठरतो.
गुप्त साम्राज्याच्या कालखंडाला काही इतिहासकार ‘सुवर्णयुग’ असे म्हणतात, तर काही इतिहासकार ‘सुवर्णयुगाची दंतकथा’ म्हणून त्यावर टीका करतात. या वादावर भाष्य करण्यापेक्षा गुप्त कालखंडातील समृद्ध संस्कृतीचा अभ्यास करणे अधिक श्रेयस्कर ठरते. अर्थात, या समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीला मौर्याच्या काळात घातल्या गेलेल्या पायाची व मौर्यात्तर काळातील व्यापारी समृद्धीची पाश्र्वभूमी लाभली होती यात शंका नाही. या काळात शिक्षण, साहित्य, गणित, खगोलशास्त्र, धातूशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत कमालीची सर्वागीण प्रगती झाली. शिक्षणामध्ये नालंदा विद्यापीठ; गणित व खगोलशास्त्रामध्ये वराहमिहीर, ब्रह्मगुप्त व त्याहीपेक्षा महत्त्वाचे, वैशिष्टय़पूर्ण व आश्चर्यकारक असे आर्यभट्टाचे योगदान; साहित्यामध्ये जगप्रसिद्ध कालिदास, विशाखादत्त, भारवी, कुमारदास, भट्टी, अमरू, वज्जीका, शूद्रक, सुबंधू, हर्षवर्धन व बाणभट्ट (गुप्तोत्तर काळ), भवभूती यांचे योगदान; संस्कृत व्याकरणामध्ये भरत्रीहरी, अमरसिंह, चंद्रगोमिया यांचे कार्य; वरारुची, चंद यांचे प्राकृत व पाली व्याकरणातील कार्य; धार्मिक साहित्यामध्ये पुराण, महाभारत, रामायण, बौद्ध साहित्य, जैन साहित्य या सर्वाचा समावेश या काळातील अत्यंत समृद्ध संस्कृतीमध्ये होतो. याव्यतिरिक्त वास्तुकलेमधील नगर व द्रविड कलांचा उदय, शिल्पकला व चित्रकलेचाही यात अंतर्भाव होतो. गुप्तोत्तर काळातील वैभवशाली राजा हर्षवर्धनाचा मृत्यू (६४७ AD) प्राचीन इतिहासाचा अस्त दर्शवतो.
सुरुवातीच्या मध्ययुगीन काळामध्ये उत्तरेतर गुर्जर-प्रतिहार, राष्ट्रकूट व पाल या तिघांचा कनौजवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष, तर दक्षिणेत चोल साम्राज्याचा उदय असे काहीसे चित्र दिसते. या कालखंडातील संस्कृतीमध्ये प्रतिहारांच्या दरबारातील ्नराजशेखरचे साहित्य, पालांनी भरभराटीस आणलेले नालंदा विद्यापीठ व नव्याने स्थापन केलेले विक्रमशिला विद्यापीठ, राष्ट्रकुटांच्या राजाश्रयाखालील संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व कन्नड साहित्य, वेरुळ येथील राष्ट्रकुटांची प्रसिद्ध मंदिरं यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त राजपूत, पाल, चालुक्य, प्रतिहार वास्तुकला, चोल मंदिरं, सोलंकी कला, चोलांची धातूमधील शिल्पकला (नटराज), चोल चित्रकला यांचाही अंतर्भाव होतो.
गुर्जर-प्रतिहारांच्या ऱ्हासानंतर उत्तर-पश्चिम भारतावर मुस्लीम आक्रमणं होताना दिसतात. महमूद गझनी व मोहम्मद घुरी यांच्या एकानंतर एक स्वाऱ्या व तद्नंतर दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना असा घटनाक्रम आहे. सुलतानशाही व मुघल काळात खूप मोठय़ा प्रमाणावर इतिहासलेखन झाले. मिन्हास-उस्-सिराज, झिया-उद्-दीन बरानीपासून अबूल फझल, मुहम्मद हाशिम खाफी खानपर्यंत ही एक मोठी साखळीच आहे. गझनी, घुरीपासून औरंगजेब व त्यानंतरच्या बादशहांच्या अनेक घटनांवर व वेगवेगळ्या अंगांवर या इतिहासलेखनाने प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर जॉन फ्रेअर, फ्रँकाइस बíनयर, निकोलो मॅनुसी यांसारख्या परकीय प्रवाशांच्या पुस्तकांचाही यात समावेश करता येईल. याव्यतिरिक्त संस्कृत पुस्तकांचे पíशयन भाषांतर, अमिर खुस्रोचे काव्य यांचा साहित्यामध्ये समावेश होतो. वास्तुकलेमध्ये इस्लामिक व भारतीय वैशिष्टय़ांचा मिलाफ दिसून येतो. ताजमहल ही सुलतानशाहीपासूनच्या वास्तुकलेच्या उत्क्रांतीची सर्वोच्च प्रतीची अभिव्यक्ती म्हणता येईल. तसेच विजयनगर या समृद्ध राज्यामध्ये विशिष्ट वास्तुकलेची निर्मिती झालेली होती. या काळात संगीत, चित्रकला (मुघल चित्रकला), विणकाम यांमध्ये मोठी प्रगती झाली. भारतीय समाजावर दूरगामी परिणाम करणाऱ्या सूफी व भक्ती चळवळीचा अभ्यासही महत्त्वाचा ठरतो.
आधुनिक कालखंडातील वास्तुकला, संगीत, नृत्य, चित्रपट, रंगमंच व कलेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. युरोपियन लोकांच्या आगमनानंतर कलेच्या अनेक क्षेत्रांत युरोपियन वैशिष्टय़े आढळतात. वास्तववादी छायांकन (Realistic Shading), परिप्रेक्ष्य (Perspective), त्रिमितीय (Three-Dimensional) चित्रीकरण या युरोपियन वैशिष्टय़ांनी मुघल चित्रकलेला समृद्ध केले. भारताच्या वसाहतवादी कालखंडातील वास्तुकलेवर युरोपियन प्रभाव स्पष्ट जाणवतो. त्यामध्ये गॉथिक, रोमन, ब्रिटिश, पोर्तुगीज वैशिष्टय़े आढळतात. भारतीय संगीताची मुळे सामवेदामध्ये असून भरताच्या नाटय़शास्त्र या साहित्य कलाकृतीमध्ये त्याचा अभ्यास दिसून येतो. कदाचित मध्ययुगीन काळातील उत्तर भारतीय संगीतावरील पíशयन प्रभावामुळे उत्तर व दक्षिण भारतातील संगीतामधील भेद स्पष्ट होण्यास सुरुवात होते. त्यातून िहदुस्तानी व कर्नाटकी भारतीय संगीतातील दोन मुख्य प्रवाह विकसित होतात. या दोन संगीत प्रकारांतील फरक, मूलभूत तांत्रिक संकल्पना व महत्त्वाचे घराणे यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भरताच्या नाटय़शास्त्रामध्ये नृत्यविषयक सखोल समीक्षा आहे. भारतीय अभिजात नृत्य (भरतनाटय़म, कथकली, मोहिनीअट्टम, ओडीसी, कथ्थक, कुचीपुडी, मणीपुरी, सत्तरीय), त्यांची मुख्य वैशिष्टय़े व घराणे यांचा अभ्यास आवश्यक आहे. आधुनिक काळातील महत्त्वाचे चित्रकार, संगीतकार, नृत्य कलाकार, भारतीय चित्रपट व रंगमंचाचा विकास, विविध कलांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था यांचा एक ढोबळ आढावा फायद्याचा ठरू शकतो.
भारतीय संस्कृतीवरील या लेखांमधील विश्लेषण या घटकाची व्याप्ती स्पष्ट करणारा जलद आढावा ठरतो. भारतीय इतिहासाची रूपरेखा स्पष्ट करणाऱ्या मूलभूत क्रमिक पुस्तकांच्या आकलनानंतर भारतीय संस्कृतीवरील एखाद्या प्रमाणित संदर्भग्रंथाचे वाचन पुरेसे ठरावे.
मूलभूत क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून केलेला सामाजिक, आíथक, राजकीय अंगाचा ‘आवश्यक किमान’ अभ्यास या संपूर्ण प्रक्रियेला पूर्णत्व प्राप्त करून देणारा ठरतो.
(उत्तरार्ध)
admin@theuniqueacademy.com