मागील लेखात सुरू केलेला सांस्कृतिक प्रवास या लेखात पूर्णत्वास नेऊया. भारताच्या दुसऱ्या साम्राज्याचा म्हणजेच गुप्त साम्राज्याचा कालखंड हा भारताच्या प्राचीन इतिहासाच्या उत्क्रांतीच्या शृंखलेतील महत्त्वाचा दुवा ठरतो. हा कालखंड ठरतो तो सांस्कृतिक उत्क्रांतीच्या उच्चतम पातळीचा. तद्वतच हा कालखंड ठरतो एका मुख्य सामाजिक मन्वंतराचा. वाढत्या सामंतशाहीचा समाजावरील प्रभाव गुप्तोत्तर कालखंडातील प्राचीन कालखंडाच्या अस्तास व मध्ययुगीन कालखंडाच्या उगमास कारणीभूत ठरतो.
गुप्त साम्राज्याच्या कालखंडाला काही इतिहासकार ‘सुवर्णयुग’ असे म्हणतात, तर काही इतिहासकार ‘सुवर्णयुगाची दंतकथा’ म्हणून त्यावर टीका करतात. या वादावर भाष्य करण्यापेक्षा गुप्त कालखंडातील समृद्ध संस्कृतीचा अभ्यास करणे अधिक श्रेयस्कर ठरते. अर्थात, या समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीला मौर्याच्या काळात घातल्या गेलेल्या पायाची व मौर्यात्तर काळातील व्यापारी समृद्धीची पाश्र्वभूमी लाभली होती यात शंका नाही. या काळात शिक्षण, साहित्य, गणित, खगोलशास्त्र, धातूशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत कमालीची सर्वागीण प्रगती झाली. शिक्षणामध्ये नालंदा विद्यापीठ; गणित व खगोलशास्त्रामध्ये वराहमिहीर, ब्रह्मगुप्त व त्याहीपेक्षा महत्त्वाचे, वैशिष्टय़पूर्ण व आश्चर्यकारक असे आर्यभट्टाचे योगदान; साहित्यामध्ये जगप्रसिद्ध कालिदास, विशाखादत्त, भारवी, कुमारदास, भट्टी, अमरू, वज्जीका, शूद्रक, सुबंधू, हर्षवर्धन व बाणभट्ट (गुप्तोत्तर काळ), भवभूती यांचे योगदान; संस्कृत व्याकरणामध्ये भरत्रीहरी, अमरसिंह, चंद्रगोमिया यांचे कार्य; वरारुची, चंद यांचे प्राकृत व पाली व्याकरणातील कार्य; धार्मिक साहित्यामध्ये पुराण, महाभारत, रामायण, बौद्ध साहित्य, जैन साहित्य या सर्वाचा समावेश या काळातील अत्यंत समृद्ध संस्कृतीमध्ये होतो. याव्यतिरिक्त वास्तुकलेमधील नगर व द्रविड कलांचा उदय, शिल्पकला व चित्रकलेचाही यात अंतर्भाव होतो. गुप्तोत्तर काळातील वैभवशाली राजा हर्षवर्धनाचा मृत्यू (६४७ AD) प्राचीन इतिहासाचा अस्त दर्शवतो.
सुरुवातीच्या मध्ययुगीन काळामध्ये उत्तरेतर गुर्जर-प्रतिहार, राष्ट्रकूट व पाल या तिघांचा कनौजवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष, तर दक्षिणेत चोल साम्राज्याचा उदय असे काहीसे चित्र दिसते. या कालखंडातील संस्कृतीमध्ये प्रतिहारांच्या दरबारातील ्नराजशेखरचे साहित्य, पालांनी भरभराटीस आणलेले नालंदा विद्यापीठ व नव्याने स्थापन केलेले विक्रमशिला विद्यापीठ, राष्ट्रकुटांच्या राजाश्रयाखालील संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व कन्नड साहित्य, वेरुळ येथील राष्ट्रकुटांची प्रसिद्ध मंदिरं यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त राजपूत, पाल, चालुक्य, प्रतिहार वास्तुकला, चोल मंदिरं, सोलंकी कला, चोलांची धातूमधील शिल्पकला (नटराज), चोल चित्रकला यांचाही अंतर्भाव होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा