यूपीएससीने २०१३ पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे, हे आपण जाणताच. भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास या घटकाचा समावेश ‘सामान्य अध्ययन पेपर पहिला’मध्ये करण्यात आलेला आहे. या पूर्वीच्या अभ्यासक्रमात ‘भारतीय संस्कृती आणि आधुनिक भारताचा इतिहास’ असा अभ्यासक्रम होता. म्हणजेच या घटकात तीन नवीन मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. (१) भारतीय वारसा, (२) १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते १८५७ च्या उठावापर्यंतच्या घडामोडी आणि स्वातंत्र्योत्तर भारत आणि (3) जगाचा इतिहास १८ व्या शतकापासून ते समकालीन घटनांपर्यंत.
२०१३ च्या मुख्य परीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ पेपर क्र. १ मध्ये एकूण २५ प्रश्नांपकी १४ प्रश्न या घटकावर विचारण्यात आले होते. तसेच २५० गुणांपकी १४० गुण या घटकासाठी होते.
घटक विचारण्यात गुण शब्द मर्यादा
आलेले प्रश्न (प्रत्येक प्रश्नासाठी)
भारतीय वारसा २ २० १००/२००
आणि संस्कृती
आधुनिक भारताचा ८ ८० २००
इतिहास आणि
स्वातंत्र्योत्तर भारत
आधुनिक जगाचा ४ ४० २००
इतिहास
अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाचे पुढील प्रकरणात वर्गीकरण करता येईल.
(१) भारतीय वारसा आणि संस्कृती (२) आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत (३) आधुनिक जगाचा इतिहास. २०१३ च्या मुख्य परीक्षेत या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विचार करता २५० गुणांपैकी १४० गुण अर्थात ५६ % प्राध्यान्य या घटकाला दिले गेलेले आहे हे लक्षात येते. त्यातही आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्योत्तर भारत या घटकावर सर्वाधिक ८ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या खालेखाल आधुनिक जगाच्या इतिहासावर ४ प्रश्न आणि भारतीय वारसा आणि संस्कृती वर २ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे वैशिष्टय़ म्हणजे शब्दमर्यादा व सर्व प्रश्न सोडवण्याची सक्ती होय. थोडक्यात प्रश्नांची उत्तरे निबंधात्मक पद्धतीने लिहिता येण्यासारखी होती, मात्र शब्दमर्यादेचे भान ठेवतच.
मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न विद्यार्थाच्या आकलनक्षमतेचा कस पाहणारे होते. भारतीय वारसा व संस्कृतीवर विचारण्यात आलेले प्रश्न जरी पूर्वी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासारखे भासत असले तरी विषयाच्या विविध पलूंवर चिकित्सक पद्धतीने विचारण्यात आलेले प्रश्न होते. उदा. तांडवनृत्याची वैशिष्टय़े तत्कालीन शिलालेखात नोंदवलेल्या माहिती आधारे लिहावयाचा प्रश्न. याचबरोबर संगम साहित्याच्या आधारे संगम युगातील आíथक व सामाजिक समीक्षा व चोल स्थापत्य कला अशा घटकांवर विचारण्यात प्रश्न आलेले होते. थोडक्यात या घटकांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना संकीर्ण माहितीबरोबरच विश्लेषणात्मक बाबींचा विचार करून लिहिणे अपेक्षित होते. अशा घटकांचा अभ्यास करत असताना एनसीईआरटी व काही निवडक संदर्भ ग्रंथांमधून स्वत:च्या नोट्स तयार केल्यास या घटकांचा अभ्यास अधिक नेमकेपणाने तयार करता येतो. शिलालेख, साहित्य, परकीय प्रवाशांनी केलेली वर्णन याचबरोबर प्रत्येक कालखंडानुसार घडून आलेले सांस्कृतिक बदल व वैशिष्टय़े या पद्धतीने नोट्स काढल्यास हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक सुलभ करता येईल.
आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्योत्तर भारत या घटकांवर विचारण्यात आलेले काही प्रश्न पारंपरिक पद्धतीला छेद देणारे होते. उदा. महिलासंबंधी प्रश्न विचारण्यात आलेला हा तत्कालीन महिलांची स्थिती व त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील योगदान अशा आयामावर आधारित विचारण्यात आलेला होता. तसेच गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी इत्यादी. याव्यतिरिक्त विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान, ताश्कंद कराराची महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े, ‘जय जवान जय किसान’चा नारा, भूदान चळवळ आणि बांग्लादेशाचा उदय यांसारख्या व्यक्तिविशेष व मुद्दय़ांच्या आनुषंगाने विचारण्यात आलेले प्रश्न होते. या प्रश्नांचे स्वरूप साधारणत: विश्लेषणात्मक, चिकित्सक पद्धतीचे होते. अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी संकीर्ण माहितीबरोबरच विषयांचे र्सवकष आकलन महत्त्वाचे ठरते. बिपिनचंद्र लिखित- आधुनिक भारताचा इतिहास (एनसीईआरटी), भारताचा स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानतंरचा भारत याचबरोबर बी. एल. ग्रोव्हरलिखित आधुनिक भारताचा इतिहास यांसारख्या निवडक संदर्भग्रंथांच्या आधारे अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करता येऊ शकते.
आधुनिक जगाचा इतिहास या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न अमेरिकन राज्यक्रांती, जपानमधील औद्योगिकीकरण, आíथक महामंदी व आफ्रिका खंडाचे युरोपियन साम्राज्यवादांच्या स्पध्रेत झालेले विभाजन अशा मुद्दय़ांवर आधारित होते. हा घटक पूर्णपणे नवीन असल्यामुळे यावर जास्तीत जास्त लक्ष दिले जाणे अपेक्षित होते. अर्जुन देवलिखित एनसीईआरटीची पुस्तके, आधुनिक जगाचा इतिहास- जैन व माथुर, कॅलव्होकॅरसीलिखित ‘१९४५ नंतरचे जग’ इत्यादी पुस्तकांच्या आधारे या घटकाची तयारी करता येऊ शकते.
admin@theuniqueacademy.com
भारतीय वारसा, संस्कृती व इतिहास
यूपीएससीने २०१३ पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे, हे आपण जाणताच.
आणखी वाचा
First published on: 20-01-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian heritage culture and history