* आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या लखनौस्थित
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी’ या संस्थेच्या संशोधनविषयक कार्याचा आढावा –
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी’ ही संस्था देशाच्या औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन प्रयोगशाळेचा एक उपक्रम असून तिची स्थापना १९६५ साली लखनौ येथे झाली. विषविज्ञानाच्या विविध शाखांतील संशोधनामध्ये ही संस्था कार्यरत आहे. सभोवतालच्या वातावरणातील नसíगक आणि औद्योगिक कारणांमुळे होणाऱ्या रासायनिक उत्सर्जनाचा पर्यावरणावर तसेच मानवी शरीरावर होणारे परिणाम या संस्थेत अभ्यासला जातो. या  संस्थेतर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणांचा उपयोग पर्यावरण सुरक्षेसाठी निरनिराळे मापदंड ठरवण्यासाठी होतो, म्हणूनच संस्थेचे घोषवाक्य ‘आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षा आणि औद्योगिकक्षेत्राप्रती सेवा’ असे आहे.
संस्थेचे संशोधन विषय
* नॅनोमटेरिअल टॉक्झिकॉलॉजी
आधुनिक तंत्रज्ञानाचे फलित म्हणजे अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा शोध. औद्योगिक प्रगतीला कारणीभूत ठरलेल्या या तंत्र विकसनाचा उपयोग करून आजपर्यंत जगभरात हजाराहून अधिक ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती झाली आहे. मानवी शरीरातील रोगांचे अचूक निदान करण्यासाठीही या तंत्राचा उपयोग केला जातो. ग्राहक, पर्यावरण आणि कामगार यांच्या संरक्षणाच्या दृष्टीतूनही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. आजच्या घडीला २०हून अधिक देशांत या तंत्रज्ञानाचा उपयोग ग्राहकोपयोगी वस्तू बनवण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानात वापरात येणाऱ्या अतिसूक्ष्म कणांचा पर्यावरणावर तसेच मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, असे जैव संशोधनातून समोर आले आहे. म्हणून अशा अतिसूक्ष्म घटकाच्या वापरापूर्वी त्यासंबंधीची सुरक्षितता किंवा घातकता तपासून पाहण्याबाबतचे संशोधन आणि तपासणीच्या निरनिराळ्या पद्धतींचे विकसन, हा संस्थेच्या अभ्यासाचा प्रमुख विषय राहिला आहे. या विषयाचे महत्त्व जाणून घेऊन संस्थेचे यातील संशोधन सुरू आहे.
उद्दिष्ट – नॅनो मटेरिअल्सचा पर्यावरणावरील परिणाम जाणून घेऊन वापराच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित बनवणे.
* एन्व्हायरॉन्मेंटल टॉक्झिकॉलॉजी
विविध औद्योगिक कारखान्यांतून निरनिराळे वायू, रसायने वातावरणात उत्सर्जति केली जातात. अशा गोष्टींचा पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासणे म्हणजेच ‘एन्व्हायरॉन्मेंटल टॉक्झिकॉलॉजी’.
पर्यावरणातील विविध घटकांची घातकता तपासून पाहण्यासाठी नवीन पद्धतीचे विकसन करताना, या संदर्भातील माहितीची अनुपलब्धता हे महत्त्वाचे आव्हान आहे. अशा तपासणींसाठी सध्या होणारा प्राण्यांचा वापर थांबवून पर्यावरणातील घातक द्रव्यांच्या तपासणीसाठी अन्य पर्यायांचा शोध घेणे आवश्यक ठरले आहे. या संदर्भात पुढील संशोधन संस्थेत सुरू आहे.
पेशीय, जनुकीय दृष्टीतून पर्यावरणाला दूषित करणारे घटक शोधणे.
जैव प्रदूषणाची विविध कारणे व उपायांचा अभ्यास.
पर्यावरणातील विषद्रव्यांचा पर्यावरणावरील परिणाम अभ्यासणे.
* अन्न आणि औषधी रसायने
अन्नाचा पुरेसा पुरवठा होण्याबरोबरच त्याचा सकसपणा आणि शुद्धता या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. यासंदर्भात संस्थेत पुढील संशोधनविषयक काम चालते- अन्ननिर्मितीच्या आणि अन्नप्रक्रियांच्या विविध पद्धती अभ्यासून सुरक्षित पद्धती शोधणे, अन्नातील भेसळयुक्त पदार्थ शोधण्याच्या पद्धती अभ्यासणे. यातील निरनिराळ्या सर्वेक्षणांचा अभ्यास करणे.  
उद्दिष्टे- सुरक्षित आणि सकस अन्ननिर्मिती आणि पुरवठा, अन्नातील रासायनिक विषद्रव्यांचे शोधन आणि अभ्यास, अन्नात भेसळ निर्माण करणारे घटक शोधणे.
* रेग्युलेटरी टॉक्झिकॉलॉजी
पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांची  सुरक्षा हा सध्या जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जाणारा विषय आहे. या संदर्भातील विविध सर्वेक्षणे उत्पादन, विपणन, दळणवळण, साठवण, शेतकी तसेच बिगरशेतकी उत्पादने, औषधी, सौंदर्यप्रसाधने यांच्या वापरातील सुरक्षेचे प्रमाण ठरवण्यासाठी होतो. या विषयातही संस्थेचे संशोधन सुरू आहे. उत्पादित औषधे व रसायने यांची सुरक्षा तपासण्यासाठी तसेच भारतीय उत्पादने जागतिक बाजारपेठेतील सुरक्षा नियमांप्रमाणे दर्जेदार असावीत यासाठी संस्थेच्या संशोधक चमूकडून निरनिराळ्या तपासणी पद्धतीचे विकसन केले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनांच्या व्यापारात तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत यासाठी संस्थेकडून जी.एल.पी (गुड लॅबोरॅटरी प्रॅक्टिसेस) च्या नियमांचे  काटेकोर पालन केले जाते.
उद्दिष्टे- रासायनिक द्रव्ये, जैव उत्पादने आणि पर्यावरणातील घातक सुरक्षा, रासायनिक विश्लेषण, माहितीपर सल्ला तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत आणि वाजवी किमतीच्या सेवा पुरवणे.
संस्थेमार्फत प्रशिक्षणाच्या संधी
ही संस्था अनेक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांशी संलग्न असून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच संस्थेत प्रशिक्षणाच्या व संशोधनाच्या संधीही उपलब्ध असतात. या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने ते एक वर्ष इतका असतो. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा-http://www.iitrindia.org
रिसर्च असोसिएट
ही संस्था पीएच.डी पदवी घेतलेल्या उमेदवारांची निवड करून रिसर्च असोसिएट पदावर नेमणूक करून संशोधनाची संधी बहाल करते.   
geetazsoni@yahoo.co.in

Story img Loader