द युनिव्हर्सिटि ऑफ एडिंबरा

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार द युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबरा हे जगातले अठराव्या क्रमांकाचे तर युरोप खंडातील सहाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १५८२ साली झालेली आहे. ते जगातले सहाव्या क्रमांकाचे प्राचीन विद्यापीठ आहे. यूकेतील स्कॉटलंडमध्ये असणाऱ्या या विद्यापीठाला स्वतंत्र ओळखीची गरज नाही. एडिंबरा हे शासकीय विद्यापीठ आहे. ‘सायंटिफिक नॉलेज, द क्राउिनग ग्लोरी अ‍ॅण्ड द सेफगार्ड ऑफ द एम्पायर’ हे एडिंबरा विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. एडिंबरा विद्यापीठ तीन कॉलेजेस आणि त्यातील एकूण वीस प्रमुख शैक्षणिक विभाग यांनी मिळून बनलेले आहे. विद्यापीठातील ही सर्व महाविद्यालये स्वयंशासित असून प्रत्येक महाविद्यालय स्वत:च्या अंतर्गत शैक्षणिक व संशोधन रचना नियंत्रित करते. युनिव्हर्सिटि कोर्ट ही विद्यापीठाचे सर्व प्रशासन नियंत्रित करणारी प्रशासकीय समिती आहे. एडिंबरा विद्यापीठाचे एकूण पाच मुख्य कॅम्पस आहेत. सध्या  विद्यापीठामध्ये चार हजारपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास सदतीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम –  एडिंबरा विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. एडिंबरामध्ये तीन कॉलेजेस- कॉलेज ऑफ आर्ट्स ह्युमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, कॉलेज ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड व्हेटर्नरी मेडिसिन आणि कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग ही प्रमुख कॉलेजेस आहेत. त्या अंतर्गत सर्व शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स चालतात. या सर्व स्कूल्सकडून  एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, अर्थ सिस्टम सायन्सेस, एनर्जी रिसोस्रेस इंजिनीअरिंग, जिओफिजिक्स, जिओलॉजिकल सायन्सेस, मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स, बायोइंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, अँथ्रॅपॉलॉजी, इकोनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, इंग्लिश, सायकोलॉजी, अ‍ॅनेस्थेशिया, जेनेटिक्स, सर्जरी, हेल्थ रिसर्च, बायोइंजिनीअरिंग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी शेकडो विषय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जातात. सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. किंबहुना यूकेमध्ये सर्वाधिक साठ ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे  एडिंबरा हे एकमेव विद्यापीठ आहे.  विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा –  एडिंबरा विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़

प्रबोधन चळवळीच्या कालावधीदरम्यान एडिंबरा शहराला एक प्रमुख बौद्धिक केंद्राच्या रूपात प्रतिष्ठित करण्यासाठी  एडिंबरा विद्यापीठाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  त्यामुळेच या शहराला अथेन्स ऑफ द नॉर्थ या टोपणनावानेही संबोधले जाते. तत्कालीन डेव्हिड ह्यूम, जेम्स ह्युटन, अ‍ॅडम स्मिथ यांसारख्या बुद्धिवंतांचा  एडिंबरा शहर आणि या विद्यापीठाशी संबंध राहिल्याने जगभरातील सर्व बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी हे  विद्यापीठ नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम राजकारणी, वकील, तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. यामध्ये महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्वनि, पीटर हिग्ज, डॅनियल रदरफोर्ड, जे.जे.थॉमसन, जेम्स मॅक्सवेल, अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांसारख्या महान संशोधकांचा समावेश आहे. इंग्लंडमधील तीन माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते. जगातील विविध देशांचे नेतृत्व ज्यांनी केले आहे किंवा करत आहेत त्यापैकी बहुतेक नेते या विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत.

आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण १९ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते, एक आबेल पुरस्कार, एक पुलित्झर पुरस्कार आणि तीन टय़ुिरग पुरस्कार विजेते आहेत.

संकेतस्थळ   https://www.ed.ac.uk/

Story img Loader