माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे एमबीएच्या ‘माहिती व्यवस्थापन’ या विद्याशाखेचे उद्दिष्ट आहे. त्याविषयी..
माहिती तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर वाढते महत्त्व, त्यामधील वेगवेगळ्या घटकांचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन लक्षात घेऊन ‘माहिती तंत्रज्ञान व्यवस्थान’ हे स्पेशलायझेशन एम.बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन हे व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयापेक्षा वेगळे आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी या दृष्टीने या विषयाचे नियोजन केले गेले आहे. माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. या स्पेशलायझेशनमध्ये माहिती तंत्रज्ञानासंबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो.
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन (आय.टी. मॅनेजमेंट) या विषयानेच या स्पेशलायझेशनची सुरुवात होते. या विषयात पूर्वी उल्लेख केलेल्या घटकांचे उदा. संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर (अॅप्लिकेशन आणि सिस्टीम), नेटवर्क, डेटा, सिक्युरिटी आणि त्याच्याशी निगडित काम करणारे कर्मचारी यांच्या व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे स्पेशलायझेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावीत या उद्देशाने हा विषय ठेवण्यात आला आहे. या सर्व घटकांच्या मूलभूत माहितीबरोबरच हे घटक संपादित करणे, त्याची देखभाल व नियंत्रण करणे तसेच योग्य प्रकारे आणि योग्य वेळेला त्यात बदल करण्यासाठी व्यवस्थापक म्हणून कसा आणि कोणता विचार आवश्यक आहे, याबद्दलचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते.
सध्याच्या युगात ई-बिझनेसची मोठय़ा प्रमाणात प्रगती झाली आहे. माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून याबद्दलची माहिती ई-बिझनेसची या विषयात मिळते. ई-बिझनेसची कार्यपद्धती मुख्यत्वे कंपनीला त्यांची डेटा प्रोसेसिंग सिस्टीम अधिक कार्यक्षमतेने आणि लवचिकतेने करायला, भागीदारांबरोबर आणि पुरवठादारांबरोबर सुसंवाद साधायला आणि ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करायला मदत करतात. ई-कॉमर्स हा ई-बिझनेसचा उपसंच म्हणायला हरकत नाही. ई-कॉमर्समध्ये कंपनीचा महसूल वाढवणे हा उद्देश असतो तर ई-बिझनेसमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी, पुरवठा साखळी व्यवस्थापन, ग्राहक सेवा हाताळणी आणि व्यवसायातील भागीदारांबरोबर सुसंवाद या गोष्टी अंतर्भूत होतात. याला अनुसरून ई-बिझनेस आíकटेक्चर, त्याला लागणारे तंत्रज्ञान आणि संदेशवहन तंत्रज्ञान सक्षम करणे, पायाभूत घटकांची माहिती, रचना, मोबाईल कॉमर्स, ई-बिझनेस धोरण, आव्हाने, कायदेशीर मुद्दे, ई-व्यवसाय चालू करण्यासाठी व्यवसाय योजना सादरीकरण यांचा समावेश अभ्यासक्रमात होऊ शकतो.
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटचीच शाखा आहे. यामध्ये सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे नियोजन, नियंत्रण, अंमलबजावणी आणि निरीक्षणाचा समावेश होतो. या विषयामध्ये प्रोजेक्ट प्लॅिनग, एस्टिमेशन, रिस्क मॅनेजमेंट याबद्दल मूलभूत आणि सखोल ओळख करून देण्यात आली आहे. विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्याला अनुसरून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची ओळख या एका महत्त्वाच्या घटकाचा समावेश केला आहे.
आजमितीला बहुतेक सर्व मोठय़ा कंपन्यांमध्ये Enterprise Resource Planning (ईआरपी)चा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. ‘ईआरपी’मध्ये विविध सॉफ्टवेअरचा एकत्रित समावेश असतो. ‘ईआरपी’ कंपनीमधल्या विविध अंतर्गत प्रक्रियांची उदा. उत्पादन, मागणी प्रक्रिया, वस्तूंचा साठा (inventory) याची एकत्रित वास्तविक माहिती देते. ‘ईआरपी’ची वैशिष्टय़े, ‘ईआरपी’ आíकटेक्चर, ‘ईआरपी’ इम्प्लिमेन्टेशन अॅण्ड सपोर्ट, ‘ईआरपी’ मॉडय़ुल्सचा समावेश या विषयामध्ये केला गेला आहे. थिअरीबरोबरच यामध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये ‘ईआरपी’ अंमलबजावणी केलेल्या कंपनींच्या केस स्टडीजचा समावेश केला गेला आहे.
वरील महत्त्वाच्या विषयांबरोबरच इतर विषयसुद्धा या स्पेशलायझेशनमध्ये समाविष्ट होतात. हे सर्वच विषय महत्त्वाच्या विषयांना पूरक असेच आहेत. त्याची धावती ओळख आता आपण करून घेऊ.
सॉफ्टवेअर इंजिनीअिरग या विषयात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना येणाऱ्या विविध टप्प्यांचा अभ्यास केला जातो. माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे विविध दृष्टिकोन आणि मॉडेल्स, ओब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनीअिरगचा परिचय आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध डायग्राम्सची ओळख अभ्यासक्रमात आहे.
मोबाइल फोन्सचा वाढता वापर लक्षात घेऊन मोबाइल कॉम्प्युटिंग विथ अँड्रॉइड विषयाचा समावेश केला गेला आहे. मोबाईल कॉम्प्युटिंगची मुलतत्त्वे, उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञान, मोबाइल कॉम्प्युटिंग संदर्भात असलेली सुरक्षितता, एम-कॉमर्सबद्दलची माहिती आणि एम-कॉमर्स सेवा व्यवस्थापनाबद्दल माहिती या विषयात करून दिलेली आहे.
माहिती तंत्रज्ञानातील महत्त्वाचा घटक म्हणजे डेटाबेसचा होणारा उपयोग. उद्योगासाठी आणि सक्षम निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहिती डेटाबेसमध्ये साठविण्यात येते. त्या दृष्टीने डेटाबेस व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा विषय आहे. डेटाबेस व्यवस्थापन या विषयाच्या तोंडओळखीबरोबरीने ओरॅकल किंवा तत्सम आरडीबीएमएसचा समावेशही होऊ शकतो. डेटाबेसमधून हवी ती माहिती मिळविण्यासाठी एसक्यूएल कमांड्सचा उपयोग केला जातो. ते आदेश लिहून डेटाबेसला देण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. त्याप्रमाणेच या डेटाबेसचे इन्स्टॉलेशन, कॉन्फिगरेशन, अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मेन्टेनन्स कसे करावे या संदर्भातील माहिती डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात घेता येते.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सॉफ्टवेअरची गुणवत्ता ही महत्त्वाची बाब आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमात सॉफ्टवेअर क्वालिाटी अॅश्युरन्स या विषयाचा समावेश केला गेला आहे. सॉफ्टवेअर क्वालिटी अॅश्युरन्समध्ये मुख्यत: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना येणाऱ्या विविध टप्प्यांवर लक्ष ठेवून गुणवत्तावाढ करणे याचा समावेश होतो. गुणवत्तेची विविध मानके उदा. आयएसओ 9001 आणि 9000-3, IEEE आदींची ओळख या विषयात करून दिली गेली आहे. याच विषयाशी अनुषंगिक असणाऱ्या सॉफ्टवेअर टेिस्टग या विषयाचा समावेशही करण्यात आला आहे.
उद्योग-व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून मोठय़ा प्रमाणात माहिती संकलित करण्यात येते. त्याचा उपयोग व्यवसायाला पूरक असा करता यावा या दृष्टीने बिझनेस इंटेलिजन्स आणि अॅनेलिटिक्स या विषयाचा समावेश केला गेला आहे. अलीकडेच झालेल्या संशोधनात आगामी काळात बिझनेस इंटेलिजन्स आणि अॅनेलिटिक्सला वाढते महत्त्व प्राप्त होणार आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा असून त्याचा समावेश अतिशय स्वागतार्ह आहे. मोठय़ा प्रमाणावर असणारी माहिती वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. त्याचा उपयोग करावयाचा झाल्यास सर्व माहिती एकाच स्वरूपात असणे आवश्यक असते. ती माहिती एकस्वरूपात करणे आणि हवी ती माहिती घेणे यासाठी लागणारी कौशल्ये आणि त्याचे विविध उपयोग माहिती होण्याकरिता डेटा वेअरहाउसिंग व डेटा माईिनग हा विषय शिकणे आवश्यक आहे.
वेब आणि मल्टीमीडियाच्या आजच्या काळात त्याबद्दलची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेब डिझायिनग आणि मल्टीमीडिया हा विषय अभ्यासक्रमात आहे. त्यामध्ये या विषयासंदर्भात मूलभूत माहितीबरोबरच वेब डिझायिनगसाठी लागणाऱ्या HTML, DHTML, VB Script आणि JavaScript चा समावेशही केला आहे.
आजच्या संगणकीय युगात माहितीची देवाणघेवाण मुख्यत: नेटवर्कद्वारेच होते आणि त्यासाठीच नेटवर्क तंत्रज्ञान आणि नेटवर्क सिक्युरिटी हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. नेटवर्कबरोबरच माहितीची सुरक्षितताही महत्त्वाची असल्यामुळे इन्फॉम्रेशन सिक्युरिटी अॅण्ड ऑडिट या विषयाचा अंतर्भाव केला गेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी या विषयातील पायाभूत संकल्पना समजून घेण्यासाठी हा विषय नक्कीच महत्त्वाचा ठरेल.
ई-लìनग, त्याचे प्रकार, त्याला लागणारे तंत्रज्ञान, विविध साधने आणि ई- लìनग संबंधित असलेली मानके याबद्दल ई-लर्निग मेथोडोलॉजीज या विषयात माहिती मिळते. भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस, सॉफ्टवेअर मार्केटिंग, सायबर लॉज, इन्फोटेक इन रिटेल आणि ई-गव्हर्नन्स या आजमितीला महत्त्वाच्या असलेल्या विषयांचासुद्धा समावेश होतो.
एकंदरीत माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन स्पेशलायझेशनमध्ये आवश्यक त्या सर्व विषयांचा समावेश केला गेला आहे. विद्यार्थ्यांनी यापकी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रातील संधी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सुरुवात करावी.
या क्षेत्रामध्ये विकसित होणाऱ्या तंत्रामुळे सतत बदल होत असतात. त्यामुळे या बदलांची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वत: अद्ययावत राहणे हे गरजेचे आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योग व्यवसायामध्ये, सरकारी व निमसरकारी संस्थांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये कशा पद्धतीने केला जातो हे पाहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या विषयाचा अभ्यास करताना केस स्टडीचा वापर उपयुक्त ठरतो. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या संस्था विविध विषयांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा घेत असतात, या परीक्षांची माहिती करून घेऊन आणि प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करून आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवता येते. व्यवस्थापन मुळातच अनुभवाने सिद्ध होते हे लक्षात ठेवून आपल्या आवडत्या क्षेत्रात जास्तीत जास्त अनुभव मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
gokhalesandeep@gmail.com
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन
माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे एमबीएच्या ‘माहिती व्यवस्थापन’ या विद्याशाखेचे उद्दिष्ट आहे. त्याविषयी..
आणखी वाचा
First published on: 18-11-2013 at 07:23 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information technology management