हवामान संरक्षण व हवामानाशी संबंधित असलेल्या स्रोतांचे संवर्धन या विषयांवर जर्मनीच्या हम्बोल्ड्ट फाउंडेशन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दरवर्षी साधारणत: २० आंतरराष्ट्रीय अर्जदारांना पाठय़वृत्ती दिली जाते. ही पाठय़वृत्ती प्रामुख्याने विकसनशील देशांतील विविध विद्याशाखांमधील अर्जदारांसाठी असून ‘इंटरनॅशनल क्लायमेट प्रोटेक्शन फेलोशिप’ या नावाने ओळखली जाते. २०१४-१५च्या पाठय़वृत्तीसाठी पर्यावरण मंत्रालयाने १५ मार्च २०१४ पूर्वी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
पाश्र्वभूमी :
सभोवतालच्या हवामानातील सततच्या बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सर्व देशांच्या आपापसांतील सहकार्याने मात करता येऊ शकते, या विचाराने पर्यावरणाच्या या क्षेत्रात भावी नेतृत्व तयार व्हावे, म्हणून हम्बोल्ड्ट फाउंडेशन व जर्मनी शासनाच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून हा पाठय़वृत्ती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाने या पाठय़वृत्ती कार्यक्रमामधून पाठय़वृत्तीधारक व जर्मनीतील यजमान संस्था यांच्यामध्ये संशोधन विषयांतील ज्ञानाची, तसेच संशोधनाशी संबंधित तंत्रज्ञान व कार्यप्रणाली यांची आदानप्रदान व्हावी असा व्यापक हेतू आहे.
पाठय़वृत्तीबद्दल :
ही पाठय़वृत्ती या विद्यार्थ्यांना हवामान संरक्षण किंवा हवामान स्रोतांच्या संवर्धनाशी संबंधित संशोधनावर आधारित प्रकल्प करण्यासाठी आहे. पाठय़वृत्तीचा कालावधी एक वर्षांचा असून पाठय़वृत्तीधारकाला तो जर्मनीतच व्यतीत करावा लागेल. जर्मनीच्या हम्बोल्ड्ट फाउंडेशन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून दरवर्षी सुमारे २० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट प्रोटेक्शन फेलोशिप्स’ बहाल केल्या जातात. या पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला त्याच्या शैक्षणिक – संशोधन पात्रता व व्यावसायिक अनुभवावर मासिक भत्ता दिला जाईल. हा भत्ता साधारणपणे प्रतिमहिना २,१५० युरोपासून ते २,७५० युरोपर्यंत असेल. यामध्ये त्याच्या आरोग्य विम्याचाही समावेश असेल. याबरोबरच पाठय़वृत्तीधारकाला जर्मन भाषा शिकण्यासाठी, पाठय़वृत्तीच्या दरम्यान आवश्यक असल्यास युरोपमध्ये फिरण्यासाठी आणि त्याच्यासह जर त्याचे कुटुंब असल्यास अतिरिक्त भत्ता दिला जाईल.
आवश्यक अर्हता :
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करणारा अर्जदार मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी किंवा हवामान बदलांशी संबंधित कायदा, अर्थशास्त्र व सामाजिक शास्त्रे यांपकी कोणत्याही एका विद्याशाखेतील उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमीसह पदवीधर असावा. त्याचप्रमाणे सध्या कोणत्याही सेवेत असणाऱ्या अर्जदारांना हवामान संरक्षण किंवा संबंधित कार्यक्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदार जर विद्यार्थी असेल तर या विषयाशी संबंधित एखाद्या प्रकल्पामध्ये त्याने काम करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे अंगभूत नेतृत्व कौशल्ये असावीत.
निवड प्रक्रिया :
पाठय़वृत्तीसाठी आलेल्या सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर तज्ज्ञांच्या निवड समितीकडून कोणत्या अर्जदाराला मुलाखतीसाठी पाचारण करायचे याचा निर्णय होईल. जुल २०१४च्या सुमारास अर्जदारांना मुलाखतीसाठी जर्मनीत बोलावले जाईल. मुलाखतीनंतर लगेचच अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल कळवले जाईल. संस्थेच्या वेबसाइटवर पाठय़वृत्ती कार्यक्रमाच्या अर्ज प्रक्रियेची व निवड प्रक्रियेची सर्व माहिती तारखांसह विस्तृतपणे दिलेली आहे.
अंतिम मुदत :
या पाठय़वृत्तीसाठी संपूर्ण भरलेल्या अर्जासह आवश्यक इतर कागदपत्रे पाठवण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http://www.humboldt-foundation.de/icf
itsprathamesh@gmail.com
इंटरनॅशनल क्लायमेट प्रोटेक्शन फेलोशिप, जर्मनी
हवामान संरक्षण व हवामानाशी संबंधित असलेल्या स्रोतांचे संवर्धन या विषयांवर जर्मनीच्या हम्बोल्ड्ट फाउंडेशन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दरवर्षी
First published on: 02-12-2013 at 07:36 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International climate protection fellowship germany