तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील विख्यात ‘युनिव्हर्सटिी ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणानंतर पुढे संबंधित विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पीएच.डी. करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संशोधनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (मास्टर्स बाय रिसर्च) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिलीजाईल. या वर्षीच्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून २० ऑगस्ट २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल : ‘युनिव्हर्सटिी ऑफ टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलरशिप’ (यूटीएसआयआरएस) या नावाने ओळखली जाणारी ही  शिष्यवृत्ती सिडनीच्या युनिव्हर्सटिी ऑफ टेक्नॉलॉजीकडून दिली जाते. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठाला ‘असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी नेटवर्क’ आणि ‘असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सटिीज’ या संस्थांकडून उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे.  या वर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण संशोधन शिष्यवृत्तींची संख्या ६० एवढी आहे. प्रत्येक शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा कालावधी वेगवेगळा असेल.  पीएच.डी.च्या शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती तीन वर्षांसाठी आणि पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी संपादन करणे अपेक्षित आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरिता शिकवणी शुल्क दिले जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही. अर्जदाराने त्याच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या वेबसाइटवर तपासावी.  
अर्हता : ज्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सटिी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनीमध्ये पदव्युत्तर संशोधनासाठी प्रवेश मिळालेला आहे, केवळ तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. यूटीएसआयआरएस ही शिष्यवृत्ती विज्ञान-तंत्रज्ञानातील कोणत्याही विषयामधील पीएच.डी.साठी किंवा पदव्युत्तर पातळीच्या संशोधन करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा अर्जदार पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा त्या पदवीच्या अंतिम वर्षांला शिकत असावा. मात्र, पदवीसोबत त्याच्याकडे संशोधनाचा उत्तम अनुभव असावा. अर्जदाराला त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे लागेल. पदवी-पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदार टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हींपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांनी विद्यापीठाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू नये.
अर्ज प्रक्रिया : ‘यूटीएसआयआर-एस’च्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून पुढे नमूद केलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाला ई-मेलद्वारे संपर्क करू शकतात. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा संशोधन अहवाल, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्टस्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील, तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुणविद्यापीठाला कळवावे.   
अंतिम मुदत : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा :http://www.gradschool.uts.edu.au/
 itsprathamesh@gmail.com

Story img Loader