जगाच्या पाठीवर असलेल्या मोजक्या प्रगत देशांमध्ये इस्रायलने आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या मुळाशी आहे इस्रायलचे शैक्षणिक धोरण.  आजच्या घडीला जवळपास १०० टक्के साक्षरता या देशात आढळते.  सक्तीचे सैनिकी शिक्षण आणि शिक्षणातून मनुष्यबळ विकासाला चालना ही इस्रायलच्या शिक्षणप्रणालीची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. त्याविषयी-
इस्रायल हा देश सर्व बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी वेढलेला आहे. मी ज्या इलाट शहरात प्रथम गेलो तेथून हाकेच्या अंतरावर जॉर्डन देश आहे. तर केवळ तीन किलोमीटर अंतरावर इजिप्त देशाची सीमा आहे. पॅलेस्टाईन देश तर इस्रायलसाठी काही ना काही निमित्ताने सतत समस्या निर्माण करीत असतो. अशा परिस्थितीत टिकून राहायचे तर उत्तम सनिक बळ असणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांनी सनिकी शिक्षण सर्वाना सक्तीचे केलेले आहे. १२ वर्षांचे शालेय शिक्षण झाले की प्रत्येकाने सनिक शाळेत दाखल व्हायचे असते. मुलगा असो की मुलगी, ज्यू असो की अरब प्रत्येकाने सनिकी शिक्षण घेतलेच पाहिजे असा दंडक आहे. त्यातील थोडेच लोक सन्यात राहतात. बरेचसे लोक तीन वर्षांचे सनिक शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणाला जातात. तिथल्या एका शिक्षिकेने मला सांगितले की, तीन वर्षांचे सनिकी शिक्षण त्यांना फारच उपयोगी ठरते. सनिकी शाळेत जी शिस्त लागते ती जन्मभर टिकते. ही शिस्त त्यांच्या दैनंदिन वागण्यातदेखील दिसते. वाहतुकीचे नियम ते काटेकोरपणे पाळतात. जेरुसेलमच्या होटेलमधून मी मध्यरात्री बाहेर पाहिले तर एका लाल सिग्नलजवळ एक टॅक्सीवाला सिग्नल मिळण्याची वाट पाहात होता. रस्ता पूर्ण मोकळा असूनदेखील सिग्नल ओलांडून जावे असे त्याला वाटले नाही.  
देश सतत अतिरेक्यांच्या कारवायांच्या सावलीत असतो. त्यामुळे तिथे सतत सतर्कता बाळगली जाते. विमानतळावर फारच कडक सुरक्षा असते. आपल्याकडे आपण आधी आपण चेक-इन करतो आणि त्यानंतर सुरक्षा तपासणी केली जाते. तेथे हा क्रम उलटा असतो. सुरक्षा रक्षकाने हिरवा कंदील दाखविल्याशिवाय तुम्ही विमान कंपनीच्या काउंटरवर पोहोचूच शकत नाही. चुकून गेलाच तर तुम्हाला परत पाठवले जाते. त्यामुळे विमानतळाच्या बाहेरच सुरक्षा तपासणीसाठी मोठी रांग लागते. आपल्याकडे कोणत्याही शाळेत जाणे फारच सोपे असते. तिथे मात्र शाळेच्या भोवती सुरक्षािभत असते. दारावर सनिकी वेशात सुरक्षा अधिकारी असतो. योग्य कागदपत्रे असल्याशिवाय अथवा शाळेतील कोणीतरी तुमच्यासोबत असल्याशिवाय तुम्हाला शाळेत प्रवेश मिळत नाही. देशात ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम धर्माची तीर्थस्थाने आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने पर्यटक या देशात येतात. त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची मोठीच जबाबदारी आहे. या कामी सनिकी शिक्षण घेतलेले तरुण त्यांना उपयोगी पडतात. म्हणूनच तीर्थस्थळांना भेटी देऊन तिथल्या सुरक्षेची महिती घेणे हा सनिकी शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. आम्ही जेव्हा जेरुसलेम शहरातील तीर्थस्थळांना भेटी द्यायला गेलो तेव्हा तिथे मोठय़ा संख्येने सनिकी वेशातील तरुण मुले-मुली होत्या. तेथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे, याची माहिती देण्यासाठी त्यांना मुद्दामच तिथे आणले होते. सनिकी शिक्षण घेतलेले तरुण देशात सर्वत्र सुरक्षा बाळगण्याकरता उपयोगी पडतात.
आपल्याकडे प्रौढ शिक्षण म्हटले की साक्षरता प्रसार असे समीकरण झाले आहे. इस्रायलच्या संदर्भात बोलायचे झाले तर साक्षरता हा फारसा महत्त्वाचा विषय राहातच नाही. याचे कारण तेथील सर्वाना लिहिता-वाचता येते. तेथे प्रौढ शिक्षण याचा अर्थ नवीन व्यवसाय शिक्षण असा आहे. समाजात होणारे बदल आणि तंत्रज्ञानाचा विकास याचा विचार करता बऱ्याच प्रौढ व्यक्तींना नवीन कौशल्ये शिकावी लागतात. नाहीतर त्यांना नोकरी गमवावी लागते. अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी अशा व्यक्तींना नवीन व्यवसाय शिक्षण प्रौढ वर्गातून दिले जाते. याहीपेक्षा महत्त्वाचे हे की, उतार वयातदेखील लोकांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळवून दिली जाते. बारावीनंतर तीन वर्षे
सनिकी शिक्षण घेण्यात जातात. त्यामुळे बरेचजण उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. विशेषता स्त्रियांचे तोपर्यंत लग्नाचे वय झालेले असते. त्यामुळे बऱ्याच मुली लग्नाच्या बेडीत अडकतात. संसार स्थिरस्थावर झाल्यावर आणि मुले मोठी झाल्यावर मात्र त्यांना पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा होते. अशा स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची संधी इस्रायल सरकारने उपलब्ध करून दिली आहे. बेन गुरिओन विद्यापीठात एम. एड. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढे माझे व्याख्यान होते. मी वर्गात जाऊन नजर टाकली तर माझ्या असे लक्षात आले की, तेथे असलेले बहुतांशी विद्यार्थी महिला असून त्या चाळिशी उलटून गेलेल्या होत्या. अशी संधी उपलब्ध करून दिल्याने राहून गेलेले उच्च शिक्षण उतारवयातदेखील त्यांना पूर्ण करता येते.  
आजच्या घडीला जवळ जवळ १०० टक्के साक्षरता या देशात आढळते. जगाच्या पाठीवर असलेल्या मोजक्या प्रगत देशांमध्ये इस्रायलने आपले स्थान निर्माण केलेले आहे. सुरक्षेशी संबधित सॉफ्टवेअर निर्यात करण्यात हा देश आघाडीवर आहे. हे सगळे शक्य झाले, कारण इस्रायलने मनुष्यबळ विकासावर आपले लक्ष केंद्रित केले.
प्राध्यापिका मिरिअम अमित यांनी अगदी मोजक्या शब्दांत इस्रायलमधील शिक्षणप्रणालीबद्दल सांगितले. त्यांचीच वाक्ये येथे उद्धृत करीत आहे- ‘आमचा देश आकाराने एक लहानसा देश आहे. देशात साधनसंपत्ती फारशी नाही. सर्वत्र वाळवंट, शेतीसाठी योग्य अशी अगदी थोडीशीच जमीन उपलब्ध आहे. खनिज संपत्ती बेताचीच, तेलसाठा असून नसल्यासारखाच. त्यामुळे मुले हीच आमची संपत्ती आहे. त्यांचा विकास करूनच आम्ही देशाची प्रगती करू शकतो याची आम्हाला चांगली जाणीव आहे. म्हणूनच आम्ही मनुष्यबळ विकासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी योग्य शिक्षणप्रणाली विकसित केली. त्याचीच फळे आम्ही आता चाखतो आहोत.’
१९४८ साली निर्माण झालेला हा देश. केवळ ६० वर्षांच्या अल्पावधीत त्या देशाने नेत्रदीपक अशी प्रगती करून प्रगत देशांच्या पंगतीत आपल्या देशाला नेऊन बसवले आहे. या प्रगतीच्या मुळाशी आहे त्यांचे शैक्षणिक धोरण. हे धोरण मनुष्यबळ विकासाला चालना देणारे आहे.
मला वाटते भारताने यापासून धडा घेण्यासारखा आहे. इस्रायलची शेती बघण्यासाठी भारतातून अनेक लोक इस्रायलला जातात. तेथील शिक्षणप्रणाली बघण्यासाठीदेखील भारतीयांनी इस्रायलला जाण्याची गरज आहे.                                  
sudhakar.agarkar@gmail.com
(समन्वयक : हेमंत लागवणकर)

Story img Loader