वकिली व्यवसायात कित्येक नवीन क्षेत्रे विकसित होत आहेत. या क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी आवश्यक ठरणारी कौशल्ये, अभ्यासक्रम याबाबतचे मार्गदर्शन
फार जुनी परंपरा असलेल्या करिअरच्या पर्यायाची आज नव्याने ओळख करून घेऊ या आणि तो म्हणजे कायदे शिक्षणातील करिअर संधीचा. ‘अम्ब्रोस बीअर्स’ या लेखकाने त्याच्या ‘डेव्हिल्स डिक्शनरी’ या उपरोधिक लेखनात वकिली व्यवसायाचे वर्णन करताना असे लिहिले आहे की, lawer is someone who is skilled in the ‘circumvention of the law’. अगदी खरं आहे, आपल्या देशातसुद्धा कायद्यातून पळवाटा शोधून काढण्याइतकी कायद्याची समज ज्याला आहे, अशा वकिलाला भलतीच मागणी असते. अर्थात, त्यासाठी त्याचे ज्ञान सखोल असणे गरजेचे आहे, हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आजपर्यंत होऊन गेलेले अनेक प्रसिद्ध लेखक, राजकारणी, स्वातन्त्र्यसेनानी हे वकील होते. महात्मा गांधी, डॉ. राजेन्द्र प्रसाद, फ्रान्झ काफ्का, अब्राहम लिंकन ही सर्व सन्मान्य व्यक्तिमत्त्वे वकीलच होती.
एकंदरीतच आपल्याकडील कायद्यांचे स्वरूप फार क्लिष्ट असल्याने वकील आणि न्यायाधीशांचे न्यायव्यवस्थेतील स्थान महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देशात फार पूर्वीपासूनच वकिली (कायदेशास्त्र) हा पेशा लोकप्रिय आहे. सामान्यत: ज्या कुटुंबांतून पिढय़ान्पिढय़ा वकिली व्यवसाय चालत आला आहे, अशा घरांतील विद्यार्थ्यांचा कल वकिली शिक्षणाकडे अधिक असतो. अर्थात वकील होण्यासाठी अशा प्रकारच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीची किंवा वकिलीचा वारसा असण्याची मुळीच गरज नाही. जर मनापासून आवड असेल तर कोणीही व्यक्ती कायद्याचे शिक्षण घेऊ शकते.
बदलत्या काळाबरोबर समान नागरी हक्क व त्यातील कायदे यांबाबत जागृत होत आहे, आणि साहजिकच कायदा क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती आणि लोकप्रियताही वाढत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर वकील म्हणजे वकिलीचा व्यवसाय स्वीकारत अशिलांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी सरकारने अधिकृत केलेली व्यक्ती. वकील असलेल्या व्यक्तींना कायद्याचा समर्थपणे आधार घेत, आपल्या अशिलांचे प्रतिनिधित्व करण्याची व त्यांचा कायदे सल्लागार होण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते. कायद्याचा अधिवक्ता (अॅडव्होकेट) या नात्याने वकिलांना फिर्यादी किंवा प्रतिवादी अशिलाच्या वतीने न्यायालयात तोंडी युक्तीवादाद्वारे किंवा प्रस्ताव, टिपणे अशा लेखी कागदपत्रांद्वारे खटला चालवण्याचे काम करावे लागते, तर सल्लागार म्हणून खटल्यातील घटना कायद्याच्या चौकटीत बसवण्याबाबत अशिलांशी सल्ला-मसलतही करावी लागते.
अनुभवी वकिलांचे वेतन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदा. कामाचे ठिकाण, संस्थेची किंवा कंपनीची क्षमता, सदर संस्थेत कोणत्या प्रकारची कामे केली जातात वगरे. सरकारी खात्यात काम करणाऱ्या पदवीप्राप्त वकिलाला सरकारी नियमांप्रमाणेच वेतन मिळते. स्वतंत्रपणे वकील किंवा कायदे सल्लागार म्हणून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची आमदनी त्याच्याकडे येणाऱ्या अशील, ग्राहक यांच्या संख्येवर व त्यांच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असते. कोर्टात वकिली सुरू करणाऱ्या वकिलांना पाच हजार ते ४० हजारांपर्यंत विद्यावेतन (स्टायपेंड) मिळू शकते. अर्थात हा आकडा ते कोणत्या ज्येष्ठ वकिलाच्या हाताखाली काम करत आहेत, यावर अवलंबून असतो. या क्षेत्रातील उत्तम मिळकत देणारा व्यवसाय म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोìसग. असे काम करणाऱ्या कायद्यातील पदवीधराची प्राप्ती २० हजार ते ५० हजार असू शकते.
कायद्यातील पदवीधरांसाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. एकतर कोर्टात वकिली करणे किंवा कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करणे, नाहीतर पब्लिक सíव्हस कमिशनच्या परीक्षांद्वारा न्यायाधीश म्हणून रूजू होणे. पुरेसा अनुभव घेतल्यानंतर कायद्यातील पदवीधर, सरकारी, मंत्रालयीन विभागांतून सॉलिसिटर जनरल अथवा पब्लिक प्रोसिक्युटर या पदांवरून आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर सरकारी सेवेत करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या आस्थापानांतून कायदेविषयक सल्लागार, महाविद्यालयांतून प्राध्यापक, स्वयंसेवी संस्था किंवा दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्रे अशी प्रसारमाध्यमे असे नानाविध पर्याय खुले आहेतच.
योग्य, पात्र वकिलांची कमतरता ही नेहमीच भारताच्या न्यायव्यवस्थेपुढील मोठी अडचण राहिली आहे. कायद्याचे पदवीधर असलेले तरुण होतकरू युवक-युवती सदस्य होत नसल्याची खंत बार कौन्सिलने वारंवार व्यक्त केली आहे. कायदेतज्ज्ञांची आकडेवारी असं सांगते की, देशातील जवळपास १० लाख वकिलांपकी फक्त २० टक्केच कोर्टात वकिली करण्यायोग्य आहेत. म्हणूनच देशातील कायदे शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि कुशल वकील घडवण्यासाठी, कायदे शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना झाली.
कोर्ट-कज्जे आणि खटल्यांच्या संख्येत आपला देश सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याने वकिली पेशाला आपल्याकडे नेहमीच बरकत राहणार, हे नक्की. ब्रिटिश वकील आणि शिक्षणतज्ज्ञ सर आयवोर जेन्निन्ग्स यांनी भारतीय संविधानाचा उल्लेख ‘वकिलांसाठी स्वर्ग’ असा केला आहे. थोडक्यात काय, प्रतिभावान वकिलाला मिळकतीची चिंता नाही.
वकिली व्यवसायात टिकून राहण्यासाठी प्रचंड संयमाची आणि तर्कसुसंगत कौशल्याची गरज असते. या पेशात यशस्वी व्हायचे असेल तर निष्ठापूर्वक आणि अविश्रांत मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. वकिलीची कोणतीच पाश्र्वभूमी किंवा पूर्वानुभव नसताना या व्यवसायात उतरणाऱ्या व्यक्तींना साहजिकच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. करिअरच्या सुरवातीला जर एखाद्या ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली तर मार्ग थोडा सुकर होतो, इतकेच. याचा अर्थ नवशिक्या उमेदवारांनी हार मानण्याची मुळीच गरज नाही, कारण तीव्र मनोनिर्धार आणि प्रयत्नांची जोड असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. याव्यतिरिक्त वकील होण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य, विश्लेषणासाठी आवश्यक ठरणारे उपजत ज्ञान, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान या अंगभूत गुणांची आवश्यकता असते.
तीन वर्षांचा एलएल.बी. शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी तीनही वष्रे मिळून साधारणपणे २० ते ३० हजार रु. इतका खर्च येतो. पण पाच वर्षांच्या बी.ए.-एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी मात्र सुमारे तीन लाख एवढा खर्च येतो. साहजिकच हा पर्याय तुलनेने खर्चीक वाटतो, शिवाय वसतिगृहाच्या खर्चात शिक्षणक्रमाचे शुल्क अंतर्भूत नसते.
भारतातील कायदेविषयक व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने आणि परदेशी कायदे कंपन्यांना भारतात व्यवसाय सुरू करता यावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हे शक्य झाल्यास कायद्यातील पदवीधरांना परदेशी लॉ फम्र्समध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. लीगल प्रोसेसेस आऊटसोìसग व्यावसायिकांनी अमेरिकी कायदे, इंग्लंडचे कायदे या संदर्भातील कामांसाठी कायद्यातील पदवीधारकांची नेमणूक सुरू केली आहे. कायदे शिक्षणाची व्यापकता वाढल्याने त्यांतील कमी अवधीचे अभ्यासक्रम करण्याकडे अन्य व्यावसायिकांचा कल वाढत आहे. यामुळे एकूणच कायदेविषयक जागृती वाढण्यास मदत होईल, हे मात्र नक्की.
भारत आणि इंग्लंडमधील कायदेविषयक शिक्षणात बरेच साम्य आहे. तसेच इंग्लंडमधील बरीच विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांना कायदे शिक्षण घेण्याची संधी देऊ करतात. इंग्लंडमध्ये कामाचा मोबदला उत्तम मिळत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांनाही इंग्लंडमध्ये काम करण्यात विशेष रस असतो. आजकाल भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील महाविद्यालयांतून कायद्याचे शिक्षण घेतात आणि अभ्यासक्रम पूर्ण होताच अमेरिकेतच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्याही मिळवतात. परदेशांत कायदे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आज हार्वर्ड लॉ स्कूल, येल युनिव्हर्सटिी, ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सटिी असे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
डॉक्टर्स किंवा चार्टर्ड अकौंटन्ट्सप्रमाणे वकिलांनाही स्वत:च्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी व अशिलांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी भरपूर अनुभवाची गरज असते. त्यांच्या वकिली ज्ञानाची परिणामकारकता दिसून येण्यासाठी पुरेसा काळ जावा लागतो. म्हणूनच वकिली पेशात यशस्वी होण्याचा निर्धार केलेल्या होतकरू वकिलांनी व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात संयम, धीर बाळगणे जरुरीचे आहे. अर्थात वकिलीचा जम बसल्यानंतर मात्र मिळणाऱ्या यश, सत्ता, पसा या कशालाच मर्यादा नसतात, हेही तितकेच खरे.
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सटि (NLSIU) बंगलोर किंवा नालसार, हैदराबाद अशा सर्वोत्तम कायदे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांतून, पाच वर्षांचा बी.ए.एलएल.बी. शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉ फम्र्स आणि आय.टी.ई.एस. (इम्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अँड एनेबल्ड सर्व्हिसेस) फम्र्समधून नोकरीच्या आकर्षक संधी उपलब्ध होतात. बरेच जण स्वत:चा कायदेविषयक व्यवसाय करण्याचा पर्याय स्वीकारतात. कोर्टात वकिली करू इच्छिणाऱ्या कायद्याच्या पदवीधर व्यक्तीला ज्येष्ठ वकिलांच्या हाताखाली काम करावे लागते आणि बार कौन्सिल ऑफ इंडियात स्वत:ची नोंदणी करून घेणे आवश्यक असते.
लॉ फम्र्स किंवा ज्येष्ठ वकिलांकडे काम करण्याची संधी मिळवण्यासाठी कोर्टातील कामाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव कामास येतो. खरंतर बहुतांश लॉ कॉलेजेस, शेवटच्या वर्षांत कायद्याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना देतच असतात, तरीही विद्यार्थ्यांनी आपणहून वरचेवर कोर्टात जाऊन न्यायालयातील दैनंदिन कारभार समजून घेतला पाहिजे.
करिअरच्या संधी
खासगी तसेच सरकारी आस्थापानांतून वकिली शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पण बरेचसे वकील रीतसर वकिलीच्या व्यवसायाकडेच वळतात. यासाठी मात्र स्थानिक/ राज्य/ केंद्रीय बार कौन्सिल चा नोंदणीकृत सदस्य होणे क्रमप्राप्त असते. केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांचा पर्यायही कायदे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती स्वीकारू शकतात.
वेगवेगळ्या न्यायालयांतून न्यायाधीश, मुखत्यार वकील (अॅटर्नी), सॉलिसिटर, सरकारी वकील तसेच देशाच्या संरक्षण मंत्रालय, कर वसुली विभाग (टॅक्स डिपार्टमेंट), कामगार कल्याण विभाग (लेबर डिपार्टमेंट) अशा क्षेत्रांमध्येही त्यांची नेमणूक होऊ शकते. इतकेच नाही तर कायदेसल्लागार किंवा कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून खासगी कंपन्या, संस्था, कौटुंबिक वाद, कलह या क्षेत्रांतही वकील व्यक्तींची गरज भासते.
खासगी संस्थांतून कंपनी सेक्रेटरी म्हणूनही ते काम करू शकतात. टॅक्स लॉज, पेटंट लॉज, एक्साइज लॉज, इन्व्हायम्रेन्टल लॉज, लेबर लॉज या संबंधात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांतून (कन्सल्टन्सी फर्म) कायदेशिक्षित व्यक्ती काम करू शकतात. त्याचबरोबर निरनिराळ्या ट्रस्टचे (न्यास) विश्वस्त, प्रसारमाध्यमांतून पत्रकार, कायद्याचे शिक्षण देणारी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधून शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणूनही कायदेशिक्षण घेतलेल्यांना भरपूर वाव मिळतो.
स्वयंसेवी संस्थांना (एन.जी.ओ.) वकिली सेवेची गरज भासते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर युनो, इलो (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) इसिजे (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) यांतून नामांकित, यशस्वी वकिलांची नेमणूक होऊ शकते.
कायदेविषयक व्यवसाय करण्यासाठी..
कायदे क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम (एलएल.बी) किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांचा कायदा अभ्यासक्रम करू शकतात. खरंतर तीन वर्षांऐवजी पाच वर्षांचा अभ्यासक्रम करणे केव्हाही चांगले. बहुतेक वेळा महाविद्यालयांतून तीन वर्षांचा डिग्री लॉ कोर्स उपलब्ध असतो. अन्य विद्याशाखांतून पदवी घेतलेल्या, पण एलएल.बी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो चालवला जातो. परंतु वकिली व्यवसाय किंवा कायदेविषयक अन्य कोणताही व्यवसाय करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षांचा कायदे प्रशिक्षणक्रम स्वीकारणे उत्तम.
एलएल.बी. कोर्स बार कौन्सिलद्वारा नियंत्रित केला जातो. देशांतर्गत वकिली करण्यासाठीच्या अटी व नियम, बार कौन्सिलकडूनच ठरवले जातात. कायदेविषयक विशेष उच्च शिक्षण मास्टर्स, एमफील, पीएचडी या स्तरावर घेता येते. अशा उच्च शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी होतो. आजकाल फक्त सिव्हिल/ क्रिमिनल शाखांतील कायदे शिक्षणाला प्राधान्यक्रम न देता विद्यार्थी कायद्याच्या इतर अनेक शाखांचे शिक्षण घेऊ शकतात. उदा. पेटंट लॉ, कॉर्पोरेट लॉ वगरे. कारण कायद्यातील पदवीचा उपयोग केवळ वकिली करण्यासाठीच होतो असे नाही, तर या शिक्षणाद्वारे खासगी व्यवस्थापन, प्रशासकीय सेवा, कायदेविषयक सेवा अशा अनेक क्षेत्रांत व्यवसायाचे, रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध होतात.
पाच वर्षांच्या बी.ए.एलएल.बी. प्रवेशासाठी पूर्ण देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. द नॅशनल लॉ एन्ट्रन्स एक्झाम, कम्बाइन्ड लॉ अॅडमिशन टेस्ट- एलएटी या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान (जनरल इंग्लिश), कायदेविषयक स्वाभाविक ज्ञान (लीगल अॅप्टिटय़ूड), सामान्य ज्ञान (जनरल अवेअरनेस), ताíकक कौशल्य (लॉजिकल स्किल) यांची चाचपणी होते. वास्तविक पाहता इच्छुक उमेदवारांनी सीनिअर सेकंडरी एक्झाम संपताच या प्रवेश परीक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा.
काही विद्यापीठांतून तीन वर्षांच्या एलएल.बी. कोर्सच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा अनिवार्य असते, त्यासाठीचा अभ्यासक्रमही साधारण असाच असतो.
वकिली व्यवसाय करण्यासाठी एक वर्षांच्या प्रत्यक्ष कामाचा (इंटर्नशिप) अनुभव अनिवार्य आहे. ही अट कायदे शिक्षण प्रशिक्षणाच्या शेवटच्या वर्षांतही पूर्ण करता येते.
बऱ्याच शैक्षणिक संस्था व विद्यापीठांतून एलएल.बी पदवी प्रशिक्षणक्रमासोबतच कायद्याच्या विविध शाखांतील पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय आहे. याअंतर्गत पी.जी. प्रोग्राम्स इन लॉ (एलएल.एम.), कायद्याच्या विविध शाखांतील पदव्युत्तर पदविका कोस्रेसचा समावेश होतो. याचा कालावधी दोन वर्षांचा असून इच्छुक विद्यार्थी एलएल.बी पदवीधर असणे गरजेचे आहे.
कायद्यांची विभागणी काही विशेष शाखांमध्ये होते. उदा. सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, कॉर्पोरेट लॉ, इन्कम टॅक्स लॉ, इंटरनॅशनल लॉ, लेबर लॉ, कॉन्स्टिटय़ूशनल लॉ, पेटंट लॉ वगरे.
कायदे शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या विविध शाखा
कायदे शिक्षणाच्या विविध शाखांप्रमाणे त्यांतील वकिली व्यवसायाच्याही वेगवेगळ्या शाखा आहेत.
* (क्रिमिनल लॉयर) फौजदारी वकील- या प्रकारच्या वकिलांना फौजदारी कायदे, त्यातील कायदे प्रक्रिया, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पीनल कोड, एव्हिडन्स अॅक्ट आणि अन्य दंड विधाने (पीनल लॉज) याबाबत सखोल ज्ञान असते.
* (सिव्हिल लिटिगेशन लॉयर)- दिवाणी खटल्याचे वकील- असे वकील दिवाणी कायदे (सिव्हिल लॉ) उदा. कर निर्धारण कायदे (टॅक्सेशन लॉज), अबकारी कर कायदे (एक्साइज लॉज) यांत तज्ज्ञ असतात.
* (लीगल अॅनलिस्ट) कायदे विश्लेषक- या व्यक्ती कंपन्या किंवा लॉ फम्र्समध्ये काम करतात आणि त्या कंपनीच्या कामकाजासंदर्भात लागू होणाऱ्या कायद्यांचे विश्लेषण करतात
* डॉक्युमेंट ड्राफ्टिंग लॉयर- या प्रकारचे वकील तरतऱ्हेच्या खटल्यांसाठी लागणारे करारनामे (अॅग्रीमेंट), खटल्यांसंबंधातील आवश्यक कागदपत्रांची, अटी व शर्तीची पूर्तता यामध्ये तरबेज असतात.
* (लीगल जर्नलिस्ट) विधी पत्रकार – या प्रकारचे पत्रकार गुन्हेविषयक बातम्या, न्यायालये, लवादी न्यायालये (अरबीट्रेशन कोर्ट), आंतरराष्ट्रीय न्यायालये आणि लवादी घटना
(अर्बीट्रेशन इव्हेन्ट) यांतील न्यायालयीन कार्यवाहीचा वृत्तान्त प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवतात.
* (लीगल अॅडव्हायजर) कायदेविषयक सल्लागार- या पेशातील व्यक्ती कॉर्पोरेट फम्र्सना त्यांची कायदेशीर कर्तव्ये, बांधीलकी, हक्क आणि इतर फम्र्सबरोबर असलेल्या कायदेशीर संबंधांबद्दल मार्गदर्शन करतात.
* (गव्हर्न्मेंट लॉयर) सरकारी वकील- हे वकील पोलीस खात्याशी समन्वय साधून सरकारसाठी काम करतात.
* (जज्ज) न्यायाधीश- खटल्यात समावेश असलेल्या सर्व व्यक्तींच्या बाजू ऐकून घेऊन खटल्याचा निकाल देणे, न्यायालयीन कारवाई करणे अशी निर्णायक जबाबदारी या व्यक्ती पार पाडतात.
अग्रगण्य शिक्षणसंस्था
* नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सटिी, बंगलोर
* गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी, गांधीनगर
* सिम्बोयसिस सोसायटीज लॉ कॉलेज, पुणे
* नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी, जोधपूर
* नालासार युनिव्हर्सटिी ऑफ लॉ, हैदराबाद
* नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सटिी,भोपाळ
* फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली
* बनारस िहदू युनिव्हर्सटिी, वाराणसी
* नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ ज्युरिडीकल सायन्सेस, कोलकाता
* इंडियन लॉ सोसायटीज लॉ कॉलेज, पुणे
* गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज, मुंबई
* अॅमिटी लॉ स्कूल, दिल्ली
* अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सटिी, अलीगढ
* हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी, रायपूर
* डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सटिी, चेन्नई
अनुवाद – गीता सोनी
geetacastelino@yahoo.co.in
क.. कायद्याचा!
वकिली व्यवसायात कित्येक नवीन क्षेत्रे विकसित होत आहेत. या क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी आवश्यक ठरणारी कौशल्ये, अभ्यासक्रम याबाबतचे मार्गदर्शन फार जुनी परंपरा असलेल्या करिअरच्या पर्यायाची आज नव्याने ओळख करून घेऊ या आणि तो म्हणजे कायदे शिक्षणातील करिअर संधीचा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2013 at 01:19 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K kaydyacha