या स्वरूपाच्या व्यावसायिक कामात जमिनीचे कायदे, तिचे मूल्यांकन करणे, विकासाच्या दृष्टीने जमिनीची नेमकी स्थिती कशी आहे, तिथे आर्थिक विकास कसा साधता येईल याचा अंदाज घेणे. ज्या जागेवर लॅण्डस्केपचा विकास केला जाणार आहे, तिथे नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या इमारती आहेत? पर्यावरणाच्या/ संवर्धनाच्या दृष्टीने कोणती जागा राखून ठेवायची? जागा कशी विकत घ्यायची व तिचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे? शहरीकरणाचा विस्तार कसा असावा? जागा जितकी मोठी तितके त्यावर लॅण्डस्केप डिझाइन करायला मुबलक वाव असतो. पण त्यासाठी नेमकी व आवश्यक ती दृष्टी नि त्या जोडीला येणाऱ्या खर्चाचादेखील नेमका अंदाज असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेण्याचे काम या विकासकाचे असते.
लॅण्डस्केप नियोजक
एखाद्या जागेची चुकीच्या दृष्टीने आखणी केली असेल, परंतु ती उत्तमप्रकारे बांधली असेल, तर एक चांगली बांधणी म्हणून त्याकडे पाहिले जाईल. परंतु, अशा जागेचा उत्तम लॅण्डस्केपच्या यादीत कधीच समावेश केला जाणार नाही. इथे खेदाने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, हल्ली नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या शहरांमध्ये हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत. याबाबत उदाहरणच द्यायचे झाले तर सायकल ट्रॅकचे देता येईल. सायकल ट्रॅक बांधले चांगले आहेत, त्याबाबत आवश्यक ती सूचनादेखील खुणांच्या साहाय्याने लोकांच्या लक्षात आणून दिली जाते, पण मुळातच जर त्यासाठी चुकीच्या जागेची निवड केली असेल तर त्याचा काय फायदा? किंवा कधी कधी काही काही इमारती नजरेत भरतील अशा देखण्या स्वरूपात बांधलेल्या असतात, पण नेमक्या जागा चुकीच्या ठिकाणी असतात. परिणामी, त्याऐवजी सोयीपेक्षा अडचणींचाच अधिक सामना करावा लागत असेल, तर त्या सौंदर्याचा काय उपयोग? या सगळ्या समस्या वेळीच टाळायच्या असतील तर लॅण्डस्केपसाठी जागेची निवड करताना तिचे योग्य रीतीने नियोजन अथवा आखणी करणे आवश्यक ठरते.
याशिवाय नदी, बागा, शेती, वाहतूक व्यवस्था, शहरीकरण किंवा तत्सम स्वरूपाच्या जागांचे लॅण्डस्केप करताना विशेष नियोजन करण्याचे कौशल्य लागते. जर हे विशेष नियोजन करून बांधणी केली तर त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतात, हे या शतकात अनेक उदाहरणांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे नियोजन हा लॅण्डस्केप आर्किटेक्चरच्या कामाचा महत्त्वाचा भाग ठरतो.
लॅण्डस्केप सल्लागार
कोणत्याही जागेचा विकास करताना, त्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही ना, याचा विचार प्रथम करणे आवश्यक ठरते. कारण पर्यावरणाला हानी पोहोचली तर त्याची झळ ही तेथील लोकजीवनावर परिणाम करीत असते. त्यामुळे बऱ्याचदा लॅण्डस्केप आर्किटेक्चरबरोबर तज्ज्ञ मंडळींची टीम कार्यरत असते. यात विशेष सल्लागारदेखील असतात. जे त्या त्या जागेचा, तेथील हवा-पाण्याचा, वाहतुकीचा नि अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्यानुसार आवश्यक तो सल्ला आर्किटेक्चरला देत असतात. मग या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून त्या जागेतील लोकांसाठी तयार केले जाणारे लॅण्डस्केप अधिकाधिक कसे सुसह्य होईल, यादृष्टीने तो बांधणी करतो.
लॅण्डस्केप – आर्किटेक्चर
आर्किटेक्चर आणि लॅण्डस्केप अशा दोन्ही गोष्टींची पदवी जर तुमच्याजवळ असतील तर सोन्याहून पिवळे असे समजायला हरकत नाही, कारण एखाद्या इमारतीच्या आजूबाजूच्या भागाचे डिझाइन करताना लॅण्डस्केपच्या ज्ञानाचा उपयोग होतो तर त्या डिझाइनला परिपूर्णता येण्यासाठी आर्किटेक्चरच्या ज्ञानाचा प्रामुख्याने उपयोग होतो. कारण जसजसा काळ वेगाने पुढे जात आहे, तसतशा नवनवीन गरजा निर्माण होत आहेत. त्यामुळेच कोणत्याही जागेचे सुशोभिकरण करताना अथवा नव्याने त्यात बदल घडवून आणताना सजावटीबरोबर प्रत्यक्ष गरजेलाही तितकेच महत्त्व येणार आहे. त्यामुळेच ज्याच्याजवळ या दोन्ही क्षेत्रांतील पदवी असेल, त्यांना कामाच्या दृष्टीने चांगलीच मागणी राहील.
डिझायनर – बिल्डर     
डिझाइन करून बांधकाम करणे, हा डिझायनर मंडळींमध्ये म्हणावा तितका लोकप्रिय ट्रेण्ड नाही, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. कारण वायफळ गोष्टींवर होणारा खर्च कमी करून त्यातून चांगले कसे देता येईल, अशा दृष्टीने ते आपल्या कामाकडे बघत असतात. पण बऱ्याचदा असे होते की, बिल्डरच ही जबाबदारी उचलतात.  परिणामी, तांत्रिक कौशल्याचा अभाव आणि त्या त्या कामाचा नेमका अंदाज न आल्याने अनेकदा प्रकल्प फसलेले दिसून येतात. या उलट, हेच एखादे काम डिझायनर बिल्डरने केले असेल तर त्याला कामाचा नेमका अंदाज आल्याने योग्य त्या बजेटमध्ये चांगले काम झालेले दिसून येते. एखाद्या इमारतीची रचना कशी असावी, याचे आकलन डिझायनरला पटकन होऊ शकते. पण इमारतीचे डिझाइन कसे करावे, या गोष्टी कंत्राटदाराला (कॉण्ट्रॅक्टरला) पटकन समजतीलच, असे नाही. योग्य त्या किमतीत योग्य ते काम व आवश्यक ती सुशोभितता मिळाल्यास, अशा कामालाच प्राधान्य देण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. त्यामुळे येत्या काळात डिझायनर-बिल्डर ही संकल्पना लोकप्रिय ठरेल, अशी आशा करायला हरकत नाही.
ज्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांनी नव्या प्रकल्पाच्या लिफलेट्सचे डिझाइन करून अथवा स्थानिक वर्तमानपत्रे किंवा मासिकासाठी जाहिरात तयार करून आपल्या कामाचा श्रीगणेशा करावा.
लॅण्डस्केप आर्टिस्ट
या पर्यायाविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, कलेच्या आवडीबरोबर उत्तम मोबदला मिळणारा असा पर्याय. तसे पाहिले तर आर्टिस्ट म्हटले की, मनात अनेक भावनांची सरमिसळ होते. पण ज्यांना आपल्या कलेचा उपयोग नेमका कसा व कुठे करायचा, हे माहीत असते, ती आर्टिस्ट मंडळी नेहमीच यशस्वी होतात. अर्थात लॅण्डस्केप क्षेत्रात उपलब्ध असलेले विविध पर्याय लक्षात घेऊन अनेक आर्टिस्ट मंडळी या क्षेत्राकडे वळताना दिसतात. जसे चित्रकारला कॅनव्हासचा वापर कसा करावा, कोणते रंग त्यावर अधिक खुलून दिसतील हे माहीत असते, त्याचप्रमाणे लॅण्डस्केप आर्टिस्टला प्रकल्पामध्ये कराव्या लागणाऱ्या गोष्टींची उंची किती असावी, उताराची जागा प्रमाणबद्ध कशी असावी यांसारख्या अनेक मूलभूत गोष्टींचे नेमके ज्ञान असावे लागते. उपलब्ध असलेल्या जागेला कलात्मकता देणे हे लॅण्डस्केप आर्टिस्टचे काम असते. तेव्हा स्वत:च्या शैलीतील एखाद्या कलात्मक उत्पादनाची प्रतिकृती तयार करून त्याचे आर्ट गॅलरी अथवा इतर प्रकारच्या प्रदर्शनांमध्ये सादरीकरण करून तुम्हांला स्वत:च्या कामाची जाहिरात करता येणे शक्य आहे. त्यातूनच तुम्हाला विविध कामे मिळू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा