आपल्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं काम अचूक व्हावं, अशी पालकांची, शिक्षकांची अपेक्षा असणं चूक नाही. पण एखाद्याला जमत नाही, हे दिसत असेल तर ओरडून, रागावून काही साध्य होत नाही. शिकवणारा त्यातून त्याला आलेलं फ्रस्ट्रेशनच केवळ व्यक्त करत असतो. मात्र त्याचा अतिरेक झाला, तर मुलांना सगळं नकोसं होऊन जातं. बऱ्याचदा यामुळे मुलाला अपमान झाल्यासारखं वाटतं. यातून काही साध्य होत नाही. म्हणून ‘चुकलं तरी चालेल’, हे शिकवणाऱ्याच्या देहबोलीतून व्यक्त होणं आवश्यक असतं..
मुलांच्या अभ्यासाशी संबंधित समस्यांवर आम्ही काम करायला लागून आता दशक उलटलं आहे. सुरुवातीला आठवीपासून पुढच्या मुलांच्या अभ्यासाशी निगडित असे प्रश्न आमच्याकडे जास्त असायचे. यात बऱ्याच वेळेला मुलांच्या संकल्पना मुळातून स्पष्ट नाहीत, असं लक्षात यायचं. अशा वेळी ही मुलं आधीच्या इयत्तांपासून भेटली असती तर बरं झालं असतं, असं मनात येऊन जायचं. गेली काही वर्ष मात्र एक मोठा बदल जाणवतो आहे. अगदी पहिली-दुसरीपासूनच्या अभ्यासातल्या अडचणी घेऊन आमच्याकडे येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसते आहे. एका परीने ही चांगली गोष्ट आहे. जितकं लवकर अडचणींवर काम सुरू होतं, तितकं ते सुलभ होतं. मुलाला त्याच्या गतीनं काम करता येतं, म्हणून ते जास्त रिलॅक्स्ड् असतं. त्यामुळे बहुतेक वेळा रिझल्ट्सही छान मिळत जातात. एकंदर आईबाबा, मुलं आणि आम्ही – सगळेच आनंदात असतो.
पण गेली काही र्वष अनेक आईबाबांकडून एक कॉमन तक्रार ऐकू येते आहे- ‘मुलं आपणहून काही करत नाहीत, सारखं त्यांच्या मागे लागावं लागतं. या मुलांना जबाबदारीची जाणीवच नाही,’ असं आजवर अनेकांकडून ऐकायला मिळालं आहे. ‘प्रॉजेक्टचं काम असेल किंवा एखादं अवघड गणित असेल, तर माझं मूल प्रयत्नच करताना दिसत नाही. आपल्या वेळी कोण होतं आपल्याला सांगणारं. अमुक प्रकारे कर गोष्टी किंवा तमुक करून पाहा. आपणच आपल्याला सुचेल, जमेल तसं काहीतरी करत होतो ना!’
आपल्या आजूबाजूचं चित्र आहे खरं असं- आईबाबांच्या पिढीला खटकेल असं. पण असं का होत असावं ?
शाळेतल्या शिक्षणाला गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड महत्त्व आलं आहे. बऱ्याचशा घरांमध्ये एखाद्-दोनच मुलं असतात. स्पर्धा प्रचंड वाढली आहे आणि या स्पध्रेत आपलं मूल कमी पडू नये, हरवून जाऊ नये, असं पालकांना मनापासून वाटतं आहे. त्यासाठी ही पिढी मुलांना आवश्यक त्या सगळ्या सोयी-सुविधा पुरवायला तयार आहे, स्वत: मदत करायला तयार आहे, गरज पडली तर लागेल ते कष्ट उपसायलाही तयार आहे. थोडक्यात, ही पालकांची पिढी मुलांच्या शैक्षणिक यशात खूप रस घेते आहे. काही वेळा इतका, की मुलांना ती पूर्णपणे आईबाबांचीच जबाबदारी वाटते. मुलांना ती स्वतची जबाबदारी कशी वाटेल याबाबतचे काही पलू आपण ‘अ अभ्यासाचा’ मध्ये ‘माझा अभ्यास’ या लेखात पाहिले आहेत. आज आणखी काही पलू पाहूया.
आयुष आठवीत असताना दिवाळीच्या सुट्टीत भेटला. आम्ही एकमेकांची चौकशी केली, सुट्टीत काय चाललं आहे, विचारलं. मग विषय सुट्टीतल्या अभ्यासावर आला. आयुषला सुट्टीत सायन्सचं एक मॉडेल बनवायचं होतं.
‘काय बनवणार आहेस?’, मी विचारलं.
‘माहीत नाही. आई शोधणार आहे.’
‘तू काही शोधलं आहेस का?’
आयुषने नकारार्थी मान हलवली. मग नंतर त्याच्या आईशी बोलणं झालं.
‘शाळेत स्पर्धा असते सुट्टीतल्या प्रॉजेक्ट्सची. छान व्हायला पाहिजे ना प्रॉजेक्ट, म्हणून मग मीच घेते सगळं हातात. आणि बाकीच्या मुलांच्याही आईच करतात सगळं. त्यात मग याला करायला दिलं तर प्रॉजेक्टला ते फिनििशग येत नाही,’ आईकडे बिनतोड उत्तर तयार होतं. नंतर अनेक आईंकडून असाच अनुभव ऐकायला मिळाला. मुलांनी करून काही बिघडलं तर ते सुधारण्यात दुप्पट वेळ जातो. एवढा वेळ असतो कुठे आपल्याकडे?
वैष्णवीला गणित थोडं अवघड जातं. शाळेचा होमवर्क करताना खूप वेळ मोडतो, म्हणून ती सरळ समोर गाइड ठेवूनच पुस्तकातले प्रश्नसंच सोडवते. काम पटापट होऊन जातं. पण यातून तिला आवश्यक ती प्रॅक्टिस मिळतच नाही, त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर गणिताचा अभ्यास हे अवघड प्रकरण होऊन बसतं.
गणित अवघड जात असेल तर एखाद्या उदाहरणासाठी गाइडचा वापर करणं चुकीचं नाही. पण प्रत्येक उदाहरण कॉपी केल्याने फक्त वह्य़ा भरतात. एखादं उदाहरण गाइडमध्ये पाहून साधारण सारखी असणारी उदाहरणं तिची तिने सोडवायचा प्रयत्न केला तर ?
‘नाही हो, त्या सगळ्यात फार वेळ जातो, शिवाय तिच्या शाळेत वहीत खाडाखोड केलेली नाही चालत ना! मग एकदा रफ करा, नंतर फेअर, असं सगळं फार होतं मग!’ आईने सांगितलं होतं.
या सगळ्यातून एक गोष्ट ठसठशीतपणे समोर येते, ती म्हणजे- ‘इथे अध्र्याकच्च्या कामाला वाव नाही, केलेलं काम बिनचूक हवं, छानच दिसायला हवं. आणि ते तसं हवं असेल तर ते अगदी अचूक काम करणाऱ्या मुलांनी किंवा मोठय़ांनी करायला हवं. सर्वसाधारण मुलांना त्यात वाव देऊन उपयोग नाही!’
या सगळ्यातून मुलांपर्यंत नेमका काय संदेश जातो आहे? ‘चूक होऊन चालणारच नाही!’
अनेकदा मुलं प्रयत्नच करत नाहीत, याचं कारण ‘चुकलं तर काय?’, याची वाटणारी दहशत. माझा एक नेहमीचा अनुभव आहे – गणित न जमणारी मुलं अनेकदा उदाहरण अवघड असेल या कल्पनेने ते सोडूनच देतात. गुणाकार, भागाकारांची शाब्दिक उदाहरणे (वर्ड प्रॉब्लेम्स), दशांश चिन्हं (डेसिमल पॉइण्ट्स), वर्गमूळ (स्क्वेअर रूट) यांच्या बाबतीत हे खास करून होत असतं.
गणित न जमणाऱ्या अनेकांसाठी गणिताचा पेपर मिळणं, हे दु:स्वप्न असतं. कमी मार्क्स मिळण्याचा एक शिक्का बसलेला असतो, उदाहरणं चुकल्याबद्दल अनेकदा ओरडा खाल्लेला असतो, क्वचित कधीतरी चारचौघांसमोर अपमान झालेला असतो. एकंदरच गणिताचा अभ्यास करताना मूल रिलॅक्स्ड नसतंच. त्यामुळे ताणाखाली येऊन बऱ्याचदा आकडेमोडीत, चिन्हांमध्ये चुका होतात. या चुका ‘सिली मिस्टेक्स’ नावाने आज सगळीकडे प्रसिद्ध आहेत. बऱ्याचदा सिली मिस्टेक्सचा इतका बाऊ होतो की, तिथवरचं उदाहरण मुलाने बरोबर सोडवलं आहे, ही गोष्ट मागेच पडते. अनेकदा मुलाला संकल्पना कळलेली असते, पण शेवटाला कुठेतरी आकडेमोड चुकलेली असते. पण तरीही तुला पूर्ण मार्क्स मिळाले नाहीत, म्हणून गणित जमलेलं नाही, हे बोललं जातं. या सगळ्यामुळे ‘नकोच ते गणित,’ अशी भावना झालेली असते. दुसऱ्या एखाद्याच्या बाबतीत न जमणारा विषय दुसरा कोणतातरी असू शकतो.
अमोल माझा जुना विद्यार्थी मित्र. मूडमध्ये असताना एकदा म्हणाला, ‘‘आमचे सर सारखं सांगत असतात, ‘चुकलं तरी चालेल, पण तुम्ही प्रयत्न करायला हवा.’ आणि खरंच जर काही चुकलं तर मात्र म्हणतात, ‘अजून आठवीत येऊनही अशा कशा रे चुका होतात ?’ मग मस्तपकी ओरडतातच.’’
आपल्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं काम अचूक व्हावं, अशी पालकांची, शिक्षकांची अपेक्षा असणं चूक नाही. पण एखाद्याला जमत नाही, हे दिसत असेल, तर ओरडून, रागावून काही साध्य होत नाही. शिकवणारा त्यातून त्याला आलेलं फ्रस्ट्रेशनच केवळ व्यक्त करत असतो. तेही काही एका प्रमाणात ठीक आहे. पण त्याचा अतिरेक झाला, तर मुलांना सगळं नकोसं होऊन जातं. बऱ्याचदा अपमान झाल्यासारखं वाटतं. यातून काही साध्य होत नाही. म्हणून ‘चुकलं तरी चालेल’, हे शिकवणाऱ्याच्या देहबोलीतून (बॉडी लँग्वेज) व्यक्त होणं आवश्यक असतं.
यासंदर्भात सायली आणि तिच्या आईचा किस्सा पाहण्यासारखा आहे. सायली नववीपर्यंत एका क्लासला जायची. तिथे तिला काही फारसं आवडत नव्हतं. दहावीसाठी क्लास बदलायचं ठरलं. पण कोणत्या क्लासला जावं, याबाबत आई-मुलीचं काही एकमत होत नव्हतं. शेवटी आईनं सांगितलं, ‘तुझं तू ठरव. निर्णय तुला घ्यायचा आहे’. दोन दिवसांनी सायलीने सांगितलं, ‘आई, तू म्हणतेस त्या क्लासला जाऊया.’
सायलीची आई म्हणाली, ‘पाहा, शेवटी एवढे वाद घालून मी सांगत होते तोच क्लास निवडला ना?’
काय झालं असावं? दहावीत कमी मार्क्स मिळाले तर आईकडून कायमच ऐकून घ्यावं लागेल, ही भीती सायलीच्या मनात असणार. म्हणून मग ती सांगेल तिथे तिने चुपचाप अॅडमिशन घेतली असणार. इथे आई तोंडाने म्हणते तर आहे – ‘तू ठरव’. पण तिची देहबोली कदाचित काही वेगळं सांगते आहे. दहावीतले सायलीचे मार्क्स ती केवळ कोणत्या क्लासला जाते यावर ठरणार नाहीत, हे मनोमन दोघींनाही माहीत आहे, पण आता आईला कोणतेही चान्सेस घ्यायचे नाहीत.
आज पालकांकडे वेळ कमी आहे. सगळीकडे स्पध्रेचं वातावरण आहे. मुलांपासून शिक्षक-पालकांपर्यंत सगळ्यांवर त्याचा ताण जाणवतो आहे. मूल चुकलं तर त्याचं पुढे कसं होईल, याची पालकांना खूप काळजी लागून राहिलेली आहे, म्हणूनच असेल. पण त्यामुळे मुलांना काहीतरी थोडंसं वेगळं करून पाहणं, थोडासा धोका पत्करणं याला वावच राहिलेला नाही. मुलांपेक्षा २५-३० पावसाळे जास्त पाहिलेले असतात म्हणून असेल, पण पालक बऱ्याचदा समोर असलेल्या परिस्थितीचा अनेक बाजूंनी विचार करतात, त्यातले धोके त्यांना दिसत असतात. पण म्हणून त्यांचं मत मुलांच्या िपडाला मानवेलच, असं नसतं. म्हणून ज्या रस्त्यांवरून परतीचा मार्ग खुला आहे, जिथे होणारे परिणाम फार गंभीर नाहीत, अशा रस्त्यांवर मुलांना जाऊ देणं महत्वाचं. तिथे काही चूक झाली तर ‘मी आहे तुझ्याबरोबर’, हा भाव मुलांपर्यंत पोहोचवणंही तितकंच गरजेचं. म्हणूनच आयुषच्या आईने प्रॉजेक्टसाठी त्याच्या काही कल्पना स्वीकारायला हव्यात- अगदी त्यामुळे एखाद्वर्षी त्याचं बक्षीस गेलं तरी चालेल, आणि वैष्णवीच्या आईने काही प्रश्न तरी तिचे तिने सोडवायचा आग्रह धरायला हवा.
काही वेळा मुलांच्या चुकांवर पांघरूण घातलं जातं, खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडलं जातं. यातून ना मूल काही शिकत, ना पालक. म्हणून हे योग्य नाही. तसंच खूप गंभीर नाहीत, अशा चुका मुलांकडून झाल्या तर त्यांचा बाऊ करूनही उपयोग नाही. त्यातून योग्य तो बोध घेणं, पुढच्या वेळी त्या चुका टाळायचा प्रयत्न करणं, हे जास्त महत्त्वाचं.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, माणूस चुकांमधूनच शिकत जातो, अशा आशयाची सुवचनं अनेक शाळांमधून हमखास पाहायला मिळतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात अपयशाच्या वेळी चुका होतात, तेव्हा मुलांना आवश्यक तो आधार मिळाला आहे, असं मोजक्याच वेळा पाहायला मिळतं. मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी अशी आपली अपेक्षा असेल, तर चुकतमाकत शिकायची मुभा त्यांना मिळायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा