राजकीय नेत्यांची शिक्षणविषयक प्रश्नांवरची पोपटपंची ही दिखाऊगिरीची कळस गाठणारी असते. त्यातही जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’सारखी टाळीबाज वाक्ये मांडून केवळ प्रतिमानिर्मितीचा स्वार्थ साधण्यात आपल्या राजकारण्यांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. याच पाश्र्वभूमीमुळे परवा ब्रिटिश नेते बोरिस जॉन्सन यांचे जगभरातील मुलींच्या निरक्षरतेच्या चिंताजनक स्थितीवरून चिडणे वेगळे ठरले. ब्रिटनमधून राष्ट्रकुल देशांतील शिक्षणासाठी दरवर्षी लाखो रुपयांची बेगमी केली जाते. तरीही आशियातील धर्मप्रेमी राष्ट्रे आणि आफ्रिकेतील मूलतत्त्ववादी विचारसरणीचा परिणाम तेथील मुलींच्या शिक्षणावर होत आहे. आफ्रिका आणि आशिया राष्ट्रांमध्ये मुलींमधील निरक्षरतेचे प्रमाण ६० ते ८० टक्के आहे. ते पाहून व्यथित झालेल्या जॉन्सन यांनी ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय मदतनिधीच्या धोरणामध्ये मुलींच्या शिक्षणाला पहिले प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल नेत्यांच्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींना याबाबतचा आराखडा दिला जाणार असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. मुली शिकल्या तर गरीब राष्ट्रांतील इतर अनेक समस्यांवर मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे त्यांना १२ वर्षे किमान मूलभूत शिक्षण दिले जाणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असेल, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. २००० ते २०१५पर्यंतच मुलींच्या शिक्षणाचे उद्दिष्ट साधले जायला हवे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याच देशातील, राज्यातील शिक्षणनिधीच्या विनियोगाला विविध फाटे फुटत असण्याची प्रकरणे उजेडात येत असताना एका ब्रिटिश मंत्र्यांची गरिबांच्या लेकींपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची ही कळकळ वंदनीयच म्हणावी लागेल.

ब्राझीलची शिक्षणस्थिती

जागतिक बँकेने नुकताच एक धक्कादायक अहवाल दिला. आर्थिक सहकार्य असलेल्या ३४ प्रगत आणि प्रगतिशील राष्ट्रांमधील (ओईसीडी) विद्यार्थ्यांच्याइतके सरासरी वाचन करण्यासाठी ब्राझीलमधील विद्यार्थ्यांना आणखी २६० वर्षे घालवावी लागतील, तर प्रगत राष्ट्रांशी गणितात बरोबरी करण्यासाठी ७५ वर्षे जावी लागतील. हा निकष ब्राझीलच्या सद्य: शिक्षणस्थितीवरून लावण्यात आला. ब्राझीलच नाही तर दक्षिण अमेरिकेत ४० टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण मिळालेले नाही. जागतिक बँकेकडे आलेला हा अहवाल तीन वर्षे जुना असल्याचे तसेच त्या वेळी ब्राझीलमधील अत्यंत गरीब असलेल्या उत्तर भागांतील नगरपालिकेच्या शाळांमधून घेतलेल्या आकडेवारीचा असल्याचा दावा आता तिथल्या शिक्षण आणि अर्थतज्ज्ञांनी केला आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागामध्ये शिक्षणाची ही स्थिती नसून मुलांच्या वाचनाच्या, गणिताच्या आणि इतर विषयांतील प्रगतीचा आलेख कायम चढता असल्याचे आकडेवारी आणि तक्त्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील खरे किती आणि खोटे किती हे ब्राझीलकरांनाच माहीत! तरी दुसरीच्या विद्यार्थ्यांना बेरजा न येणे, पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांना वाचता न येणे या मूलभूत समस्या असणाऱ्या देशाचे नाव फक्त ब्राझीलच असू शकत नाही.

 

Story img Loader