मी मुक्त विद्यापीठामधून बी.ए करत आहे. मला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए करायची इच्छा आहे. त्यासाठी असलेल्या परीक्षेच्या अभ्यासाची माहिती द्यावी. तसेच ही परीक्षा देण्यासाठी माझी मुक्त विद्यापीठातील पदवी वैध ठरेल काय? – ओंकार वानापवाड
- तू ज्या मुक्त विद्यापीठातून बीए करत आहेस, त्या विद्यापीठाला जर विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असेल तर तुझी पदवी नक्कीच ग्राह्य़ धरली जाऊ शकेल. त्यामुळे सर्वात प्रथम तुझ्या विद्यापीठाला अशी मान्यता मिळाली आहे किंवा नाही, याची खात्री करून घे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये प्रवेशासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची व बहुपर्यायी प्रश्न असलेली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता, अंकगणितीय क्षमता, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि माहिती विश्लेषण क्षमता जोखणारे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेतील तीनही विभागांमध्ये स्वतंत्ररीत्या विशिष्ट पर्सेटाइल प्राप्त करणे आवश्यक आहे. हे पर्सेटाईल दरवर्षी वेगवेगळे आयआयएम बदलवत असतात. उदा. यंदा आयआयएम अहमदाबादने तीनही विभागांमध्ये किमान ७० व एकूण ८० पर्सेटाइल कटऑफ गुण अशी अर्हता निर्धारित केली आहे. तर आयआयएम बेंगळूरुने व्हर्बल अॅबिलिटी/ रीडिंग कॉप्रिहेन्शन या सेक्शनमध्ये ८५ पर्सेटाइल व इतर दोन सेक्शनमध्ये किमान ८० टक्के आणि एकूण ९० पर्सेटाइल अशी अर्हता निर्धारित केली आहे. उदा- समजा एखाद्या विद्यार्थ्यांला कॉमन अॅडमिशन टेस्ट(कॅट)मध्ये एकूण ९८ पर्सेटाइल मिळाले, मात्र त्यास एका सेक्शनमध्ये ६९ पर्सेटाइल मिळाले तर तो बेंगळूरु वा अहमदाबाद आयआयएमच्या प्रवेशासाठी पात्र ठरू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांस एकूण ९० पर्सेटाइल मिळाले आणि त्यास तीनही सेक्शनमध्ये ७० पर्सेटाइल वा त्यापेक्षा अधिक मिळाले तरच तो अहमदाबाद आयआयएमच्या पुढील प्रवेश टप्प्यासाठी पात्र ठरतो. आयआयएम बेंगळूरुसाठी त्याला व्हर्बल अॅबिलिटी/ रीडिंग कॉप्रिहेन्शन या सेक्शनमध्ये ८५ पर्सेटाइल व इतर दोन सेक्शनमध्ये किमान ८० वा त्यापेक्षा अधिक पर्सेटाइल मिळायला हवे. तीनही सेक्शनमधील एकूण गुणांचे कटऑफ प्राप्त विद्यार्थ्यांनाच लेखन कौशल्य चाचणी/ मुलाखती या दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावले जाते. अंतिम निवड यादी तयार करताना कॅटमधील गुण, दहावी, बारावी, पदवी गुण, पदवीतील शाखा, अनुभव, इतर कौशल्य, स्त्री/पुरुष संवर्ग अशा बाबींवरही काही गुण ठेवलेले असतात. याचाच अर्थ असा की, केवळ कॅटच्या गुणांवर आधारित हा प्रवेश नाही. सर्वच बाबतीत विद्यार्थी चौफेर व्यक्तिमत्त्वाचा असला पाहिजे. त्यादृष्टीने निवड प्रकिया राबवली जाते.
मी पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग करीत आहे. सध्या मी शेवटच्या वर्षांला आहे. मला वकिली (कायद्याचा अभ्यास) करण्याची आणि पत्रकार होण्याची इच्छा आहे. या दोन्ही क्षेत्रांसाठी मला किती आणि कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? – शोभा – नानासाहेब वगरे
- तुमच्यासाठी पत्रकारिता आणि वकिली या दोन्ही क्षेत्रांत विपुल संधी उपलब्ध होऊ शकतात. तथापि त्यासाठी तुम्हाला या दोन्ही क्षेत्रांतील शिक्षण/ प्रशिक्षण घ्यावे लागेल. अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे घालवल्यावर आणखी काही वर्षे त्यासाठी व्यतीत करणे योग्य ठरेल असे वाटत नाही. मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांना पुण्यात चांगल्या संधी मिळू शकतात.
- या संधीचा स्वीकार करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. या करिअरमध्ये स्थिरावल्यावर तुम्ही दूरशिक्षण पद्धतीचे पत्रकारितेचे काही लघु मुदतीचे अभ्यासक्रम करावेत. पत्रकारितेसाठी भाषेवर (इंग्रजी/मराठी) प्रभुत्व असणे गरजेचे आहे. वकिली करण्यासाठी एलएलबी करावे लागेल. त्यासाठी चाळणी परीक्षा द्यावी लागेल.
मी सध्या बीएच्या पहिल्या वर्षांला आहे. याचसोबत मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातूनही बीए करीत आहे. मी सध्या दुसऱ्या वर्षांचा अभ्यास करीत आहे. यापैकी कोणती पदवी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल? भविष्यात या दोन्ही पदव्यांच्या जोरावर कुठे प्रवेश मिळेल? – हृषीकेश चौधरी
- दोन्ही पदव्या समान दर्जाच्या आहेत. या पदव्या घेतल्यावर तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देता येतील. त्याचसोबत पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही प्रवेश मिळू शकतो.