ए मबीए अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना त्या विषयांचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल तसेच हा व्यवहारातील उपयोग कसा समजून घेता येईल, याचा विचार आपण सध्या करीत आहोत. या विषयांपैकी काही विषय मागील लेखामध्ये समाविष्ट केले होते. उर्वरित विषयांचा विचार या लेखात करूयात.
एमबीए अभ्यासक्रमामधील अनिवार्य विषयांमध्ये समावेश असणारा एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. काही विद्यापीठांमध्ये या विषयाचे नाव बिझनेस पॉलिसी अॅण्ड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असे आहे. मात्र, अभ्यासक्रम थोडय़ाफार फरकाने जवळपास सारखाच आहे. कोणत्याही व्यावसायिक कंपनीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जी व्यूहात्मक आखणी करावी लागते. त्यासंबंधीचे विवेचन वेगवेगळ्या संकल्पना, त्यांचे महत्त्व आदी गोष्टी या विषयात नमूद केलेल्या असतात. या विषयाचा अभ्यास करताना सैद्धान्तिक संकल्पना समजून घेतल्याच पाहिजेत, पण त्याशिवाय
केस स्टडी म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि त्यांची केलेली अंमलबजावणी याकडेही लक्ष दिले पाहिजे. यासाठी कंपन्यांचे वार्षिक अहवाल (अॅन्युअल रिपोर्ट्स) पाहता येतात. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे वार्षिक अहवाल त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असतात. या अहवालांमध्ये त्यांनी स्वीकारलेल्या स्ट्रॅटेजीविषयी माहिती दिलेली असते. अर्थात यामधील गोपनीय भाग कंपन्या उघड करीत नाहीत, पण जो काही भाग अहवालामध्ये दिलेला आहे त्यावरून कंपन्या स्वीकारीत असलेल्या स्ट्रॅटेजीविषयी कल्पना निश्चितपणे येऊ शकते. ज्या कंपन्यांचे किंवा व्यावसायिक संस्थांचे अहवाल वेबसाइटवर उपलब्ध नसतात, त्या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता येतो. अशी माहिती गोळा करताना केवळ मोठय़ा कंपन्यांचीच माहिती घेतली पाहिजे असे नाही, तर लहान व्यावसायिक संस्था, लघुउद्योग आणि अगदी घराजवळील किराणा मालाचे किंवा जनरल स्टोअरसुद्धा घेता येईल. एखाद्या किराणा दुकानाचा मालक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरतो हे पाहता येईल. त्याचप्रमाणे एखाद्या मॉलची स्ट्रॅटेजीसुद्धा समजावून घेता येईल. नकळतच आपण या ठिकाणी तुलनात्मक विचार करायला शिकतो. ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी फार काही करावे लागते असेही नाही. फक्त आपल्या भेटीचा उद्देश व गोळा करायची माहिती यासंबंधी नियोजन केले तर अशी उपयुक्त माहिती मिळू शकते. हे एक प्रकारचे वर्गाबाहेरील शिक्षणच आहे असे म्हणता येईल. कंपन्यांच्या किंवा इतर व्यावसायिक संस्थांच्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास, स्ट्रॅटेजी कशा ठरवल्या जातात, यामध्ये बदल करायचा असल्यास तो कसा केला जातो, स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येतात आणि त्या कशा पद्धतीने दूर केल्या जातात या गोष्टी समजावून घेण्याची गरज असते. यामुळे वर्गात शिकत असलेली थिअरी प्रत्यक्षात कशी वापरली जाते याचा अंदाज येईल. हे सर्व करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, नुसत्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर चांगले व्यवस्थापक होता येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा