समस्या कोणाला नसतात? आयुष्यात कधी ना कधी तरी सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण, आलेल्या समस्यांवर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून तोडगा काढणारे फारच थोडे लोक आढळतात. गौहाटीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या मोरीगांव जिल्ह्य़ातल्या मोरीही या गावात राहणारे कनक दास हे या थोडय़ा लोकांपकी एक. तसे कनक दास हे चारचौघांसारखे.. क्रिकेटची आवड असणारे.. छंद म्हणून तबला वाजवणारे आणि गाण्याची आवड असलेले. दुर्दैव असे की, त्यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कनकला मग त्याच्या आईने वाढवले, पण घराच्या गरिबीमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून रोजीरोटीसाठी काम शोधत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. कित्येक दिवस त्यांना अर्धपोटी राहून काढावे लागले. त्यातच वयाच्या पंचविशीमध्ये त्यांचे मातृछत्रही हरपलं. मुळात कनक हळव्या स्वभावाचा आणि त्यात हा आघात.
कनकला यंत्रांमध्ये आणि त्या यंत्राच्या तंत्रज्ञानामध्ये खूप रस होता. विशेष म्हणजे, यंत्रांविषयीची त्याची ही अंगभूत आवड आणि पॅशन परिस्थितीच्या आड कधीच आली नाही.
कनक दास सांगतात, ‘डिस्कव्हरी चॅनलवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघून माझी तंत्रज्ञानाची आवड जोपासली गेली आणि या कार्यक्रमातून मला काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली.’ हे ‘काहीतरी वेगळे’ म्हणजे काय, तर आपले दैनंदिन आयुष्य जगताना ज्या काही लहान-मोठय़ा समस्या येतील त्या सोडविण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करायचे. उदाहरणच द्यायचे तर सायकलचे देता येईल. खेडेगावात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्वस्त साधन म्हणजे सायकल. आसाममधल्या खेडय़ांतून आजही मोठय़ा प्रमाणावर सायकलींचा वापर केला जातो. कनक दास यांच्याकडेसुद्धा सायकल होती..पण ती जुन्या पद्धतीची.. जड. जुनी झाल्यामुळे खेडय़ातल्या कच्च्या रस्त्यांवर ही अवजड सायकल चालवताना खूप त्रास व्हायचा. मग त्यांनी नवीन सायकल विकत घेतली. पण तरीसुद्धा या नवीन सायकलच्या शॉक अॅब्सॉर्बरवर कनक दास समाधानी नव्हते. खड्डे असलेल्या कच्च्या रस्त्यांवरून सायकल चालवताना शरीरातली हाडं पार खिळखिळी व्हायची. मग यावर उपाय काय? कनक दास यांच्यातला यांत्रिकी मग प्रयोगाला लागला. खड्डय़ातून जाताना बसणारा धक्का शॉक अॅब्सॉर्बरमुळे शोषून घेतला जात असला तरी ती ऊर्जा आपल्याला वापरायला मिळत नाही. म्हणजेच ती वाया जाते. ही वाया जाणारी ऊर्जा वापरून आपल्याला आपला सायकल प्रवास सुखकर करता येईल का? त्या दृष्टीने त्यांचे प्रयोग सुरू झाले.
वाया जाणाऱ्या ऊर्जेचा वापर सायकलचा वेग वाढविण्यासाठी आणि सायकलला बसणारे धक्के कमी करण्यासाठी कनक दास यांनी सायकलच्या पायडलच्या चक्राला सहा िस्प्रग जोडल्या. िस्प्रग आणि सायकलची सीट यांना एका तरफेने जोडले. त्यामुळे या िस्प्रगमुळे खड्डय़ातून जाताना बसणारा धक्का आणि वाहकाचे वजन यामुळे निर्माण होणारे बल सायकलला पुढच्या दिशेने गती देण्यासाठी वापरले जायचे. पण तरीही एक समस्या आली. ती म्हणजे, या िस्प्रगमुळे सायकल पायडल मारून रिव्हर्स घेता येत नव्हती. मग कनक दास यांनी पायडलच्या चक्राला आणखी एक लहान चक्र जोडून त्याला सुधारणा करून दुसरे मॉडेल तयार झालं. आता या सायकलला खड्डय़ातून जाताना बसणाऱ्या प्रत्येक धक्क्याचे रूपांतर तिचा वेग वाढण्यात होत होता आणि सायकलवर बसल्यावर हा धक्का फारसा जाणवत नव्हता.
गुजरातच्या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन या संस्थेमार्फत कनक दास यांनी आपली सायकल गौहाटी आय.आय.टी.मध्ये चाचणीकरता पाठवली. आय.आय.टी.तल्या तज्ज्ञांनी या सायकलच्या ऊर्जा रुपांतरित करण्याच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या आणि कनक दास यांनी केलेल्या संशोधनाला यश आल्याचा अहवाल दिला. नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनने राष्ट्रीय पुरस्कार देऊन कनक दास यांचा गौरव केला आणि त्यांच्या या संशोधनाचे स्वामित्व (पेटंट) मिळवून देण्याच्या दृष्टीने मोलाची मदत केली.
कनक दास यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची आणि प्रेरणादायी घटना होती. त्यांनी अधिक जोमाने आणखी एका समस्येवर संशोधन करायला सुरुवात केली. ही समस्या आसामातल्या सायकल रिक्षांची होती. आसाममध्ये यांत्रिक पद्धतीच्या सायकल रिक्षा वापरल्या जातात. सायकल रिक्षा पायडल मारून चालवल्या जातात. कमीत कमी श्रम वापरून वेगात या सायकल रिक्षा चालवता याव्यात म्हणून कनक दास यांनी एक विशेष गीअर प्रणाली विकसित केली आहे. नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या मदतीने त्यांना याही संशोधनाचे स्वामित्व मिळाले आहे. विशेष म्हणजे आपण विकसित केलेली गीअर प्रणाली बसवलेल्या सायकल रिक्षा तयार करून कनक दास स्वत: विकतात. १२ हजार रुपयांना उपलब्ध असलेली ही सायकल रिक्षा आज आसामात अनेक ठिकाणी वापरली जात आहे.
ज्याप्रमाणे आपली सायकल रिक्षा लोक वापरत आहेत, त्याचप्रमाणे खड्डय़ातून कोणताही त्रास न जाणवू देता वेगाने जाणारी सायकलसुद्धा लोकांपर्यंत पोहोचावी अशी कनक दास यांची इच्छा आहे. त्यासाठी कोणत्या तरी सायकल उत्पादक कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे. पण गौहाटी आय.आय.टी.ने प्रमाणित केलेल्या या सायकलचे उत्पादन करण्यासाठी कंपन्या पुढे येत नाहीत, ही कनक दास यांची खंत आहे.
पण तरीही त्यांचे संशोधन थांबलेलं नाही. आजही कनक दास आपल्या लहानशा घरात एकटे राहतात आणि त्यांच्या सोबतीला असतात वेगवेगळ्या यंत्रांचे सुटे भाग आणि अवजारे. वयाची चाळिशीही पार न केलेल्या या ‘तरुण’ संशोधकाला आणखीही अनेक समस्या सोडवायच्या आहेत. समस्या आल्यावर न डगमगता त्या आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या या तुमच्या-आमच्यातल्या संशोधकाला सलाम!
समस्यांवर मात करणारा यांत्रिकी
समस्या कोणाला नसतात? आयुष्यात कधी ना कधी तरी सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण, आलेल्या समस्यांवर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून तोडगा काढणारे फारच थोडे लोक आढळतात.

First published on: 01-07-2013 at 08:09 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mechanical who overcame on the problems