करोना विषाणूचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. विषाणूच्या नवनवीन लाटांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असून देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पण शैक्षणिक संस्था सुरू होताच विविध परीक्षांच्या तारखा एकाच वेळी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतं आहे. अशात महाराष्ट्राकडून आयोजित करण्यात येणारी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट अर्थातच एमएचटी – सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी आल्याने महाराष्ट्राकडून घेण्यात येणारी एमएचटी- सीईटी परीक्षा लांबवणीवर पडली आहे. याबाबतचं ट्विट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. संबंधित परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, याबाबतचे संकेत देखील मंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिले आहे. परीक्षाबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
खरंतर, एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान होणार होती. पण जेईई मेन २०२२ ही परीक्षा देखील जूनमध्येच सुरू होणार आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून एनईईटी ही परीक्षा होणार आहे. या दोन परीक्षामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे. एनईईटी परीक्षा पार पडल्यानंतर एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबतच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. पण लवकरच तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.