केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा ‘आधुनिक जगाचा इतिहास’ या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.
अठराव्या शतकातील घटनांची पाश्र्वभूमी ठरलेले प्रबोधन, अमेरिकन राज्यक्रांती (१७७६), फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), नेपोलियनचा उदय व अस्त, औद्योगिक क्रांती या घटकांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या घटनांमागील कार्यकारणभाव, महत्त्वाचे विचारप्रवाह व या घटनांचा परिणाम नि परस्परसंबंध या अंगांचे आकलन आवश्यक आहे. ‘व्यापारवादाने प्रेरित’ अमेरिकन राज्यक्रांतीवरील प्रश्न या विवेचनाला अधोरेखित करतो. फ्रेंच राज्यक्रांतीला अमेरिकन राज्यक्रांतीची पाश्र्वभूमी, तत्त्वज्ञांचे योगदान, राज्यक्रांतीद्वारे उद्घोषित मूल्ये, तिचे यशापयश व जागतिक प्रवाहावरील परिणाम यांचे आकलन आवश्यक ठरते.
औद्योगिक क्रांती, तिचे मानवी जीवनावरील राजकीय, सामाजिक, आíथक परिणाम, वसाहतवाद, जपानचे औद्योगिकीकरण व आशियाई सत्ता म्हणून उदय, युरोपिअन राष्ट्रांमध्ये वसाहतीसाठी तीव्र स्पर्धा ही १९ व्या शतकाची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. वसाहतींसाठीच्या स्पध्रेतून तसेच अनेक प्रादेशिक कारणांतून युरोपिअन राष्ट्रांमध्ये आघाडय़ांचे/ युतीचे राजकारण, गुप्त करार, यातून निर्मित परस्पर विश्वासार्हतेचा अभाव यामुळे युरोपमध्ये राजकीय अस्थर्याचे वातावरण तयार झाले. वसाहतींसाठीची स्पर्धा, राजकीय अस्थर्य व राजनयाचे अपयश यांची परिणती पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये (१९१४-१९१८) झाली. या महायुद्धातील संहारामुळे अशी युद्धे भविष्यात टाळण्याची व शांतता टिकवून ठेवण्याची भाषा बोलली गेली. ‘लीग ऑफ नेशन्स’ची निर्मिती व त्याद्वारे शांतता टिकविण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु, राष्ट्रीय हितसंबंधांवर कोणत्याही राष्ट्राने तडजोड केली नाही. व्हर्सायच्या करारातून जर्मनीवर अपमानास्पद व जाचक अटी लादल्या गेल्या. १९२९च्या आíथक महामंदीमुळे जर्मनीची परिस्थिती बिकट झाली. जर्मनीचा राष्ट्रवाद व नव्या आशा-आकाक्षांचे स्वप्न यावर आधारित हिटलर व नाझीवादाचा उदय झाला व दुसऱ्या जागतिक महायुद्धाची बीजे पेरली गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा