परीक्षेच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ या घटकाची तयारी कशी करता येईल, याचे मार्गदर्शन-
प्रश्नपत्रिकेचे अलीकडचे स्वरूप बघता बरेचसे प्रश्न हे राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडींविषयी विचारले जातात, हे स्पष्ट होते. हे तीनही विषय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात चालू घडामोडींवर आधारित कमी प्रश्न विचारले जातात, असे वाटले तरी पूर्वपरीक्षेतील प्रत्येक घटक विषयाला जोडून चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात. या महिन्यात विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली. परीक्षेनंतर बहुतांश उमेदवारांची प्रतिक्रिया होती की, प्रश्नपत्रिका बरीच अवघड होती. ‘आपण वाचलेल्या पुस्तकांतील प्रश्नच येत नाहीत, चालू घडामोडींचा नेमका स्रोत कळत नाही,’ असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. केवळ मोजक्या परीक्षार्थीची प्रतिक्रिया होती- ‘प्रश्नपत्रिका आव्हानात्मक होती आणि परीक्षा यूपीएससी पॅटर्ननुसार होती, केलेला अभ्यास कामी आला, पेपर चांगला गेला.’ या दोन टोकाच्या प्रतिक्रियांतून उमेदवारांची नेमकी मानसिकता, अभ्यासाचा दृष्टिकोन व अभ्यास करण्याच्या पद्धतीतील नेमका फरक दिसून येतो.
उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाची, घडामोडींची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाईड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीस्रोत म्हणून एकाच संदर्भपुस्तकाचा उपयोग करून अभ्यास संपवा, असेही उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, याची मर्यादा लक्षात येईल. अशा तऱ्हेने अभ्यास केल्यास आपण स्पध्रेत टिकणे कठीण बनते.
या विषयांची संदर्भपुस्तके म्हणून इंडिया ईअर बुक, योजना, लोकराज्य या उत्तम पर्यायांची निवड करायला हवी.      
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की, चालू घडामोडी घटकात तीन प्रकारांचे प्रश्न विचारले जातात.
* स्वतंत्र चालू घडामोडी
* सामान्य अध्ययन : इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण अशा  घटकांशी संबंधित चालू घडामोडी.
* सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती.
अभ्यासासाठी अशी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरता प्रश्नपत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, वृत्तपत्र वाचन सोपे होते. दैनिक, मासिकात नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक परीक्षार्थीनी जाणून घेणे आवश्यक आहे.
सामान्य अध्ययन विषयाच्या अभ्यासक्रमातील ‘चालू घडामोडी’ हा घटक केवळ काही मार्कासाठी विचारला जात नसून तो एमपीएससी परीक्षेचाच मूलभूत घटक आहे. चालू घडामोडींच्या अभ्यासाची व्याप्ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर विस्तारलेली आहे. चालू घडामोडी हा नुसता एक घटक विषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला घटक विषय आहे. चालू घडामोडींचा आधार राज्यव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत, इतिहासापासून सामान्य विज्ञानापर्यंत सर्वच विषयांत ठेवून उमेदवाराचे समकालीन आकलन जोखण्याचा प्रयत्न आयोगामार्फत केला जातो. म्हणूनच चालू घडामोडी हा अभ्यासाचा केवळ एक भाग न मानता तो अभ्यासाचा पाया बनायला हवा. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीला एखादी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोड असते हे समजून घ्या. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक ‘अनिवार्य’ प्रश्नपत्रिकेइतका महत्त्वाचा विषय आहे.
या विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम प्रत्येक घटकांशी संबंधित पायाभूत पुस्तकांचे वाचन करा आणि मग त्यातून पक्क्या केलेल्या संकल्पनाशी- भोवताली घडणाऱ्या घटनांचा ‘संबंध’ शोधण्याचा दृष्टिकोन विकसित करा.
जागतिकीकरणाच्या रेटय़ात रोज नव्या घटना घडत आहेत. या जागतिक उलथापालथींचा प्रभाव कधी अल्पकालीन तर कधी दीर्घकालीन असतो. यापकी अनेक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आíथक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब ‘सामान्य अध्ययन’ प्रश्नपत्रिकेत उमटणे स्वाभाविक आहे.
हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे.
चालू घडामोडींच्या नोट्स सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील- केंद्र व राज्य सरकारच्या योजना, कार्यक्रमाशी संबंधित घडामोडी, राष्ट्रीय संस्थाविषयक घडामोडी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची घटना, ज्या घटनेचा प्रभाव देशावर पडू शकतो, पर्यावरण व भौगोलिक घटना संदर्भ, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेसंबंधी घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञानविषयीच्या घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था- संस्थाप्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या, आयोग व त्यांचे अहवाल, नव्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाची आíथक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटना दुरुस्ती, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इत्यादी.
अर्थात ते वर्गीकरण काहीसे लवचीक स्वरूपाचेच असावे. या वर्गीकरणानंतर प्रत्येक विभागात पुन्हा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी करावी. थोडक्यात, प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर आधारित ‘वर्गीकरण तक्ते’ बनवावेत आणि त्या विभागात संबंधित घटना नमूद करावी.
चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि त्यानुसार नोट्स काढाव्यात. म्हणजे एखादी महत्त्वाची परिषद झाली असल्यास तिचे ठिकाण, देश, त्या परिषदेतील मुद्दे व फलित; त्याच मुद्दय़ावर पार पडलेल्या मागील परिषदा, त्यांचे ठिकाण याचीही माहिती जमा करावी किंवा विविध स्पर्धाची तयारी करताना खेळाडू, क्रीडा प्रकार, स्पर्धाचा निकाल, त्यातील विक्रम; विजेता-उपविजेता याबरोबरच त्यांचे देशही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या चालू घडामोडींची
तयारी करताना तिच्या आजूबाजूला शक्य त्या त्या पलूंची, घटनांची
तयारी करावी.
चालू घडामोडी म्हणजे तारखा, स्थळे, नावे असा मर्यादित अर्थ नाही, हे  परीक्षार्थीना एव्हाना समजून चुकले असेल. महत्त्वाच्या घडामोडींची पायाभूत, विश्लेषणात्मक माहिती उमेदवाराला असणे अपेक्षित आहे. यासाठी वाचन चाचपडत करू नये, तर ‘स्मार्ट’पणे करावे. बातमीचे किंवा तथ्याचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व लक्षात न घेता शब्द न् शब्द वाचून काढायची  अभ्यास पद्धत वेळखाऊ, अनुत्पादक ठरते. म्हणून नेमके आणि विश्वसनीय संदर्भ साहित्य अभ्यासणे आवश्यक आहे. योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईअर बुक, लोकराज्य, शासनाच्या महत्त्वाच्या वेबसाइट्स, तथ्यात्मक माहितीसाठी आघाडीच्या वर्तमानपत्रातील वृत्तवेध घेणारे लेख, तसेच विश्लेषणात्मक माहितीसाठी ‘करंट ग्राफ 2015’ उपयुक्त ठरेल.  
thesteelframe@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा