दरवर्षी एमपीएससीद्वारे नागरी प्रशासनाचा गट ‘अ’ व गट ‘ब’ या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहाय्यक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एमपीएससी वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट ‘अ’, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.
० एमपीएससीद्वारे भरली जाणारी पदे
उपजिल्हाधिकारी – गट अ, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट अ, उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), मुख्याधिकारी, नगरपालिका/ परिषद, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, तहसीलदार- गट अ, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट ब, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट ब, कक्ष अधिकारी- गट ब, गट विकास अधिकारी- गट ब, मुख्याधिकारी नगरपालिका, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था- गट ब, उपअधीक्षक, भूमी अभिलेख गट ब, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, नायब तहसीलदार- गट ब.
एमपीएससी परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते हे आपल्याला माहिती आहेच. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो. दरवर्षी तीन ते चार लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात. मात्र यांपकी काहींनाच यात यश प्राप्त होते. मग ही परीक्षा अवघड असते का? याचे उत्तर ‘नाही.’ या परीक्षेबद्दल योग्य माहिती करून घेतली व अभ्यासाचे नियोजन करून घेतले तर या परीक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू शकतो.
० वयोमर्यादा – सर्वसामान्य प्रवर्गासाठी वयोमर्यादा- किमान १९ वष्रे व कमाल ३३ वष्रे अशी निश्चित केली आहे. कमाल वयोमर्यादा खालील बाबतीत
शिथिलक्षम आहे-
* राज्य सरकारने मान्यता दिलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षांपर्यंत- म्हणजे कमाल वयोमर्यादा
३८ वष्रे आहे.
* अपंग उमेदवारांच्या बाबतीत १० वष्रे शिथीलक्षम म्हणजे ४५ वर्षांपर्यंत.
* पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत (कमाल ३८ वष्रे)
* माजी सनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत. (३८ वष्रे)
या परीक्षेविषयीचा गरसमज
० या परीक्षेच्या तयारीसाठी १६ ते १८ तास अभ्यासाची गरज असते – परीक्षेची तयारी करताना कोणी किती तास अभ्यास केला, कोणी कसा अभ्यास केला यापेक्षा आपण अभ्यास कसा करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थी हा भिन्न असतो. त्याची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची एखाद्या विषयातील पकड ही वेगवेगळी असते उदा. एखाद्याला गणित अवघड जात असेल तर दुसऱ्याला गणित सोपे जात असेल. एखाद्याला इंग्रजी अवघड जात असेल तर काहींना इंग्रजी सोपा वाटत असेल म्हणून अभ्यास करताना तासांचे नियोजन करण्यापेक्षा तो विषय व्यवस्थित समजून घेतल्यास लाभदायक ठरतो. पदवी परीक्षेसाठी वापरलेली अभ्यासपद्धती या परीक्षेसाठी कुचकामी ठरते. १६ ते १८ तास अभ्यास करण्यापेक्षा वर्षभर दररोज किमान सात ते आठ तास नियमित अभ्यास केल्यास यश मिळवणे शक्य आहे .
० या परीक्षेत यश मिळविण्यासाठी असामान्य बुद्धिमत्तेची गरज असते- आयएएस, आयपीएस तसेच उपजिल्हाधिकारी इ. पदे अशांनाच मिळतात, ज्यांना शालेय शिक्षणात ८० ते ९० टक्के गुण प्राप्त झालेले आहेत अथवा ज्यांना पदवी परीक्षेतदेखील चांगले गुण आहेत ते विद्यार्थी या परीक्षेत टिकाव धरू शकतात, हा सर्वात मोठा गरसमज आहे. या परीक्षेची पात्रता फक्त पदवी उत्तीर्ण आहे. आपण कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल, आणि ही परीक्षा यशस्वी होण्याची जिद्द बाळगली असेल तर या परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकता. ज्यांना पदवी परीक्षेत किंवा त्याआधी दहावी, बारावीत कमी गुण मिळालेले असतील त्यांनी निराश होता कामा नये, तसेच ज्यांना पदवी परीक्षेत चांगले गुण मिळालेले आहेत त्यांनीदेखील फाजील आत्मविश्वास बाळगू नये.
० मुलाखतीच्या वेळेस मुलाखत पॅनल कोणतेही प्रश्न विचारते- वास्तविक पाहता पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेत तुमच्या बुद्धिमत्तेची, ज्ञानाची परीक्षा झालेली असते. त्यामुळे मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी आहे हे लक्षात ठेवावे. पॅनल हे उमेदवारांची निवड करण्यासाठी असते, तुम्हांला नाकारण्यासाठी नाही. आपण बोलता कसे, प्रशासनामध्ये विविध, जबाबदाऱ्या तुम्हांला पेलता येतील का, हे मुलाखतीत पाहिले जाते.
० उत्तीर्ण होण्यासाठी अस्खलित इंग्रजी येणे गरजेचे आहे- अभ्यासक्रमाचा संदर्भ घेऊन बोलायचे झाल्यास मुख्यपरीक्षेसाठी १०० गुणांचा इंग्रजीचा पेपर असतो. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, इंग्रजी महत्त्वाची भाषा आहे. काही संदर्भग्रंथ इंग्रजीत उपलब्ध आहेत. इंग्रजीशिवाय काही अडत नाही परंतु, या भाषेचे ज्ञान असणे हे आवश्यक ठरते हे नाकारताही येत नाही. विद्यार्थ्यांनी इंग्रजीबद्दल गरसमज तसेच अनाठायी भीती मनातून काढून टाकावी. योग्य नियोजनाने या भाषेवर प्रभुत्व मिळवता येते हे लक्षात ठेवावे.
० भ्रष्टाचार- गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यप्रणाली पाहिली तर ती अत्यंत पारदर्शक आहे. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी फक्त अर्ज भरण्यासाठीच परीक्षाशुल्काची गरज लागते. इतर ठिकाणी कुठेही पशांची आवश्यकता नसते हे लक्षात ठेवावे.
परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत
० परीक्षेचा अर्ज भरताना शांतपणे व योग्य प्रकारे भरावा.
० या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
० पात्र उमेदवाराला ऑनलाइन अर्ज http://www.mahaonline.gov.in या वेबसाइटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.
० योग्य प्रकारे आयोगाला अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.
० अर्जाचे शुल्क ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये चलनद्वारे तसेच ऑनलाइन डेबिड कार्डद्वारे जमा करता येते. परीक्षा शुल्क जमा झाल्यांनतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे गरजेचे असते.
० या परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. त्याची प्रत उमेदवाराने परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी? शक्यतो पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासून परीक्षेच्या तयारी सुरुवात केल्यास उत्तम. ग्रामीण व शहरी भागांतील काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती उशिरा मिळते. माहिती मिळाली तरी ती योग्य ती मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गरसमज पसरतात. जर आपण पदवीधारक असाल आणि पदवी प्राप्त होऊन काही र्वष उलटली असली तरी निराश होण्याचे काही कारण नाही. योग्य, नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास या परीक्षेची तयारी उत्तमरीत्या करता येते. तयारी करताना सर्वात आवश्यक अशी बाब म्हणजे सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची राज्य सरकारच्या शालेय पाठय़क्रमातील पुस्तके वाचून काढावीत. या पुस्तकांच्या वाचनाने पुढचा अभ्यासक्रम समजणे सोपे होते. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. विशेषत: इतिहास, भूगोल आणि विज्ञान या विषयांची क्रमिक पुस्तके वाचणे आवश्यक आहे.
grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा