फारुक नाईकवाडे

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन घटकाचे प्रश्नविश्लेषण आणि त्याआधारे तयारीबाबत मागील लेखामध्ये (८ मे) चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल व पर्यावरण या उपघटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

इतिहास वगळता या घटकांवरचे प्रश्न ‘मूलभूत’ संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येणार नाहीत. विषयाच्या मूलभूत संकल्पना, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पैलूंवर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे यांचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे.

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७ ते १९९०)

इतिहासाचा अभ्यास करताना राजकीय व सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. त्यासाठी घटनांमधील परस्पर संबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात व लक्षात राहतात.

१८५७च्या उठावापासून स्वातंत्र्य लढय़ापर्यंतचा पारंपरिक इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील १९९०पर्यंतच्या कालावधीतील महत्त्वाच्या घटना अशा दोन टप्प्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

१८५७च्या उठावाचे विविध पैलू, त्यानंतर ब्रिटिशांची राजकीय वाटचाल व आर्थिक धोरणे, काँग्रेसची स्थापना व तीन कालखंड, स्वातंत्र्यासाठीचे गांधी कालखंडातील महत्त्वाचे तीन लढे/चळवळी, महत्त्वाचे नेते, स्वातंत्र्याच्या योजना इत्यादी बाबी अभ्यासायला हव्यात.

स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये घटना समिती, संस्थानांचे विलीनीकरण, पहिल्या दोन पंचवार्षिक योजना, भाषावार प्रांतरचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भारताचे परराष्ट्र धोरण, चीन व पाकिस्तानबरोबरची युद्धे, बांगलादेश मुक्ती, भारताचे आण्विक धोरण, १९९०चे आर्थिक संकट इत्यादी मुद्दे पाहायला हवेत.

भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील समाजसुधारक हा भाग जास्त लक्ष देऊन अभ्यासावा. यामध्ये समाजसुधारकाचे कार्य, संस्था, पुस्तके, वचने, काही महत्त्वाची वैयक्तिक माहिती जसे मूळ नाव, गाव, परदेश प्रवास, प्रभाव, गुरू, शिष्य, समकालिनांशी संबंध इत्यादींचा आढावा घ्यावा.

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल

भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक—आर्थिक—सामाजिक अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे.

मूलभूत संज्ञा व संकल्पना आधी समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ॠतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी, इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

प्राकृतिक विभाग, नदी—पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत भारत-महाराष्ट्र अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे. भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

चालू घडामोडींमध्ये नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

आर्थिक भूगोलामध्ये खनिजे व त्यांचे उत्पादन, महत्त्वाची पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा अभ्यास कोष्टक मांडून करता येईल.

खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन, धार्मिक स्थळे यांचा कोष्टक पद्धतीत मांडून पुढील मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करता येतो :  स्थान (जिल्हा, नदी किनारा, पर्वत इत्यादी), वैशिष्टय़े, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी.

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टके , सारण्या तयार करून अभ्यास करावा.

राज्यातील जिल्ह्य़ांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्य़ांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, जागतिक तापमानवाढ या संकल्पना व त्यांचा परस्परसंबंध समजून घ्यायला हवा.

मानवी विकास व पर्यावरण यांचा परस्परसंबंध समजून घ्यावा. विकास प्रकल्पांच्या पर्यावरणावरील परिणामांबाबतचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत. याबाबतच्या महत्त्वाच्या पर्यावरणविषयक चळवळी, या क्षेत्रात कार्यरत महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती यांचा आढावा घ्यायला हवा.

वन संधारणाबाबतचे भारतातील व महाराष्ट्रातील प्रयत्न, योजना माहीत करून घ्याव्यात. वन अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पाहणे उपयुक्त ठरेल.

प्रदूषणांचे प्रकार, स्रोत, परिणाम, उपाय हे मुद्दे समजून घ्यावेत. पर्यावरणविषयक कायद्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले नसले तरी त्यांचा थोडक्यात आढावा घेता आला तर अधिक चांगले.

आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसंस्था पाहायला हव्यात. कवउठच्या रेड लिस्टमधील भारताच्या संकटग्रस्त प्रजाती, वन्यजीव संवर्धनाचे कायदे, ठराव, अभयारण्ये व संबंधित संकल्पना यांचाही आढावा आवश्यक आहे.

पर्यावरण क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय संस्थांची माहिती, संमेलने त्यातील महत्त्वाचे ठराव त्यातील उद्दिष्टे, शाश्वत विकास लक्ष्यांमधील पर्यावरणविषयक उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

हवामान बदलविषयक जागतिक ठरावांबाबत भारताची भूमिका नेमकेपणाने समजून घ्यायला हवी. भारतातील यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीचे कायदे, धोरणे, योजना पाहायला हव्यात.

Story img Loader