विश्लेषण आणि अभ्यास
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे इतिहासाच्या उजळणीबाबत या आणि पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने विचारण्यात येतो. या लेखात प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. पूर्व परीक्षेतील इतिहासाच्या एकूण १५ प्रश्नांपैकी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक कालखंडासाठीची प्रश्नसंख्या निश्चित नाही. त्यामुळे सर्व कालखंडांची तयारी गांभीर्याने करणे गरजेचे आहे.
प्राचीन इतिहास
प्राचीन इतिहासातील प्रश्नांमध्ये प्रागैतिहासिक इतिहासावरील प्रश्नांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक उत्खनन स्थळांवर भर देऊन भारतातील प्रागैतिहासिक इतिहासाचा आढावा घेणे पुरेसे ठरेल.
महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळे, त्यांचा काळ, उत्खननातील वस्तू आणि त्या त्या कालखंडाबाबत इतिहासकारांची मते माहीत असायला हवीत.
प्राचीन इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. यातील वैदिक, उत्तरवैदिक आणि संगम साहित्यावर आणि सिंधू संस्कृतीतील पुरातात्त्विक अवशेष यांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे.
सिंधू संस्कृतीमधील पुरातत्त्व स्थळे, तेथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टय़े, उत्खननकर्ते, नगररचनेची ठळक वैशिष्टय़े, कालखंड व अस्ताबाबतची इतिहासकारांची मते या बाबी माहीत असायला हव्यात.
वैदिक व उत्तरवैदिक कालखंडातील साहित्य, साहित्यकार, त्या काळातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे.
जैन व बौद्ध धर्माचा उदय व विस्तार, त्यांची मुख्य शिकवण, ग्रंथ, राजाश्रय यांचा आढावा घ्यावा. सोळा महाजनपदे आणि त्यांचे महत्त्वाचे शासक यांचा आढावा घ्यावा.
तमिळ संगम साहित्य, त्यांचे साहित्यकार आणि ग्रंथ, महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले विषय, कालखंड, राजवटी / राजाश्रय यांचा आढावा घ्यायला हवा.
मौर्य व गुप्त साम्राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, शिलालेख, नाणी, साहित्य यांच्या कोष्टकमध्ये नोट्स काढाव्या. या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे.
प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करीत असताना घराणे/राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक), आर्थिक, सामाजिक स्थिती, महत्त्वाच्या घटना: प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.
मध्ययुगीन इतिहास
मध्ययुगीन कालखंड हा सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध होता. या काळातील विविध कला व शास्त्रीय शोधांचा आढावा घ्यायला हवा. वास्तुकला, चित्रकला व संगीत आणि नृत्य या दृष्यकलांचा वेगवेगळ्या शैली आणि त्यांची वैशिष्टय़े व त्यांचे क्षेत्र या मुद्यांच्या आधारे नोट्स काढून अभ्यास करावा. उत्तर व दक्षिण भारतातील स्थापत्य आणि शिल्प व दृष्य कलांचा आढावा घेणे उपयुक्त ठरते.
या कालखंडातील सांस्कृतिक जीवन अभ्यासताना भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या आश्रयाला असलेले साहित्यिक, इतिहासकार आणि त्यांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा विषय, या कालखंडातील परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने, यांचा कोष्टकामध्ये नोट्स काढून अभ्यास करावा.
मध्ययुगीन इतिहासाच्या सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक पैलूंवर भर असला तरीही राजकीय इतिहासावरही प्रश्नांचा समावेश लक्षणीय आहे.
हर्षांच्या अस्तानंतर सल्तनत कालखंडापर्यंतचे प्रादेशिक राज्ये, त्यांचे महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे कोष्टक तयार करावेत.
सल्तनत व मुघल काळातील महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे आर्थिक — सामाजिक निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय, सांस्कृतिक जीवन यांचा कोष्टकामध्ये अभ्यास करावा.
मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास — चालुक्य, यादव, बहामनी — (ईमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय या मुद्यांच्या आधारे करावा.
मराठा कालखंड (१६३०—१८१८)
मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी यांच्या स्वराज्य स्थापनेपासून १८१८पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्टप्रधान मंडळ, आर्थिक व राजकीय निर्णय यांचा बारकाईने अभ्यास करावा. पेशव्यांची कारकीर्द अभ्यासताना महत्त्वाचे पेशवे, त्यांच्या लढाया व त्यांचे निर्णय, तह, महत्त्वाचे मराठा सरदार व त्यांचे कार्यक्षेत्र हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, इतर मध्ययुगीन संत, त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील इतर संतांच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाबीही माहीत असणे आवश्यक आहे.
प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील राज्यकर्ते / इतिहासकार/ साहित्यकार आणि आधुनिक कालखंडातील समाजसुधारक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वे यांवर बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे त्यांचा नेमका अभ्यास असणे आवश्यक आहे, हे उजळणी करताना लक्षात घ्यायला हवे. पुढील लेखामध्ये आधुनिक भारतीय इतिहासाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.