फारुक नाईकवाडे
मागील लेखामध्ये कर सहायक पदाच्या पदनिहाय पेपरचे विश्लेषण पाहिले. या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष तयारीबाबत या आणि पुढील लेखामध्ये घटकनिहाय चर्चा करण्यात येत आहे. यातील बुद्धिमत्ता चाचणी घटकाच्या तयारीबाबत यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. उर्वरित घटकांच्या तयारीबाबत यापुढे पाहू.
पंचवार्षिक योजना
* पंचवार्षिक योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.
* योजना सुरू होण्यापूर्वीची आर्थिक व राजकीय पार्श्वभूमी माहीत असायला हवी.
* योजनेचा कालावधी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, योजनेच्या वैशिष्टय़ामुळे मिळालेली ओळख (उदा. रोजगारनिर्मितीची योजना) हे वस्तुनिष्ठ मुद्दे माहीत असावेत.
* योजनेची घोषित ध्येये, हेतू व त्याबाबतची कारणे, योजनेतील सामाजिक पैलू समजून घ्यावेत.
* योजनाकाळात सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, अभियाने, कल्याणकारी तसेच इतर महत्त्वाच्या योजना माहीत असायला हव्यात. या उपक्रम/ कार्यक्रम/ अभियाने/ योजना यांची उद्दिष्टे, कालावधी, स्वरूप, लाभार्थ्यांचे निकष इत्यादी ठळक बाबी माहीत असाव्यात.
* योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक व शैक्षणिक धोरणे माहीत करून घ्यावीत.
* योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.
* योजनेचे मूल्यमापन व यश/ अपयशाची कारणे, परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत.
* योजनाकाळात घडलेल्या उल्लेखनीय राजकीय व आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना माहीत असायला हव्यात.
* योजना आयोगाच्या जागी निती आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याने निती आयोगाबाबत पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
* निती आयोगाची स्थापना कधी झाली, स्थापनेमागील उद्देश या बाबी माहीत असाव्यात.
* निती आयोगाची रचना, कार्ये, अधिकार माहीत असायला हवेत.
नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना
* राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, तिच्यावरील वेगवेगळय़ा विचारसरणींचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव यांचा आढावा घ्यायला हवा. घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.
* घटनेतील मूलभूत हक्क, राज्याची नितीनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये याबाबतची कलमे बारकाईने अभ्यासावीत. प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतींत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा. विशेषत: चालू घडामोडींच्या संदर्भात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
* केंद्र व राज्य शासनाचे अधिकार, कार्ये, कायदानिर्मितीची प्रक्रिया, विधेयके, त्यांचे प्रकार या बाबीही महत्त्वाच्या आहेत.
* उच्च व सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.
* घटनात्मक पदे, आयोग अभ्यासताना संबंधित कलम, रचना, कार्ये, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.
* घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या माहीत असाव्यात.
* सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे तसेच मूलभूत हक्कांबाबतचे महत्त्वाचे निर्णय व याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती असायला हवी.
* राज्य प्रशासनामध्ये मंत्रालयीन कामकाजाची माहिती करून घ्यावी. यामध्ये विधान मंडळाचे कामकाजाबाबत तसेच ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत अशा उतरंडीचा table from मध्ये अभ्यास करता येईल. यामध्ये महसुली, विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे.
* प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्याव्यात.
* शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, कार्ये, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. पदाधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, निवडणूक या बाबी समजून घ्याव्यात. याबाबत वेळोवेळी राज्य शासनाकडून घेण्यात येणारे निर्णय माहीत असायला हवेत.
* ७३व्या व ७४व्या घटना दुरुस्त्यांमधील तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवलेले विषय, मूल्यमापनासाठी नेमलेल्या समित्या व समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा आढावा घ्यावा.