रोहिणी शहा

वनसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील पर्यावरण आणि वनविषयक मुद्दय़ांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास अभ्यासाची दिशा आणि विस्तार निश्चित करता येतो. या विश्लेषणाच्या आधारावर पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आणि वनसंवर्धनाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम या घटकांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

पर्यावरणविषयक मुद्दे

यातील पर्यावरण प्रदूषण, खाणकामाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, हरितगृह परिणाम, कार्बन ट्रेडिंग, हवामान बदल या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. पर्यावरणीय प्रदूषण अभ्यासताना प्रदूषणाचे प्रकार (वायू, जल, मृदा, ध्वनी, आण्विक ई.), त्यांचे मानवी आरोग्य, हवामान इत्यादीवरील परिणाम समजून घ्यावेत. याबाबतची आंतरराष्ट्रीय मानके, संयुक्त राष्ट्र संघटनेतील ठराव इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. हवा, पाणी आणि मृदेच्या प्रदूषणास जबाबदार प्रदूषकांचे प्रकार, त्यांचे स्रोत, त्यांच्या वातावरणातील प्रमाणाची मर्यादा, त्या मर्यादेबाहेर वाढ झाल्यास मानवी आरोग्य व हवामानावर होणारे परिणाम, याबाबतची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानके, वाहनांच्या प्रदूषण मर्यादेची भारत मानके यांचा आढावा घ्यायला हवा.

जलप्रदूषणाच्या ऐतिहासिक आणि व्यापक परिणाम केलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील घटना माहीत असायला हव्यात. तसेच महत्त्वाच्या प्रदूषित नद्या तसेच शहरे, त्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमवारी, त्यांच्यामधील प्रदूषणाचे स्रोत, प्रमाण, प्रदूषण नियंत्रणासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घ्यावा. हरितगृह परिणाम आणि हवामान बदल या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. हरितगृह वायू, त्यांचे हवेतील प्रमाण, त्यांचे स्रोत, त्यांच्यामुळे होणारे परिणाम बारकाईने समजून घ्यावेत.

प्रदूषणाच्या नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न समजून घ्यायला हवेत. त्याबाबत वसुंधरा परिषद, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस परिषद इत्यादी महत्त्वाच्या परिषदा व त्यातील ठराव माहीत असावेत. यामध्ये कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना समजून घ्यायला हवी. यामध्ये पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यासही आवश्यक आहे. जल, वायू, ध्वनी नियंत्रणविषयक कायद्यांमधील व्याख्या, प्रदूषणाच्या मर्यादा, दंड, शिक्षा, अधिकारी याबाबतच्या तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. केंद्र आणि राज्य शासनाची पर्यावरणपूरक धोरणे माहीत असायला हवीत.

उत्खनन आणि खाणकाम या बाबींचे भूरूप, हवामान, जलस्रोत, मानवी आरोग्य यांवरील तसेच इतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम समजून घ्यायला हवेत. देशातील अशा उपक्रमांचे ठळक परिणाम व त्यामुळे न्यायालये किंवा शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय विचारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा आढावा आवश्यक आहे.

वनसंवर्धनासाठीचे प्रयत्न

यामध्ये कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण, संयुक्त वन व्यवस्थापन, वनविषयक कायदे, वन संवर्धनामध्ये कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय वने व जागतिक वारसा स्थळे या मुद्दय़ांचा समावेश केलेला आहे. या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारलेले आहेत, तसेच याबाबतच्या चालू घडामोडींचाही प्रश्नामध्ये समावेश आहे. कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण आणि संयुक्त वन व्यवस्थापन या संकल्पना, यामध्ये समाविष्ट उपक्रम, त्यांची उद्दिष्टे, अशा उपक्रमांमधील भौगोलिक वैविध्य समजून घ्यावेत. या मुद्दय़ांवर संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याचा कल जास्त दिसून येतो.

भारताची वन धोरणे, वन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचा अधिक बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या, अंमलबजावणी अधिकारी, गुन्हयाचे स्वरूप, निकष, अपीलीय प्राधिकारी, तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड / शिक्षेची तरतूद, अंमलबजावणीची प्रक्रिया – विहित मुदती, पार्श्वभूमी, असल्यास विशेष न्यायालये, नमूद केलेले अपवाद हे मुद्दे विषेशत्वाने अभ्यासावेत. यासाठी हे कायदे मुळातून वाचणेच जास्त व्यवहार्य ठरते.

राष्ट्रीय वने आणि उद्याने, अभयारण्ये यांच्या व्याख्या, निकष, त्यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकारी व यंत्रणा यांचा नेमका अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय वने व उद्याने, त्यांचे स्थान, त्यातील महत्त्वाचे वृक्ष आणि प्राणी, पक्षी यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व अभयारण्ये व ती ज्या प्राणी अथवा पक्ष्यांसाठी राखीव आहेत त्यांची माहिती तसेच त्या वनांची इतर वैशिष्टय़े समजून घ्यावीत.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP), हवामान बदलावरील आंतर शासकीय समिती (IPCC) तसेच भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि प्राणी सर्वेक्षण संस्था यांचा स्थापना, उद्दिष्ट, रचना, कार्ये, वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

IUCN च्या रेड लिस्टमधील लुप्तप्राय जमातींचे वर्गीकरण व त्याचे निकष तसेच भारतातील लुप्तप्राय जमाती यांची माहिती करून घ्यावी. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील नैसर्गिक वारसा स्थळे माहीत असावीत. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे आणि जैवविविधता हॉट्स्पॉट यांची नेमकी माहिती करून घ्यावी.

Story img Loader