फारुक नाईकवाडे
वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये समाविष्ट पारिस्थितिकी तंत्र, त्याच्याशी संबंधित कृषीविषयक घटक, जैवविविधता आणि तिचे संवर्धन आणि भारतातील स्थानिक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती या मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. वनसेवा मुख्य परीक्षेतील मृदा घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. सन २०१६पासून या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषणाच्या आधारे या घटकाच्या तयारीसाठी पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक ठरतात.
मृदेची निर्मिती, घटक, वैशिष्टय़े, समस्या, मृदेची धूप या घटकांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. मृदेच्या निर्मितीसाठी कारक घटक, मृदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे आणि त्यांचे कारण व परिणाम हे आयाम, प्रत्येक टप्प्यावरील खडकांच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या घटकांचे गुणधर्म, भौगोलिक स्थान वैशिष्टय़े व घटकांचा मृदा निर्मितीवरील परिणाम या मुद्दय़ांचा अभ्यास सविस्तरपणे करायला हवा.
हवा, पाणी, खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म जीव या मुख्य घटकांचे प्रमाण, त्यांची भूमिका, त्यांच्या प्रमाणामध्ये बदल झाल्यास होणारे परिणाम यांचा आढावा आवश्यक आहे. या बाबींवर भौगोलिक प्रक्रियांचा आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा होणारा परिणाम समजून घ्यावा. खडक स्रोतांमुळे मृदेमध्ये निर्माण होणारी रासायनिक, जैविक आणि भौतिक वैशिष्टय़े, भौगोलिक स्थान वैशिष्टय़ामुळे मृदेमध्ये निर्माण होणारी जैविक वैशिष्टय़े समजून घेतल्यास फायद्याचे ठरेल.
मृदेचे सर्वसाधारण रासायनिक, जैविक व भौतिक गुणधर्म समजून घ्यायला हवेत. हे गुणधर्म, त्यांची कारणे, त्यांचा मृदेच्या स्वरूपावर तसेच उत्पादकतेवर होणारा परिणाम यांचा कोष्टकामध्ये ओट्स काढून अभ्यास करता येईल. मृदेचा पोत, घनता, संरंध्रता (porosity), पार्यता (permeability). रंग, तापमान, लवचीकता या भौतिक गुणधर्माचा आवश्यक आहे. हा अभ्यास करताना स्वरूप, कारक घटक, परिणाम, असल्यास संबंधित सिद्धांत हे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.
मृदेचा सामू, मृदेची कॅटायन विनिमय क्षमता, बफर प्रक्रिया, स्फतीकाभ व कलिले (Crystalloids & colloids) आणि त्यांचे गुणधर्म तसेच त्यांचा मृदेच्या गुणधर्मावर होणारा परिणाम आणि असल्यास त्याबाबतचे सिद्धांत यांचा अभ्यास बारकाईने करायला हवा. मृदेच्या जीवशास्त्रीय गुणधर्माचा अभ्यास तिच्यामधील सेंद्रिय द्रव्ये व सूक्ष्मजीव यांवर भर देऊन करायला हवा. जिवाणू, कवक, शैवाल आणि आदिजीव या सजीवांचे मृदेमधील प्रमाण आणि त्यांचा मृदेच्या गुणधर्मावर होणारा परिणाम समजून घ्यायला हवा. याव्यतिरिक्त गांडूळ आणि काही प्रकारचे कीटक इत्यादी सजीवांची मृदेच्या कार्यक्षमतेमधील भूमिका समजून घ्यावी. सूक्ष्म जीवांची मूलद्रव्यांच्या जैवरासायनिक चक्रातील भूमिकाही समजून घ्यायला हवी.
मृदेतील खनिजे आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण व त्यावरून मृदेचे प्रकार समजून घ्यावेत. या घटकांची मृदेच्या उत्पादकतेमधील भूमिका समजून घ्यावी. या घटकांच्या अभावी आणि अतिरिक्त प्रमाणामुळे मृदेच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम, समस्या आणि त्यावरील उपाय समजून घ्यावेत. याच्या टेबलमध्ये नोट्स काढणे शक्य आहे.
मृदा रूपरेखा (soil profile) ही संकल्पना समजून घ्यावी. मृदा रूपरेखेवर हवामान, सूक्ष्मजीव, स्रोत खडक, कालावधी, भौगोलिक स्थानवैशिष्टय़ या घटकांमुळे होणारा परीणाम व्यवस्थित समजून घ्यायला हवा. मृदेची धूप आणि तिचे प्रकार समजून घ्यायला हवेत. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या धूपेची कारणे, स्वरूप, परिणाम, त्यामुळे होणारे मृदेची हानी, धूप रोखण्यासाठीचे विविध उपाय व्यवस्थित समजून घ्यावेत. यामधील वनांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
पाणलोट क्षेत्राची वैशिष्टय़े, भौगोलिक वैशिष्टय़ांवर आधारित, जमिनीच्या वापरानुसार आणि आकारानुसार पाणलोट क्षेत्राचे प्रकार समजून घ्यावेत. खोऱ्याचा क्षेत्रविस्तार, उतार, आकार आणि लांबी तसेच जलप्रवाहाची श्रेणी, उतार, लांबी व विसर्गाची घनता ही मुख्य वैशिष्टय़े समजून घ्यावीत. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातील जमीन आणि पाण्याच्या वापराबाबतच्या प्रक्रिया व उपक्रम व्यवस्थित समजून घ्यावेत. पर्जन्यजल साठवण्यासाठीचे उपक्रम (rain water harvesting), भूजल स्रोतांचे पुनरुज्जीवन यांचे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातील महत्त्व समजून घ्यायला हवे.