रोहिणी शहा
गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न सन २०१८ पासून लागू झाला आहे. पदनिहाय पेपर्सचे अभ्यासक्रम आणि सामायिक घटकांवरील प्रश्नसंख्या यांमध्ये फरक आहे. बुद्धिमत्ता चाचणी हा घटक तिन्ही पदांच्या पेपर दोनचा भाग आहे. पेपर्सच्या विश्लेषणावर आधारित तयारी कशा प्रकारे करता येईल याची या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
पेपर विश्लेषण :
लिपिक टंकलेखक पदासाठी २०, कर सहायक पदासाठी १५ तर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठी १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदासाठी गणितीय कौशल्ये / गणित घटकाचा अभ्यासक्रमामध्ये वेगळय़ाने उल्लेख असल्याने त्यांवरील प्रश्न (प्रत्येकी १५) स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागतील. तिन्ही पेपरमधील प्रश्न हे विस्तृत आणि वाचण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणारे आहेत. तिन्ही पेपरमध्ये प्रसंगाधारित निर्णय कौशल्ये किंवा निष्कर्ष / अनुमान विचारणारे प्रश्न समाविष्ट आहेत.
तिन्ही पेपर्सचा एकत्रित विचार केला तर या घटकामध्ये समाविष्ट बहुतांश प्रकार विचारलेले दिसतात. सर्व पदांसाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना या संपूर्ण घटकाचा सराव असणे आवश्यक आहे असे दिसते.
प्रत्यक्ष तयारी : तर्कक्षमता
तर्कक्षमतेमध्ये विधानांच्या आधारे – निष्कर्ष पद्धती ( Syllogism)युक्तिवाद, अनुमान, निष्कर्ष, गृहीतके, समर्थन तसेच नातेसंबंध, बैठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.
Syllogism निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत. प्रश्नातील विधानांच्या आधारे युक्तिवाद, अनुमान, निष्कर्ष, गृहीतके, समर्थन शोधण्याबाबतच्या प्रश्नांचे प्रमाण वाढत आहे. या प्रश्नामधील प्रसंग किंवा दिलेली विधाने तसेच दिलेले पर्यायही नेमकेपणाने समजून घेणे आवश्यक आहे. हा भाग बऱ्याच अंशी आकलनावर आधारित आहे. त्यामुळे आकलन, भाषेवरील पकड आणि तार्किक क्षमता यांची सांगड या प्रश्नांमध्ये उपयोगी ठरते.
नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे डेटा सफिशिएन्सी आणि नातेसंबंध यांची सांगड घालता येणे आवश्यक आहे. बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
बुद्धिमत्ता चाचणी
या घटकामध्ये आकृती मालिका, अक्षर मालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपुट आऊटपुट या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, कॅलेंडर, दिशाज्ञान यांवरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात. आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.
संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.
सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत. ईनपूट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत. घडय़ाळातील काटय़ांचे कोन, आरशातील प्रतिमा, कॅलेंडरमधील लीप इयरचा विचार या बाबी सरावाने सोप्या होतील. दिशांबाबतच्या प्रश्नांमध्ये सरळ सांगितलेल्या मार्गाचे आरेखन करत गेल्यास योग्य उत्तर लवकर सापडते.
डेटा सफिशिएन्सी
एखादे विधान सिद्ध करण्यासाठी किंवा उदाहरण सोडविण्यासाठी दिलेल्या विधानामधील कोणती विधाने आवश्यक किंवा पुरेशी आहेत हे शोधणे; किंवा दिलेल्या संकेतांच्या आधारे माहितीवर प्रक्रिया करून उत्तर शोधणे अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात.असे प्रश्न सोडविताना प्रत्यक्ष दिलेले पर्याय एक एक करून वापरत गेल्यास तो आवश्यक आहे की नाही ते कळत जाते. या निष्कासन तंत्राचा ( elimination Technique) वापर परिणामकारक ठरतो.
हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणवरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास चांगले गुण निश्चितपणे मिळवता येतात.