रोहिणी शहा
गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न सन २०१८ पासून लागू झाला आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठीचा पेपर दोन या वर्षी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पेपर्सचे विश्लेषण केल्यास या वर्षीच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या टेबलमध्ये देण्यात आली आहे.यापैकी बुद्धिमापनविषयक प्रश्नांच्या तयारीबाबत आधीच चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्यांमधील व्याख्या, त्यातील कलमांच्या नेमक्या तरतुदी आणि एकूण कायद्यामागील तत्त्व समजले असल्यास उत्तर देता येईल अशा प्रकारचे विश्लेषणात्मक प्रश्न विचारलेले दिसून येतात.या दोन्ही कायद्यांच्या मूळ दस्तावेजांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माहिती अधिकार कायदा व त्याच्या अंमलबजावणीचे नियम दोन्ही बाबी व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे. तर लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत मूळ कायदा बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. शक्य असल्यास या कायद्यांतर्गत विहित केलेल्या गृह विभाग आणि महसूल विभाग यांच्या लोकसेवा व त्यांचे विहित कालावधी यांचा आढावा घ्यावा.

मूळ दस्तावेजातून कायद्याची पाश्र्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या, लागू होणारे क्षेत्र व दिनांक समजून घ्यावेत.प्रत्यक्ष तरतुदी विचारलेल्या असल्याने दोन्ही कायद्यांतर्गत माहिती किंवा लोकसेवा मागण्याची विहित पद्धत, शुल्क, माहिती किंवा लोकसेवा पुरविणारे अधिकारी, विहित कालमर्यादा, कालमर्यादा ओलांडल्यावर तक्रारीसाठीचे/ अपिलासाठीचे अपिलीय प्राधिकारी, तक्रारी/ अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची/ कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड/ शिक्षेची तरतूद, नमूद केलेले अपवाद अशा सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.माहिती आयोग/ लोकसेवा हक्क आयोग, दोन्ही आयोगांचे कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या समजून घेणे आवश्यक आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान
वेगवेगळय़ा क्षेत्रांतील संगणकाचा वापर, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा विविध सेवा- सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग हे मुद्दे एकत्रितपणे अभ्यासता येतील. वैद्यकीय, कृषी, प्रशासन, बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचा होणारा उपयोग समजून घ्यावा. यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये संगणकीकरणाचा उपयोग आणि माहिती तंत्रज्ञानामुळे त्यांचा वापर करण्यामध्ये वाढलेली परिणामकारकता अशा अनुषंगाने हा मुद्दा पाहावा. विविध क्षेत्रांतील नवी संशोधने व उपकरणे यांची अद्ययावत माहिती असावी.

माहिती साठविणे व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीची उपकरणे, नियमावली, त्यांचे प्रकार, उपयोग माहीत करून घ्यावेत. व्हायरसचे प्रकार व याबाबतच्या चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात. डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी या मुद्दय़ांमध्ये माहितीचे संप्रेषण/ प्रसारण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती तसेच संप्रेषणाच्या विस्तार, माध्यम व गतीच्या आधारे त्याचे प्रकार समजून घ्यावेत. सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांच्या सायबर कायद्यातील व्याख्या तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे कायदेशीर प्रयत्न या बाबी सायबर कायद्याच्या मूळ दस्तावेजातून समजून घ्याव्यात. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा हा मुद्दा पुढील मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावा – शासनाची धोरणे, संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातील व विस्तारातील ठळक टप्पे, माहिती तंत्रज्ञान पार्क इत्यादी संकल्पना.

मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या शासकीय उपक्रमांवर भर देऊन शासनाच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राआधारे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घ्यावा. यामध्ये उपक्रमाचे नाव, सुरू करणारा विभाग, उद्देश, स्वरूप, त्यातील माहिती तंत्रज्ञानाची भूमिका, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष हे मुद्दे समजून घ्यावेत.