महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते व त्याद्वारे विविध क्षेत्रांतील पदे भरली जातात. त्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे राज्य सेवा परीक्षा होय. राज्य सेवा परीक्षेद्वारे राज्य शासनातील अतिशय महत्त्वाची व जबाबदारीची पदे भरली जातात. आयोगाद्वारे राज्य सेवा परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते. या परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांचा समावेश होतो. सध्याच्या पूर्वपरीक्षेची रचना २०१३ पासून आयोगाने अमलात आणलेली आहे. त्यामध्ये सामान्य अध्ययन-१ आणि सीसॅट अशा प्रत्येकी २०० मार्काच्या दोन पेपरचा समावेश होतो. सामान्य अध्ययन-१ च्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केल्यास यात चालू घडामोडी, भारताचा इतिहास, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास, पर्यावरण, सामान्य विज्ञान या घटकांचा समावेश होतो.
आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील या विषयाचा आवाका, मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती करून घेऊ या. राज्य सेवा पूर्वपरीक्षेतील इतिहास या विषयाला तीन भागांत विभागले गेले आहे.
* प्राचीन भारताचा इतिहास
* मध्ययुगीन भारताचा इतिहास महाराष्ट्रावर विशेष भर
* आधुनिक भारताचा इतिहास संदर्भासहित
इतिहास या विषयातील उपघटक व त्यांचा आवाका
प्राचीन भारताचा इतिहास- प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्त्व, भौगोलिक परिस्थिती, अश्मयुग पुरापाषाण युग, ताम्रपाषाण युग, हडप्पा संस्कृती, आर्याचे आगमन आणि ऋग्वेद युग, उत्तर-वैदिक काळ, जैन धर्म आणि बौद्ध धर्म, मौर्य युग, मध्य आशियाशी संबंध आणि त्याचे परिणाम, सातवाहनांचे युग, गुप्त काळ, शिल्प, तंत्रज्ञान, कला आणि तत्त्वज्ञान.
मध्य भारताचा इतिहास- सरंजामशाहीचा उदय, चोलांचे साम्राज्य, दिल्ली सल्तनत, खिलजी आणि तुघलक घराणे, विजयनगर व बहामनी राज्यांचा काळ, सुलतानशाहीतील सांस्कृतिक घडामोडी, मोगल साम्राज्य, निजामशाही, सांस्कृतिक आणि धार्मिक घडामोडी.
आधुनिक भारताचा इतिहास- १८व्या शतकातील भारत, भारतीतील युरोपियनांचा प्रवेश, ब्रिटिशांचे भारतातील आíथक धोरण व प्रशासकीय संरक्षण (१७५७-१८५७) एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धातील सामाजिक व सांस्कृतिक जागृती, १८५७चा उठाव, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा, राष्ट्रीय चळवळी, १८५८ ते १९१८ स्वातंत्र्य आंदोलन, १९२७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्य आंदोलन, भारत सरकारचा कायदा १९३५.
या उपघटकांचा अभ्यास क्रमप्राप्त ठरतो.
२०१३ पासूनच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, इतिहास या विषयावर दरवर्षी साधारणत: १६ ते १८ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यातील १२ ते १५ प्रश्न हे आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राचे विशेष संदर्भासहित) या उपघटकावर विचारण्यात आलेले आहेत. यावरून पूर्व परीक्षेत आधुनिक भारताच्या इतिहासाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आल्याचे आपणाला दिसून येते. पूर्व आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून समजण्यात येते. पूर्व आधुनिक भारतामध्ये मुगल व मराठी साम्राज्याचे पतन, इंग्रजांचा भारतीय राज्यांवर वाढत जाणारा प्रभाव, इंग्रजांशी भारतीय राज्यांशी केलेले तह व करार यांचा अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. मध्य आधुनिक कालखंड हा साधारणत: १८५७च्या उठावापासून ते १९०७ पर्यंतचा मानला जातो. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, बंगालची फाळणी, जहाल-मवाळ यांच्यातील मतामतांतरे यांचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो, तर यानंतरचा काळ गांधीयुग मानला जातो. त्यामध्ये असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव चळवळ, क्रांतिकारी उठाव, १९३५चा कायदा, संविधान सभेची निर्मिती यावरती प्रश्न विचारलेले आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढय़ामध्ये महाराष्ट्राचे योगदान हे बहुमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना त्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे योगदान याला विशेष प्राधान्य देण्यात यावे.
मध्ययुगीन भारताचा इतिहास या उपघटकात अद्वेत, वेदांत अशा तत्त्वज्ञानांचा विस्तार, मंदिरकेंद्री नगरे व त्यांची स्थापना, मध्य आशियातील आक्रमणे आणि भारतीय राज्यसत्ता, सम्राट आणि त्यांचे कार्यकाल, कला, संस्कृती, लेखक व कवी यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत.
प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कलाशैली, नद्या व त्यांची वैदिक नावे, लेखक व त्यांच्या कलाकृती, लेखनशैली या उपघटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत.
संदर्भसूची
* राज्य परीक्षा मंडळाचे पाचवी ते बारावीची पुस्तके.
* एनसीईआरटी पाचवी ते बारावीची पुस्तके.
* आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर व बेल्हेकर
* महाराष्ट्राचा इतिहास – गाठाळ
* आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – कठारे
* स्प्रेक्ट्रम इतिहास
* प्राचीन व मध्ययुगीन भारत – लुसेन्ट पब्लिकेशन.
* प्राचीन भारत – आर. एस. शर्मा.
* मध्ययुगीन भारत – सतीश चंद्र.
* आधुनिक भारत – बिपिन चंद्र.
(महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेची माहिती आपण पुढील अंकात करून घेऊ.)
महेश कोगे