गेल्याच आठवडय़ात राज्य लोकसेवा आयोगाने २०१३ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करून
६ जानेवारीपासून प्रत्यक्ष मुलाखतीस सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे. मुलाखतीविषयी समग्रपणे जाणून घेऊन उपलब्ध वेळेत नेमक्या कोणत्या घटकांवर जोर द्यावा, याविषयीचे मार्गदर्शन करणारा लेख.
मुलाखत हा एकूण १०० गुणांचा राज्यसेवा परीक्षेतील अंतिम टप्पा निर्णायक ठरू शकतो, म्हणून त्यात अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील, याचा
विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
मुलाखतीची संकल्पना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा अर्थ उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व संबंधित पदासाठी योग्य व सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. लोकसेवेमधील कार्यसंधीसाठी उमेदवारांची व्यक्तिगत सुयोग्यता जोखणे हा मुलाखतीमागील मुख्य उद्देश आहे. व्यापक अर्थाने हे फक्त त्याच्या बौद्धिक गुणवैशिष्टय़ांची पडताळणी करणे नसून त्याचबरोबर मानसिक, भावनिक आणि त्याचा सामाजिक कल याची पडताळणी करणेदेखील आहे.
मुलाखत मंडळातील अनोळखी सभासदांसमोर तुम्ही किती सहजपणे वागू शकता आणि स्वत:ला किती आत्मविश्वासपूर्वक सादर करू शकता, याची चाचणी मुलाखतीदरम्यान होत असते. त्याची सुरुवात स्वत:च्या म्हणजे व्यक्तिगत माहितीपासून होते. तुमच्या सभोवती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांबाबत तुम्हाला माहिती आहे का? जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमधील विविधांगी वास्तवाशी तुम्ही किती परिचित आहात, या माहितीच्या आधारावर तुमची सर्वसाधारण जाणीव कशी आहे, हे मुलाखतीदरम्यान बघितले जाते.
एम.पी.एस.सी.ची मुलाखत ही नुसती तुमच्या ज्ञानाचा आवाका मोजण्यासाठी ठेवलेली औपचारिक बोलाचाल नसते. ही तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. येथे तुम्हालाच स्वत:ची ओळख आहे की नाही हे तपासण्यासाठी बोलावलेले असते. कारण मुलाखत म्हणजे तुमच्या सुज्ञतेची परीक्षा होय. माहिती- विश्लेषण- ज्ञान- व्यवहार उपयोगाची क्षमता म्हणजे सुज्ञता होय. तुम्ही जसे आहात, तसे स्वत:ला सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न म्हणजे मुलाखत होय.
मुलाखतीविषयी पूर्वग्रह
मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ पूर्वग्रह दिसून येतात. ते असे:
* उत्तम शैक्षणिक आलेख असल्यासच चांगले गुण मिळतात.
* सूट-टायसह गेल्यासच चांगले गुण मिळतात.
* जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे दिल्यास चांगले गुण मिळतात. अशा एक ना अनेक शंका-कुशंका स्पर्धकांच्या मनात घर करून असतात. ०मुलाखत जास्त वेळ चालल्यास अधिक गुण मिळतात. म्हणूनच कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय जाणे हा गुण मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे.
* अमुक एक मुलाखत मंडळ चांगले गुण देते अथवा अमुक एक मंडळ वाईट गुण देते हा समज. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक उमेदवार असता.
मुलाखत मंडळ
मुलाखत मंडळात साधारणत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य व इतर खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश असतो. यांपकी आयोगाचे सदस्य हे पॅनेलचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडतात. इतर सदस्यांत महसूल, पोलीस खात्यांतील तसेच मंत्रालय वा विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या सर्वाना प्रशासकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळच्या सेवेद्वारे विविध विषयांतील माहिती व ज्ञान प्राप्त झालेले असते. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या पदांवर काम केल्याने त्यांना राज्याच्या भौगोलिक, आíथक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक बाबींची निश्चित माहिती प्राप्त झालेली असते.
अभ्यास घटक
प्रस्तुत टप्प्याची तयारी करण्यासाठी पुढील घटक लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते-
* व्यक्तिगत माहिती अर्थात बायोडाटा – मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा ‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.
* वास्तव्य – विद्यार्थ्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी – उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपयोजनात्मक भाग यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधीदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
* अभ्यासबाह्य बाबींतील रस – उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील ‘अभ्यासबाह्य बाबींतील रस’ हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशा रीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्यू’चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
* पदांचा पसंतीक्रम – पदांच्या पसंतीक्रमाबाबत योग्य स्पष्टीकरण देता यावे. आपले व्यक्तिमत्त्व व आजूबाजूची परिस्थिती यांची आपल्या पसंतीक्रमाशी सांगड घालता आली पाहिजे. दिलेल्या पसंतीक्रमांतील पदांची नेमकी माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य, प्रशासनातील त्या पदाची नेमकी भूमिका याबाबत आपणास प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पदांशी संबंधित सामाजिक व प्रचलित घडामोडींचे ज्ञान अपेक्षित असते.
* चालू घडामोडींविषयी माहिती – आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आíथक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चच्रेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत, त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वतचे मत असणे महत्त्वाचे ठरते.
प्रत्यक्ष मुलाखतीस सामोरे जाताना..
साधारणपणे उमेदवाराने पुढील बाबी विचारात घेऊन मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाणे अधिक लाभदायक ठरेल.
* प्रथम गोष्ट म्हणजे तुमचा पेहराव. पेहराव हा साधा मात्र नीटनेटका असावा, स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वत:स शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व शक्य असल्यास टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी घालावी. आपण कोणत्याही समारंभास जात नाही, याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
* मुलाखतीसाठी उमेदवारास आपले व्यक्तिमत्त्व परिचयपत्र (Bio-Data) सात प्रतींत सादर करावे लागते. त्यामुळे आवश्यक ती सर्व कागदपत्रे बरोबर घेतली आहेत, याची खात्री करावी.
* कोणतीही धावपळ होऊ नये म्हणून नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचावे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे उपस्थित राहा.
* जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल, तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.
* कोणत्याही सदस्याने प्रश्न विचारला तरी सर्व सदस्यांकडे पाहातच उत्तर द्यावे. त्यामुळे सर्व सदस्यांना तुम्ही गुंतवून ठेवू शकता.
* तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका.
मुलाखतीच्या संदर्भातील उपरोक्त विविध घटक लक्षात घेतल्यानंतर ज्या काही मध्यवर्ती बाबींची तपासणी केली जाते, त्यातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विचार करून स्वत:चे मत मांडण्याची क्षमता. प्रत्येक उमेदवाराला उपलब्ध अथवा प्राप्त माहितीच्या आधारे एखाद्या विषयासंबंधी ‘स्वत:चे मत’ विकसित करणे अत्यावश्यक ठरते. कदाचित मुलाखत मंडळ अधिक खोलात जाऊन ‘मता’ची पुनर्तपासणी करू शकते. म्हणूनच संबंधित मुद्दय़ांच्या सर्व बाजूंचा विचार करूनच त्याविषयी स्वत:ची भूमिका ठरविणे अधिक योग्य. त्याचप्रमाणे विचारांतील स्पष्टता व नेमकेपणा आणि ताíकक संगतीही महत्त्वाची ठरते.
शासकीय अधिकारपद हे सतत विविध निर्णय घेण्यात गुंतलेले असल्यामुळे उमेदवाराकडे त्यासाठी आवश्यक निर्णयक्षमता आहे किंवा नाही, हेही पाहिले जाते. बराचदा ‘अमुक-अमुक’ स्थितीत तुम्ही पदावर असल्यास काय कराल, अशा स्वरूपाचे परिस्थितीजन्य प्रश्न विचारून ही निर्णयक्षमता तपासली जाते.
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवाराकडे ठामपणा व आत्मविश्वास अत्यावश्यक ठरतो. अन्यथा विचारात एक तर संदिग्धता आहे किंवा अनिश्चितता आहे, असे वाटू शकते. गुळमुळीत, डळमळीत, गोंधळलेले अथवा द्विधा जाणवणारे उत्तर देणे टाळावे. अशा वेळी थोडा वेळ विचार करून प्रतिसाद देणे केव्हाही श्रेयस्कर.
कोणत्याही प्रकारच्या समस्येकडे पाहताना त्यावर काय उपाय करता येतील, याचाही सतत विचार करावा. कारण तुमच्याकडे केवळ विश्लेषक म्हणून नव्हे तर समस्या निवारक म्हणून पाहिले जाते. त्या दृष्टीने विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगाच्या दाखल्याचे संकलन उपयुक्त ठरते.
उमेदवाराने सबंध मुलाखतीत आपण प्रयत्नवादी, आशावादी आहोत, हेच मुलाखत मंडळाच्या मनावर ठसवायचे असते, हे कायम स्मरणात असू द्यावे. अतिआदर्शवादी अथवा निराशावादी अशी दोन्ही टोके टाळली पाहिजेत. उपरोक्त म्हटल्याप्रमाणे आपला सूर हा नेहमीच आशावादी असावा. अर्थात त्या त्या अथवा आपल्या भोवताली असणाऱ्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील वास्तव समस्या, दुर्गुण, दोष आणि आव्हाने याचे भान असावे. वेगळ्या शब्दांत एका बाजूला समाज जीवनातील समस्या, आव्हानांचे व मर्यादांचे भान असावे तर दुसऱ्या बाजूला त्यातून वाट काढत प्रगती करता येईल, असा विश्वासही असायला हवा. त्यासाठी काय करता येईल, अशी उपाययोजनात्मक शोधक वृत्ती महत्त्वपूर्ण ठरते.
मुलाखतीच्या बाबतीत लक्षात ठेवावयाची आणखी एक बाब म्हणजे मुलाखत ही प्राय: तुमच्या ज्ञानाची चाचणी असत नाही. वस्तुत: पूर्व व मुख्य परीक्षेत या क्षमतेची तपासणी झालेली असते म्हणून उमेदवार प्रत्येक गोष्टीबद्दल अवगत वा त्याला प्रत्येक गोष्टीची खडान्खडा माहिती आहे की नाही, यात मुलाखत मंडळाला रस नसतो. उलटपक्षी एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास वा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यास तसे सांगण्याची त्याच्यातील प्रामाणिक धमक मुलाखत मंडळाला अभिप्रेत असते. कोणत्याही परिस्थितीत मुलाखत मंडळास खोटी अथवा अर्धवट माहिती सांगण्याचे कटाक्षाने टाळावे.
आपली भाषा औपचारिक, योग्य शब्दांचा वापर असणारी, संतुलित, स्पष्ट व नेमकी असावी. नेमक्या वाक्यात, मुद्देसूद बोलण्याची सवय मुलाखतीस अत्यंत उपयुक्त ठरते. आपण उत्तर दिल्यानंतर ‘म्हणजे काय?’, ‘कसे काय?’ असे उपप्रश्न विचारावे लागणार नाहीत अशा प्रकारे बोलण्याची सवय विकसित करावी. उत्तर देताना विनाकारण विवाद निर्माण होईल किंवा शेरेबाजीयुक्त भाषा टाळावी. कोणाचाही उल्लेख करताना आदरपूर्वकच करावा. कडवटपणा, जहालपणा, निराशाजन्य भाषा टाळावी.
संवादकौशल्य हा मुलाखतीतील एक मध्यवर्ती घटक. भाषा, आवाजाची पातळी, संबोधन पद्धत, दृष्टिक्षेप, सर्व सदस्यांकडे असणारे लक्ष, चेहऱ्यावरील प्रतिसाद, देहबोली विशेषत: हातवारे व चेहऱ्यावरील हावभाव, श्रवण कौशल्य, प्रतिसाद/उत्तर देण्यास लागणारा अवधी आणि अपेक्षित प्रतिसाद देण्याची व सदस्यांवर छाप पाडण्याची क्षमता अशा विविध बाबींद्वारे संवादकौशल्याचा विचार करता येतो.
एकंदर विचार करता मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सादरीकरण करण्याची प्रक्रिया असते. आपण काय, कसे बोलतो; नेमक्या कोणत्या बाबीवर चर्चा घडवून आणतो; आपल्यातील बाबींकडे त्यांना कसे आकर्षति करतो यावरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सादरीकरण निर्धारित होते. उपरोक्त सर्व घटकांचा बारकाईने विचार व अभ्यास आणि अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूचा सराव या माध्यमातून मुलाखतीची प्रभावी तयारी करता येईल.
admin@theuniqueacademy.com
एमपीएससी : मुलाखतीची तयारी
गेल्याच आठवडय़ात राज्य लोकसेवा आयोगाने २०१३ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करून ६ जानेवारीपासून प्रत्यक्ष मुलाखतीस सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे.
![एमपीएससी : मुलाखतीची तयारी](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/12/cv-0141.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 30-12-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc preparation of an interview