मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.
मुलाखतीला सामोरे जाताना आपण आहोत त्याहून वेगळे आहोत असा न दाखवता, जसे आहोत तसे पॅनलला सामोरे गेलेले उत्तम! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आतापर्यंत संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण तुमच्या ज्ञानाची परीक्षा ही मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत असण्यापेक्षा आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते.
मुलाखत म्हणजे खेळाचा अंतिम सामना! मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थिसंख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते. (अर्थात असा काही नियम नाही) यापकी, पॅनलने आपल्याला प्रश्न विचारायचा वेळ वजा केल्यास उमेदवाराच्या वाटय़ाला फक्त २०-२५ मिनिटे येतात. या २०-२५ मिनिटांत उमेदवाराला स्वत:ला सिद्ध
करायचे असते.
प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र तयारी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास उपयोग होईल.
* वैयक्तिक माहिती- आपले नाव, नावाचा अर्थ, ते नाव इतिहासाशी संबंधित असेल तर त्या संदर्भाबद्दल थोडी माहिती, उदा. एखाद्याचे नाव शिवाजी असेल किंवा एखाद्याचे नाव सचिन असेल तर त्याबाबतचे संदर्भ तयार करून ठेवावेत. वडिलांचे नाव, आडनाव, आडनावाचा इतिहास, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, आपले गाव, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयाची माहिती, त्या शाळेतून एखादे विशेष व्यक्तिमत्त्व घडले असेल तर त्यांची माहिती, आपण शिकत असलेल्या संस्थेची माहिती, वडिलांच्या व्यवसायाची माहिती.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी- आपण पदवी ज्या विद्याशाखेत घेतली असेल, त्यासंबंधी प्रश्न नक्की विचारले जातात. तयारीत असावे. पदवी परीक्षेत किंवा त्याआधी आपल्याला किती गुण मिळाले आहेत, याचा परिणाम मुलाखतीवर होत नाही, हेही लक्षात घ्या. समजा, शिक्षण घेताना एखाद्या वर्षी गॅप असेल किंवा नापास झालेले असाल तरी त्याचा परिणाम होत नाही. मात्र, उमेदवार त्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो यावर बरेचसे
अवलंबून असते. कुठे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या विभागाची माहिती नक्की मिळवा.
* वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शेतकी विद्याशाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी- जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांत शिक्षण घेतात, त्यांनी- आपण ते क्षेत्र सोडून प्रशासनात का येऊ इच्छितो, याचे व्यवस्थित उत्तर तयार करावे. उत्तर सकारात्मक असावे. अभियांत्रिकीला सध्या वाव नाही, अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत, आयुष्याला स्थिरता मिळावी, यासाठी प्रशासनात येऊ इच्छितो.. असे उत्तर देऊ नये. डॉक्टर्स, तसेच शेतकी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर खर्च केलेला सरकारचा पसा वाया जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, (कोणत्याही शाखेचे शिक्षण वाया जात नाही. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच प्रशासनात होऊ शकतो. या आशयाचे उत्तर तयार करावे.)
* आपण प्रशासनात का येऊ इच्छिता?
या प्रश्नाचे उत्तर सर्वानीच तयार करून ठेवावे, उत्तर प्रामाणिक असावे. जरी आपल्याला भ्रष्टाचाराची चीड असेल, प्रशासनातील कामांबाबत तुमच्या मनात नाराजी असेल तरी शक्यतो टोकाचे उत्तर देणे टाळावे. देश बदलायचा आहे. प्रशासनात खूप सुधारणा घडवून आणावयाच्या आहेत, महाराष्ट्रातील भ्रष्टाचार संपवून टाकायचा आहे असे म्हणण्याऐवजी प्रशासनात नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळते, मानसन्मान मिळतो, स्थिरता मिळते या आशयाचे तुमचे स्वत:चे उत्तर तयार करा.
* आपले गाव, तालुका, प्रशासकीय विभाग यासंदर्भात प्रश्न- आपण ज्या ठिकाणहून आला आहात- उदा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इ. या भागांच्या समस्या उदा. पाण्याची समस्या अवकाळी पावसाची समस्या इ. या प्रदेशातील लोकप्रतिनिधी, मंत्री याची माहिती या प्रदेशातील व्यवसाय, पेहराव या प्रदेशाचे किंवा गावाचे, ऐतिहासिक महत्त्व इ. विषयांची तयारी करून ठेवावी.
* सेवा प्राधान्यक्रमाची माहिती- पसंतीक्रमावर असलेल्या कमीत कमी पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना, ती सेवा नेमकी काय आहे? इ. घटकांची तयारी करावी.
* केस स्टडी संदर्भात प्रश्न- बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान, एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. िहदू, मुस्लीम दंगल उसळली तर..? एखाद्या प्रदेशात प्रंचड गारपीठ झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा वेळी आपण काय कराल? आपण ज्या ठिकाणी नेमणुकीवर आहात तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? इ. अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे
तयार ठेवावीत.
* छंदांविषयी प्रश्न- तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येकाला छंद असेलच असे नाही. परंतु, एखादा छंद आपण नमूद केलेला असेल तर त्यासंबंधित तयारी करा. उदा. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहणे हा छंद नमूद केलेला असतो. अलीकडेच पाहिलेल्या चित्रपटाविषयी त्याला काहीच माहीत नसते, एवढी वरवरची तयारी करून जाऊ नये. चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते, आपण पाहिलेले काही चित्रपट, त्यातील संगीतकार इत्यादी माहिती तयार करावी. काही विद्यार्थ्यांचा छंद वाचणे हा असतो- त्यावेळी आपण अलीकडेच वाचलेली पुस्तके, त्यांचे लेखक, साहित्याचा प्रकार, साहित्य संमेलने इ. विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
* महिला उमेदवारांसाठी- उमेदवार जर महिला असेल तर काही प्रश्न नक्की विचारले जाण्याची शक्यता आहे. उदा. महिलांच्या समस्या, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला अधिकारी म्हणून आपण कसे काम कराल? आपल्या घरापासून दूर बदली झाली तर आपण काम
कराल का? असे काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या प्रश्नांचे तुमचे उत्तर
प्रामाणिक असावे.
* चालू घडामोडींविषयी प्रश्न- मुलाखतीला जाताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांची माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. त्यांची एक यादी तयार करून उत्तरे तयार ठेवा. मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्या- किमान ठळक मथळे तरी नक्की वाचा.
मुलाखतीची तयारी कशी कराल?
व्यक्तिमत्त्व काही एका दिवसात घडत नाही. त्यासाठी वर्षांनुवर्षांची तपश्चर्या आवश्यक असते. कोणत्याही प्रश्नासाठी सज्ज राहा. आपली मुलाखत चांगलीच होणार आहे, आपल्याला मिळालेल्या वेळात आपण सर्वोत्तम कामगिरी करणार आहोत, असा सकारात्मक विचार करूनच मुलाखतीला सामोरे जा.
* तीन-चार मित्रांचा ग्रुप तयार करून त्यांना पॅनल समजून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करा. सध्या मोबाइलमध्येच व्हिडिओचित्रण करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर करून आपण बोलतो कसे, आपण कुठे चुकलो, याचा विचार करून तयारी करा.
* जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview) देणार असाल तर वरिष्ठांनी किंवा प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे नक्कीच पालन करा. मात्र त्यांनी सांगितलेली उत्तरेच तुम्ही सांगायला हवीत, असे नाही आणि तशीच उत्तरे सांगून तुम्हाला जास्त गुण मिळतील असेही मुळीच नाही. कारण त्या दिवशी वरिष्ठांनी सांगितलेली उत्तरेच जर इतर विद्यार्थी देत असतील तर आपण कोणीतरी उत्तरे तयार करून दिलेली आहेत व तशीच उत्तरे तुम्ही देत आहात, याचा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा. असे केल्यास आपल्याला जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे.
मुलाखतीला जाताना..
* वेळेच्या अगोदर पोहोचा.
* मुलाखतकाराने प्रश्नांनी सुरुवात केली तरी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर अधुनमधून मुलाखतीचे वातावरण हलकेफुलके राहील याची काळजी घ्या. त्याकरता चेहऱ्यावर स्मित असणे आवश्यक आहे.
* मुलाखत सुरू असताना स्वत:कडे लक्ष असू द्या. नकळत कोणत्याही हालचाली अथवा कृत्य करू नका. जसे पाय हलवणे, पेनाचा सारखा कट कट असा आवाज करीत राहणे, प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहता शून्यात बघणे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसणे, खूप आरामशीर बसणे या सगळ्या छोटय़ा छोटय़ा हालचालींचा अनेकदा विपरीत परिणाम होऊ शकतो.
* खूप सहज आणि रिलॅक्स आहोत असे दाखविण्यासाठी जाणूनबुजून विनोदी बोलण्यासारखे कृत्य टाळा.
* प्रश्न काय विचारला आहे ते नीट समजून घ्या. तो समजून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यात गर काहीही नाही. प्रश्न न समजता हवेत उत्तरे देऊ नका.
* मुलाखतीदरम्यान स्वत:शी ठाम असणे फार महत्त्वाचे आहे. कधी तरी मुलाखत ही अचानक एकदम मोकळ्या वातावरणात होऊ लागते तर कधी काहीही कारण नसताना एकदम तणाव उत्पन्न होतो. प्रश्नांचे सूर बदलतात, पण तुम्ही मात्र कायम स्वत:बरोबर राहा. त्यातून तुम्हाला स्वत:चा ठामपणा सिद्ध करता येतो.
grpatil2020@gmail.com
तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन! मुलाखतीतले गुण हे अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc preparation of interview