राज्यसेवा पूर्व परीक्षेतील ‘नागरी सेवा कल चाचणी’ अर्थात सीसॅट या विषयातील एकेका घटकाचा सविस्तरपणे विचार आपण करूया. आजच्या लेखात आकलन (Comprehension) या स्वतंत्र अभ्यास घटकाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
प्रथमत: ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की सीसॅटच्या पेपरमध्ये सर्वसामान्य आकलनाचा घटक मध्यवर्ती राहणार. ज्यास सर्वसाधारणत: नवे वा अनोळखी उतारे म्हणता येतील अशा उताऱ्यावरील प्रश्नांच्या आधारे उमेदवाराची आकलनक्षमता तपासली जाईल. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील उतारा वाचून त्याचे योग्य आकलन करावे आणि त्याआधारित बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे शोधावीत अशी ही एकंदर योजना आहे. वस्तुत: प्रत्येक विद्यार्थ्यांने दहावी इयत्तेपर्यंत मराठी, िहदी, संस्कृत आणि इंग्रजी यांतील एखाद्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारच्या उताऱ्यावरील प्रश्नांचा सामना केलेला असतोच. त्यामुळे राज्यसेवेतील हा घटक पूर्णत: नवा आहे, असे नाही. अर्थात आता प्रशासकीय सेवा पदासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेतील उताऱ्याची काठिण्य पातळी अधिक असणार यात शंका नाही.
दुसरी बाब म्हणजे संबंधित उताऱ्यातून केवळ मराठी भाषेची आकलनक्षमता म्हणजे भाषिक कौशल्ये तपासणे अभिप्रेत नाही, तर विद्यार्थी उतारा योग्यरीतीने वाचू शकतो का? त्यातील आशय योग्यरीतीने लक्षात घेतो का? उताऱ्यातील विविध संदर्भ, दाखले आणि उदाहरणांचा समर्पक अर्थ लावू शकतो का? म्हणजे एकंदर उताऱ्यातील विषयाचे नेमके आकलन करू शकतो का? या बाबींची तपासणी केली जाते. म्हणजे वाचन, विश्लेषण आणि अर्थनिर्णयन या मूलभूत क्षमतांचीच कसोटी पाहिली जाणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे.
प्रश्नपत्रिकेतील उतारे सामान्य आकलन तपासणारे आणि प्रशासकीय सेवा पदासाठी अत्यावश्यक आकलन तपासणारे असल्यामुळे विविध विषय उताऱ्यात हाताळले जातील. म्हणजेच राजकारण, अर्थकारण, शिक्षण, साहित्य-संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक समस्या, महत्त्वपूर्ण व्यक्तींची चरित्रे- आत्मचरित्रे अशा विविध संदर्भावर आधारित अथवा संदर्भातून उतारे निवडले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा कस लागणार यात शंका नाही. त्यादृष्टीने विचार करता एका बाजूला उपरोक्त नमूद केलेल्या विषयांतील मूलभूत पुस्तके, महत्त्वाच्या विषयावरील संदर्भपुस्तके आणि दुसऱ्या बाजूला वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि वार्षकि अंकांचे (देश तसेच राज्य पातळीवरील) नियमित वाचन ही बाब पायाभूत ठरणार, हे नक्की. राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी ही संदर्भपुस्तके वाचावीच लागणार आहेत. त्यामुळे सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी केलेले वाचन सीसॅटमधील सामान्य आकलनासाठी उपयुक्त ठरणार आहे, हे लक्षात घ्यावे. अर्थात कोणताही संदर्भ वाचताना त्यातील मूलभूत संकल्पना, दृष्टिकोन, मध्यवर्ती विचार वा विषय, वैचारिक भूमिका, त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उपयोजिलेली उदाहरणे आणि दिलेले दाखले, संदर्भातील एखादा महत्त्वपूर्ण शब्द, शब्दप्रयोग अथवा वाक्याचा मथितार्थ आणि संकेतार्थ या महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे आपले वाचन आणि विचारक्षमतेचा विकास व विस्तारच आकलनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
स्वाभाविकच, सामान्य आकलनात दिलेल्या उताऱ्याचे बारकाईने वाचन करणे अत्यावश्यक ठरते. एखादा उतारा वाचून त्यातील माहिती शोधणे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे अशी अपेक्षा नसते. वस्तुत: उताऱ्यावरील एखादा प्रश्नच माहितीप्रधान असू शकतो. म्हणजे काही प्रश्न उताऱ्यातील मध्यवर्ती संकल्पना, विचार वा विषयाच्या आकलन व विश्लेषणासंबंधी असू शकतात. त्यामुळे उताऱ्यातील एखाद्या विषयात लेखकाला कोणता मुद्दा वा मत मांडायचे आहे, हे करताना उताऱ्याची रचना कशी केली आहे, आणि आपल्या मताच्या समर्थनार्थ कोणती उदाहरणे वा संदर्भ दिलेले आहेत, या महत्त्वपूर्ण बाबींचा शोध घेणे गरजेचे ठरते. म्हणजे अतिशय विचारपूर्वक उताऱ्याचे वाचन करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी उतारा वाचताना महत्त्वपूर्ण मुद्दे, शब्दांना आणि दाखल्यांना अधोरेखित करणे सहायभूत ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला ज्या शब्दात सुचेल त्याच शब्दात दिलेले नसते. त्यामुळे सुचलेल्या उत्तराच्या अर्थाजवळ जाणारा नेमका कोणता पर्याय आहे, याचा निर्णय घेता येणे ही बाब तितकीच महत्त्वाची ठरते. त्यासाठी पर्यायाचा तुलनात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याचदा उताऱ्यातील एखाद्या शब्दातून विशिष्ट संदेश, मत वा अर्थ सांकेतिक पातळीवर अथवा मथितार्थाच्या पातळीवर मांडलेले असते. उताऱ्यातील मध्यवर्ती विचारासंदर्भात अशा एखाद्या शब्दाचा सुसंगत म्हणजे नेमका अर्थ लावणे महत्त्वपूर्ण ठरते. अशारीतीने उताऱ्यातील विषय मांडताना लेखक-लेखिका अथवा निवेदकाला जे प्रतिपादन करायचे असते त्याचे योग्य व नेमके आकलन होण्यासाठी त्यांच्या मनोभूमिकेत जाणे उपयुक्त ठरते.
कोणत्याही विषयावरील उताऱ्यातील सर्व प्रश्न हे थेट आणि माहितीप्रधानच असतील आणि उताऱ्याच्या एका वाचनाआधारे सोडवता येतील असे नाही. काही विचारपूर्वक प्रश्नांच्या बाबतीत उतारा पुन्हा वाचणे अथवा त्यातील काही भाग पुन:पुन्हा वाचणे गरजेचे ठरते. अशा वेळी महत्त्वाचे शब्द वा वाक्यरचनेला केलेले अधोरेखित अत्यंत उपयुक्त ठरते यात शंका नाही. अर्थात हे सर्व करण्यासाठी परीक्षेत विपुल वेळ असतो, असे नाही. वेळेचा मुद्दा लक्षात घेऊन वाचन व अर्थनिर्णयनाची गती वाढवावी लागणार तरच सीसॅटचा सर्व पेपर पूर्ण करता येईल. उताऱ्याचा भरपूर सराव हेच यावरील उत्तर आहे.
उताऱ्यावरील प्रश्नांची तयारी करताना त्यात नेमकेपणा व परीक्षाभिमुखता येण्याकरता प्रत्येक उताऱ्याबाबत काही मूलभूत प्रश्न मनात ठेवून त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्या उताऱ्यात लेखक/लेखिकेने कोणता विषय मांडला आहे, संबंधित विषयाबाबत कोणती भूमिका वा मत मांडले आहे, उतारा लिहिण्यामागे त्याचा हेतू कोणता, उताऱ्यावरील मध्यवर्ती संकल्पना कोणती आणि उताऱ्याला कोणते शीर्षक समर्पक ठरेल, हे प्रश्न प्रामुख्याने विचारात घ्यावेत. या मूलभूत प्रश्नांच्या आधारे कोणत्याही उताऱ्यातील मध्यवर्ती संकल्पना व त्याविषयक लेखनकर्त्यांच्या दृष्टिकोनाचा शोध घेता येईल. प्रत्येक उताऱ्याचे वाचन करताना ही जणू एक आचारसंहिताच आहे, असे मानावे. कारण उताऱ्यातील मध्यवर्ती संकल्पना थेट वा स्पष्टपणे मांडलेली वा व्यक्त केलेली असेलच असे नाही. किंबहुना ती अप्रत्यक्ष, अध्याहृत वा संकेताच्या पातळीवरील व्यक्त केलेली असू शकते. कधी हा विचार प्रारंभी, उताऱ्याच्या मध्यभागी वा शेवटी आणि उदाहरणाद्वारे मांडलेला असू शकतो. त्यामुळे संपूर्ण उताऱ्याचे सूक्ष्म वाचन अत्यावश्यक ठरते. आकलनाच्या कसोटीत उताऱ्याखाली दिलेल्या प्रश्नांचेही काळजीपूर्वक वाचन करणे महत्त्वाचे आहे. प्रश्न वाचण्यात घाई केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने आकलन केल्यास एकतर आपण चुकीचे उत्तर शोधू अथवा पर्याय वाचून मनात गोंधळ निर्माण होऊन आपला वेळ खर्ची पडेल. पर्यायांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. प्रत्येक पर्यायाचे स्वतंत्र वाचन व आकलन, आवश्यकता भासल्यास तुलना आणि त्यातील नेमक्या व अचूक पर्यायांची निवड हे टप्पे अंगीकृत करावेत. एखादा पर्याय बरोबर वाटल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी उर्वरित पर्याय का व कसे चुकीचे आहेत याची खातरजामा करावी. थोडक्यात बरोबर तसेच चुकीच्या पर्यायांची उलटतपासणी करून अचूक पर्यायाची खातरजमा करावी. अशाप्रकारच्या तुलनात्मक पद्धतीमुळे आकलनातील अचूकता वाढवता येईल.
प्रश्नपत्रिकेतील काही उतारे आकाराने लहान आणि अधिक प्रश्न असणारे तर काही उतारे मोठे आणि कमी प्रश्न असणारे असू शकतात. काही क्लिष्ट वा गुंतागुंतीचे तर काही तुलनेने सुलभ असतील अशा प्रकारच्या उताऱ्यांच्या सरावाआधारेच यातील कोणते उतारे आधी सोडवायचे आणि कोणते नंतर हे ठरवावे. यासंदर्भात संबंधित उतारा सोडवण्यास लागणारा वेळ आणि त्यास परीक्षेत निर्धारित केलेले गुण या बाबींचा विचार करावा. एकंदर विचार करता विविध विषयांवरील नियमित वाचन, त्याविषयक चिंतन व विचार आपली विचारक्षमता  आणि पर्यायाने आकलनक्षमता वृद्धिंगत करेल आणि अशा उताऱ्यांचा सराव आपल्या तयारीत अचूकता व नेमकेपणाची हमी देईल. भरपूर सरावाच्या आधारेच आपली आकलनक्षमता विकसित करता येईल. वाचनाबरोबरच टिपणे काढणे वा तयार करणे, उताऱ्यातील मध्यवर्ती मुद्दे शोधणे, महत्त्वाच्या शब्दांच्या शब्दार्थाबरोबरच मथितार्थ शोधण्याची सवय अंगीकृत करणे आणि उताऱ्यांचा सारांश तयार करणे या पद्धतीचा अवलंब करून आकलनक्षमता वृद्धिंगत करता येईल, हे नक्की. 

संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी.
malharpatil@gmail.com

Story img Loader