गेल्या काही वर्षांत देशात विज्ञानविषयक संशोधनाला महत्त्वाचे स्थान मिळत आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक संशोधन शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे मनासारखे करिअर करणे शक्य झाले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन शाखेकडे वळावे, यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे.

संशोधन क्षेत्रातील करिअरसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (NEST- नेस्ट) एक उत्तम संधी उपलब्ध करून देते. या टेस्टद्वारे भुवनेश्वरस्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्स या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो.

देशभरातील १०६ केंद्रांवर नेस्ट संगणक टर्मिनल आधारित ही परीक्षा घेतली जाते. नागपूर, पुणे, मुंबई, भोपाळ, अहमदाबाद, इंदोर, रायपूर आदी काही परीक्षा केंद्रे आहेत. येत्या २ जूनला (२०१८)ही परीक्षा घेतली जाईल. १८ जूनला संस्थेच्या संकेतस्थळावर त्याचा निकाल जाहीर होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल ५ मार्च. या परीक्षेसाठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय संवर्गासाठी १००० रु. इतके शुल्क आहे. तर अनुसूचित जाती आणि जमाती, शारीरिकदृष्टय़ा अपंग आणि सर्व संवर्गातील महिलांसाठी ५०० रुपये. या दोन्ही संस्था शासनाच्या अख्यत्यारीतील असल्याने अत्यल्प शुल्कांमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.

  • अर्हता- विद्यार्थ्यांना बारावीमध्ये (विज्ञान शाखा) परीक्षेत किमान ६०टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जाती, जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
  • एकूण जागा – या परीक्षेद्वारे भुवनेश्वनरच्या संस्थेत येथे २०२ (खुला संवर्ग- १०१, नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग- ५४, अनुसूचित जाती संवर्ग – ३०, अनुसूचित जमाती संवर्ग – १५, शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्ग – प्रत्येक गटासाठी ३ टक्के) विद्यार्थ्यांना तर मुंबईस्थित संस्थेत ४७ विद्यार्थ्यांना (खुला संवर्ग- २३, नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग- १२, अनुसूचित जाती संवर्ग – ७, अनुसूचित जमाती संवर्ग ३, शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्ग – प्रत्येक गटासाठी ३ टक्के) प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी राखीव जागा ठेवल्या जातात.

अशी असते परीक्षा  

या परीक्षेचा पेपर तीन तासांचा आणि वस्तुनिष्ठ असतो. उमेदवाराला खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र आणि गणित या विषयांतील सर्वसामान्य बाबींबाबत कितपत ज्ञान आहे, याची चाचपणी केली जाते. गणिताचे प्रश्न दहावीच्या स्तरावरील असतात. तर विद्यार्थ्यांची आकलनक्षमता समजून घेण्यासाठी विज्ञान विषयातील उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागातील सर्व प्रश्न अनिवार्य असतात. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट स्वरूपाचा अभ्यासक्रम निर्धारित नाही.

दुसऱ्या भागामध्ये जीव, रसायन, गणित आणि भौतिक असे चार भाग असतात. चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह गुण दिले जातात. या परीक्षेचा अभ्यासक्रम हा सीबीएसई आणि एनसीईआरटीच्या ११वी आणि १२ वी विज्ञान शाखेचा असतो.

असे मिळतात गुण

पहिल्या भागासाठी  ३० गुण असतात. दुसऱ्या भागातील चार विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण असतात. या चार विषयांपैकी तीन अथवा चारही विषयांचे प्रश्न उमेदवार सोडवू शकतात. तथापि ज्या तीन विषयांमध्ये संबंधित उमेदवारास सवरेत्कृष्ट गुण मिळाले असतील त्या तीन विषयांचा विचार एकूण गुणांची बेरीज करताना केला जातो. गुणवत्ता यादी तयार करताना १८० गुणांचा विचार केला जातो. (पहिल्या भागाचे ३० गुण + दुसऱ्या भागातील सर्वोत्तम ३ विषयांचे प्रत्येकी ५० गुण  (५० ७३= १५०) = १८० गुण)

प्रत्येक भागात उत्तीर्ण होण्यासाठी एका सूत्रानुसार किमान गुण वा त्यापेक्षा अधिक मिळवणे आवश्यक राहील. प्रत्येक भागासाठी हे किमान गुण वेगवेगळे राहू शकतात. पहिल्या भागात किमान गुण मिळाले नाहीत तर संबंधित उमेदवाराचा विचार गुणवत्ता यादी व पुढे प्रवेशासाठी केला जात नाही. दुसऱ्या भागातील किमान तीन विषयांत निर्धारित किमान वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले नाही तर संबंधित उमेदवाराचा विचार गुणवत्ता यादी व पुढे प्रवेशासाठी केला जात नाही. खुला संवर्ग, नॉन क्रिमीलेअर, इतर मागास संवर्ग, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी दोन्ही भागांतील किमान गुण हे वेगवेगळे राहतील.

एकूण किमान गुण

गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवारांना एकूण किमान गुण मिळवावे लागतात. २०१७  सालातील या परीक्षेचे असे किमान गुण खुल्या संवर्गासाठी ९० होते. याचा अर्थ एकूण १८० गुणांपैकी उमेदवारांना ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक होतं. जरी एखाद्या उमेदवाराने सर्व विभागात किमान गुण मिळवले असले तरी त्याला एकूण गुणांपैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असल्यास त्याचा विचार गुणवत्ता यादी प्रवेशासाठी करण्यात आलेला नाही. यंदासुद्धा ही पद्धत अवलंबण्यात येईल. समजा एखाद्या उमेदवारास किमान एकूण गुणांपेक्षा अधिक गुण असतील पण त्याला पहिला भाग वा दुसऱ्या भागातील तीन विषयांमध्ये किमान गुण मिळाले नसतील तरी त्याचा विचार गुणवत्ता यादी व प्रवेशासाठी केला जाणार नाही. याचा अर्थ उमेदवारांना एकूण किमान गुण आणि दोन्ही विभागात किमान गुण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. इतर मागास संवर्गासाठी किमान एकूण गुण हे खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी असलेल्या किमान एकूण गुणांच्या ९० टक्के असतील तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग या संवर्गातील उमेदवारांचे एकूण किमान गुण हे खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी असलेल्या किमान एकूण गुणांच्या ५० टक्के असतील.

एका विशिष्ट प्रमाणात गुणवत्ता यादीतील उमेदवारांना काउन्सेलिंगसाठी बोलावले जाते. गुणवत्ता यादीत आलेल्या प्रत्येकालाच प्रवेश मिळण्याची किंवा काउन्सेलिंगसाठी बोलावण्याची शक्यता नसते. काही अपवादात्मक परिस्थितीत कटऑफ गुण प्रवेश समितीमार्फत कमी केले जाऊ  शकतात.

नेस्ट २०१८ परीक्षेतील कोणत्याही प्रश्नांसाठी संपर्क

द चीफ कोआर्डिनेटर, नेस्ट २०१८, यूएम- डीएई, सीईबीएस, अण्णाभाऊ  साठे भवन, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी कॅम्पस, कालिना, मुंबई – ४०००९८. परीक्षेचा अर्ज  www.nestexam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो. ईमेल-  nest@nestexam.in

मुंबईस्थित संस्था

डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेसची स्थापना २००७ -०८  साली मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या अ‍ॅटोमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या साहाय्याने करण्यात आली आहे. संस्थेतील अभ्यासक्रम मास्टर ऑफ सायन्स (इन्टिग्रेटेड) या नावे ओळखला जातो. त्याचा कालावधी पाच वर्षे आहे. ही पदवी मुंबई विद्यापीठामार्फत दिली जाते. ही पदव्युत्तर पदवी भौतिक, रसायन, गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयासाठी असते.

पाचही वर्षी विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा ५ हजार इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम संपूर्णपणे निवासी असून वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क प्रतिसत्र १७५० आहे. राखीव संवर्गासाठी ते ७० रु. इतके आहे. डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेन्टर बिल्डिंग, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी – ०२२- २६५२४९८३, फॅक्स  २६५२४९८२,  संकेतस्थळ-  www.cbs.ac.in , ईमेल –  info@cbs.ac.in

भुवनेश्वरस्थित संस्था

नॅशनल इन्स्टिस्टय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेची स्थापना डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जीने २००७ साली केली. इथे सुरू करण्यात आलेला मास्टर ऑफ सायन्स (इंटिग्रेटेड) हा अभ्यासक्रम वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणारा आहे. तसेच उच्च दर्जाच्या विज्ञान प्राध्यापकांची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ही पदवी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटमार्फत दिली जाते.

नॅशनल इन्स्टिस्टय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, भुवनेश्वर

इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स कॅम्पस,

सचिवालय मार्ग, पोस्ट ऑफिस,

सैनिक स्कूल भुवनेश्वर, ओरिसा- ७५१००५,

दूरध्वनी- ०६७४- २३०४०००,

फॅक्स २३०२४३६, संकेतस्थळ – niser.ac.in,  ईमेल – director@niser.ac.in

 

– सुरेश वांदिले

ekank@hotmail.com   

Story img Loader